घरमहाराष्ट्रनाशिकअंधश्रद्धा निर्मूलनासाठी ग्रामीण पोलीस इन अ‍ॅक्शन; 'अंनिस'च्या साथीने उपक्रम

अंधश्रद्धा निर्मूलनासाठी ग्रामीण पोलीस इन अ‍ॅक्शन; ‘अंनिस’च्या साथीने उपक्रम

Subscribe

नाशिक : मालेगाव तालुक्यात अंधश्रध्देतून गुप्तधनासाठी नातेवाईकाने ९ वर्षीय मुलाचा नरबळी घटना घडल्यानंतर जिल्ह्यात अंधश्रद्धेतून अघटित घटना घडू नये, जिल्ह्यात अंधश्रद्धा निर्मूलनासाठी पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांनी पुढाकार घेतला आहे. नाशिक ग्रामीण पोलीस आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे अंधश्रद्धा निर्मूलनासाठी जनजागृती केली जाणार आहे.

महाराष्ट्र शासनाने अंधश्रद्धेविरोधात जादुटोणा विरोधी कायदा संमत केला. तरीही, राज्यात अंधश्रद्धेतून होणार्‍या घटना कमी झालेल्या नाहीत. त्यास नाशिक जिल्हा याला अपवाद नाही. गुप्तधनासाठी नातेवाईक असलेल्या आरोपीने मालेगाव तालुक्यात एका अल्पवयीन मुलाचा नरबळी घेतल्याचे समोर आले आहे. नाशिकच्या आदिवासी बहुल भागात अंधश्रद्धेतून अनेक घटना घडल्या आहेत. अशा घटनांची माहिती मिळताच ग्रामीण पोलीस घटनास्थळी धाव घेत वेगाने तपास करत आरोपींच्या मुसक्या आवळतात.

- Advertisement -

अंधश्रद्धेतून जिल्ह्यात नरबळीची घटना घडू नये, समाजात अंधश्रद्धेबाबत जनजागृती व्हावी, यासाठी पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांनी पुढाकार घेतला आहे. पोलीस अधीक्षक उमाप यांनी अंनिसचे पदाधिकारी महेंद्र दातरंगे यांच्याशी बैठकीत चर्चा केली. जिल्ह्यात ग्रामीण पोलीस आधिकारी व अंनिसचे कार्यकर्ते प्रबोधन मोहीम राबविणार आहेत.

लवकरच या प्रबोधन मोहिमेचा शुभारंभ पोलीस अधिक्षक कार्यालयातून केला जाणार आहे. ग्रामीण भागात बाजार अथवा गर्दीच्या ठिकाणी प्रबोधनपर कार्यक्रम सादर केले जाणार असून, त्यामध्ये भोंदूबाबा करत असलेले चमत्कार, पथनाट्य, व्याख्यान यांचा समावेश असणार आहे. जादूटोणा विरोधी कायद्याचे पोस्टर्स प्रदर्शन लावून जनजागृती केली जाणार आहे. यामुळे अंधश्रद्धेविरोधात अधिक जागरुकता निर्माण होईल, अशी आशावाद पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांनी व्यक्त केली. बैठकीस स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत पाटील आदी उपस्थित होते. या मोहिमेत अंनिसचे डॉ. टी. आर. गोराणे, कृष्णा चांदगुडे, प्रा. डॉ. सुदेश घोडेराव, राजेंद्र फेगडे, प्रल्हाद मिस्त्री, डॉ. शामसुंदर झळके, नितीन बागूल, महेंद्र दातरंगे, अ‍ॅड. समीर शिंदे, कोमल वर्दे, विजय खंडेराव, प्रथमेश वर्दे, यशदा चांदगुडे सहभागी होणार आहेत.

जादूटोणाविरोधी कायदा संमत होऊन १० वर्ष झाली तरी अजूनही प्रभावीपणी या कायद्याची अंमलबजावणी झालेली नाही. जिल्ह्यात अंधश्रद्धा निर्मूलनासाठी ग्रामीण पोलिसांसोबत कायद्याची अंमलबजावणी केली जाणार आहे. : महेंद्र दातरंगे, पदाधिकारी, अंनिस

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -