घरमहाराष्ट्रसंभाजी ब्रिगेड आणि आम्ही लढू आणि जिंकू, महाराष्ट्राच्या दुश्मनांनो, याद राखा! सामनातून...

संभाजी ब्रिगेड आणि आम्ही लढू आणि जिंकू, महाराष्ट्राच्या दुश्मनांनो, याद राखा! सामनातून विजयाचा निर्धार

Subscribe

शिवसेना आणि संभाजी यांनी नुकतचं आगामी निवडणुका एकत्र लढण्याचे जाहीर करत युतीची घोषणा केली. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपण एकत्र येऊन नवा इतिहास घडवूया. मराठ्यांना दुहीचा शाप गाडत आला आहे. दुहीची बीजे खडकावर जरी फेकली तरी त्याची पाळमुळं खोलवर रुजून तमाम दौलत खाक करून टाकते. आपण या दुहीच्या शापाला गाडून टाकू असा निर्धार व्यक्त केला. ज्यानंतर आता सामना अग्रलेखातूनही शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड एकत्र लढून जिंकणार असा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे. शिवसेनेच्या सोबतीला आता संभाजी ब्रिगेड आहे. छत्रपती संभाजींच्या नावानेही दिल्लीच्या बादशाहीचा थरकाप होत असे. ते खरे धर्मवीर होते. त्या धर्मवीराने धर्मरक्षणासाठी, महाराष्ट्रासाठी हौतात्म्य पत्करले. छत्रपती संभाजीराजांच्या हौतात्म्याच्या ठिणग्यांतून महाराष्ट्रात स्वाभिमान आणि क्रांतीचा वणवा पेटला. महाराष्ट्र लढत राहिला व जिंकला. आता संभाजी ब्रिगेड आणि आम्ही त्याच महाराष्ट्र स्वाभिमानाच्या क्रांतीचा वणवा पेटविण्यासाठी एकत्र आलो आहोत. आम्हीही जिंकू. नक्कीच जिंकू! महाराष्ट्राच्या दुश्मनांनो, याद राखा!”, असं म्हणत सामनातून विजयाची ललकारी देण्यात आली आहे.

शिवसेनेप्रमाणेच संभाजी ब्रिगेडही महाराष्ट्रातील सळसळत्या रक्ताची संघटना आहे. माँसाहेब जिजाऊ, छत्रपती शिवाजीराजे, छत्रपती संभाजीराजे यांच्या सामाजिक, राजकीय, लोककल्याणकारी आणि महाराष्ट्र धर्माशी इमान राखणाऱ्या संभाजी ब्रिगेडने कठीण काळात शिवसेनेस प्रेमाचे आलिंगन द्यावे यापेक्षा मोठा राजधर्म कोणता असेल? महाराष्ट्र हित रक्षणासाठी, राज्याच्या स्वाभिमान रक्षणासाठी शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड एकत्र येणे ही राज्यातील मोठय़ा परिवर्तनाची चाहुल आहे. आज शिवसेनेच्या पाठीत चाळीस खंजीर तथाकथित हिंदुत्ववाद्यांनी खुपसले आहेत. छत्रपती संभाजीराजांचे औरंगजेबाने हालहाल केले. कारण राजे धर्मरक्षक होते. दिल्लीच्या बादशहाने छत्रपती शिवरायांना दिल्लीत बोलावून अपमानित केले व नंतर बंदी बनवले. कारण छत्रपती शिवराय हे हिंदवी स्वराज्य संस्थापनाचे कार्य हाती घेऊन दिग्विजयाच्या दिशेने झेपावले होते. शिवसेना ही प्रखर हिंदुत्ववादी शिवराय-संभाजीराजेप्रेमी संघटनादेखील दिल्लीतील बादशाहीच्या डोळय़ात खुपू लागली आहे. म्हणूनच शिवसेनेच्या पाठीत चाळीस खंजीर खुपसून महाराष्ट्राच्या भूमीत बेइमानी व दुहीचे बीज त्यांनी फेकले. या कठीण समयी संभाजी ब्रिगेडसारखी जहाल, सळसळत्या रक्ताची संघटना भावाच्या मायेने पाठीशी उभी राहिली याची नोंद इतिहासाला घ्यावीच लागेल. सर्वत्र गद्दारीचा मुसळधार सुकाळ सुरू आहे. अशा शब्दात सामनातून बंडखोर आमदारांविरोधात टीकास्त्र डागण्यात आले आहे.

- Advertisement -

इमानाचे शेपूट आत घालून जो तो आपल्या बेइमानीचे सर्टिफिकेट दाखवण्यासाठी पुढाकार घेत असताना गेल्या पंचविसेक वर्षांपासून महाराष्ट्राच्या गावखेडय़ात काम करणाऱ्या संभाजी ब्रिगेडने शिवसेनेचा हात पकडला आहे हे शुभ लक्षण आहे. संभाजी ब्रिगेडचे प्रमुख मनोज आखरे यांनी स्पष्टच सांगितले, आम्ही महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र येत आहोत, ते सत्यच आहे. संभाजी ब्रिगेडशी संवाद आणि युती ही फक्त सुरुवात आहे. आणखी काही महत्त्वाचे घटक लवकरच एकत्र येतील व स्वाभिमान अभिमानासाठी रणशिंग फुंकले जाईल. सर्व राजकीय मतभेदांपलीकडे जाऊन महाराष्ट्र हिताच्या शिखराकडे पाहायला हवे. दुसऱ्या महायुद्धात जी राष्ट्रे एकमेकांविरुद्ध उभी ठाकली होती, एकमेकांच्या मोठय़ा प्रमाणावरील विनाशास कारणीभूत झाली होती, तीच राष्ट्रे आज इतिहास आणि वैर विसरून एकमेकाला नव्याने सहकार्य करण्यास पुढे आली आहेत. या एकाच उदाहरणावरून महाराष्ट्र स्वाभिमान्यांना धडा घेता येईल. दुसऱ्या महायुद्धामध्ये जी राष्ट्रे बेचिराख झाली होती त्यांनीही परस्परांतील भेदाभेद विसरून आपापल्या राष्ट्रांची पुनर्बांधणी केली आणि जुन्या दुश्मनांशी मनोमिलन केले. इतिहासातील किंवा भूतकाळातील काही घटनांना जाणीवपूर्वक कोळशाप्रमाणे उगाळत बसण्यात अर्थ नाही हे आता ध्यानी घेतले पाहिजे. आज महाराष्ट्र स्वाभिमान्यांची बरीचशी शक्ती धर्म आणि जात यांच्या नावाने शिमगा करीत, एकमेकाला डिवचण्यात, हल्ले करण्यात खर्ची पडत आहे. त्यातून एकमेकांचेच बळ कमी होत आहे आणि याचाच फायदा भाजपसारखे लोक देशभर घेतात, हे लक्षात घ्यायला हवे. दुसरे असे की, हे आजचे भाजपवाले व त्यांचे सध्याचे 40-50 ‘खोके हराम’ मांडलिक ऊठसूट शिवरायांचे नाव घेत असतात, पण राष्ट्रभक्तीसाठी निःस्वार्थ भावनेने केलेली इतिहासाची उजळणी वेगळी, शिवराय-संभाजीराजांचे नामस्मरण वेगळे आणि या ना त्या मतलबी कारणाने शिवरायांचे नाव घेणे वेगळे. आज मतलबापोटी शिवरायांचे जपज्याप सुरू आहेत. या सर्व ढोंगावर प्रहार करण्यासाठी संभाजी ब्रिगेड नामक मर्द मावळय़ांची फौज शिवसेनेच्या सोबतीस आली आहे. असही सामनात नमूद करण्यात आले आहे.

संभाजी ब्रिगेडचे श्री. पुरुषोत्तम खेडेकर हे महाराष्ट्र धर्म मानतात. ते प्रबोधनकार ठाकरे यांच्या सामाजिक विचारांचे पाईक आहेत. प्रबोधनकार हिंदुत्वाचे झुंजार शिपाईगडी होतेच. त्यामुळे जास्तीत जास्त एकमतावर दोन लढाऊ संघटनांची ‘युती’ झाली आहे, असे समजा! नाहीतरी ज्या भाजपबरोबर आम्ही पंचवीस वर्षे हिंदुत्वाच्या नावाने नांदलो, त्यांनी तरी हिंदुत्वाचा असा कोणता दिवा पेटवला? राजकीय स्वार्थाचाच सगळा बाजार आणि लिलाव होता. तिकडे कश्मीरात भाजपने तर फुटीरतावादी मेहबुबा बाईच्या पक्षाशी असंग केला आणि वर हीच मंडळी जगाला हिंदुत्वाचे पाठ पढवत आहेत. नाही म्हटले तरी राम मंदिर वगैरे विषयांना विरोध करणाऱ्या नितीश कुमारांशी त्यांनी बिहारात ‘पाट’ लावलाच होता व नंतर त्यांच्या पाठीत खंजीरही खुपसला. सध्याच्या भाजप मंडळींना शिवसेनाप्रमुखांच्या प्रेमाचा खोटा उमाळा आलाच आहे म्हणून बाळासाहेबांचा एक सत्य विचार सांगतो. ‘घातकी मित्रांपेक्षा दिलदार शत्रू बरा!’ असे बाळासाहेब म्हणत. आता ‘आपण नक्की कोण?’ हे भाजपने ठरवायचे. यांना ना हिंदुत्व प्यारे ना शिवराय. यांना फक्त सत्ता प्यारी आहे. त्या सत्तेसाठी त्यांनी महाराष्ट्राच्या इज्जतीशी खेळ सुरू केला. अर्थात अशा गद्दारांना महाराष्ट्र अनेकदा पुरून उरला आहे. शिवसेनेच्या सोबतीला आता संभाजी ब्रिगेड आहे. छत्रपती संभाजींच्या नावानेही दिल्लीच्या बादशाहीचा थरकाप होत असे. ते खरे धर्मवीर होते. त्या धर्मवीराने धर्मरक्षणासाठी, महाराष्ट्रासाठी हौतात्म्य पत्करले. त्या काळात औरंगजेबाकडे ‘ईडी’चा खंजीर नव्हता. नाहीतर त्याने त्याचाही वापर केला असता. छत्रपती संभाजीराजांच्या हौतात्म्याच्या ठिणग्यांतून महाराष्ट्रात स्वाभिमान आणि क्रांतीचा वणवा पेटला. महाराष्ट्र लढत राहिला व जिंकला. आता संभाजी ब्रिगेड आणि आम्ही त्याच महाराष्ट्र स्वाभिमानाच्या क्रांतीचा वणवा पेटविण्यासाठी एकत्र आलो आहोत. आम्हीही जिंकू. नक्कीच जिंकू! महाराष्ट्राच्या दुश्मनांनो, याद राखा! अशा शब्दात त्यांनी बंडखोर आमदारांना आणि भाजपला थेट आव्हानचं दिले आहे.


महामार्गांवरील वाहतूक कोंडीची मुख्यमंत्र्यांकडून दखल, मनुष्यबळ वाढविण्याचे निर्देश

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -