घर उत्तर महाराष्ट्र दहशत माजवत पोलिसाला मारहाण प्रकरणाचा 16 वर्षांनी निवाडा; मुख्य आरोपीचा झालाय खून

दहशत माजवत पोलिसाला मारहाण प्रकरणाचा 16 वर्षांनी निवाडा; मुख्य आरोपीचा झालाय खून

Subscribe

नाशिक : सीबीएस चौकात हातगाडी, टपर्‍या, केबल धारकांकडे खंडणी मागत दहशत माजविताना पोलीस कर्मचारी व वॉर्डनला बेदम मारहाण करून दुकानांची तोडफोड करणार्‍या चार जणांना जिल्हा व सत्र न्यायालयाने गुरुवारी (दि.१०) तीन वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली. ही घटना २००७ मध्ये घडली होती.याप्रकरणात प्राणघातक हल्ल्याचा आरोप सिद्ध होऊ शकला नाही. तसेच, मुख्य आरोपी मयत झाला आहे.

गणेश एकनाथ घोडके (रा. कर्णनगर, पेठरोड, पंचवटी), दीपक हिरामण आहिरे (रा. कामगारनगर, पंचवटी), उमेश रामभाऊ ठोके (रा. ज्वाली कॉम्प्लेक्स, कामटवाडा), किरण दिलीप नागरे (रा. जाणता राजा सोसायटी, पंचवटी) असे शिक्षा ठोठावण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या गुन्ह्यातील मुख्य आरोपी मोहन मारुती चांगले याचा २०१३ मध्ये खून झाला असून, गिरीश अप्पू शेट्टी (रा. दहिपूर, नेहरु चौक) याची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता झाली.

- Advertisement -

तत्कालीन वाहतूक पोलीस हवलादार रवींद्र पानसरे यांच्या फिर्यादीनुसार, २६ फेब्रुवारी २००७ रोजी रात्री 7.45 वाजेदरम्यान सीबीएस चौकातील पद्मा हॉटेलजवळ टोळक्याने दहशत माजविली. टोळक्याने केबलधारक मिलिंद दोंदे यास हप्ता वसुलीवरून मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यावेळी कर्तव्यावर असलेले पानसरे व वॉर्डन शेख वाद सोडविण्यासाठी गेले. आरोपींनी त्यांच्याकडील चाकू, वस्तारे, लाठ्याकाठ्या, दांडक्यांसह लाथाबुक्क्यांनी दोंदे, वाहतूक पोलीस पानसरे, व शेख या तिघांना मारहाण केली. त्याते ते जखमी झाले. त्यानंतर टोळक्याने टिळकवाडीतील हातगाड्या, बाफना ज्वेलर्स, रेमंड शोरुम, सखी शोरुमच्या काचा फोडून दुकानातील फर्निचरचे नुकसान करीत दहशत माजविली होती. याप्रकरणी सरकारवाडा पोलिसात आरोपींविरोधात प्राणघातक हल्ल्यासह सरकारी कामात अडथळा, सरकारी कर्मचार्‍यास दुखापतीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गुन्ह्याचा तपास तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक वाय.एच. भामरे, सहायक पोलीस आयुक्त ए.पी. गुरळे, सहायक पोलीस आयुक्त एस. व्ही. थोरात, पोलीस निरीक्षक एन.के. मिटकर यांनी करीत न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. खटला जिल्हा व सत्र न्यायधीश मलकापट्टे रेड्डी यांच्यासमोर चालला. सरकार पक्षातर्फे सहायक सरकारी अभियोक्ता रवींद्र निकम, अपर्णा पाटील यांनी कामकाज पाहताना १० साक्षीदार तपासले. गुन्ह्याची व्याप्ती व परिस्थितीजन्य पुरावे याआधारे न्यायाधीश रेड्डी यांनी चार आरोपींना दोषी ठरवून तीन वर्षे सक्तमजुरी व प्रत्येकी ५ हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावली. पैरवी अधिकारी म्हणून पोलीस हवालदार एम.ए. पवार, हवालदार डी. बी. खैरनार यांनी पाठपुरावा केला.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -