घरमहाराष्ट्र'काँग्रेस बुडवायची सुपारी काँग्रेसच्याच लोकांनी घेतली'; शिवसेनेचं रोखठोक मत

‘काँग्रेस बुडवायची सुपारी काँग्रेसच्याच लोकांनी घेतली’; शिवसेनेचं रोखठोक मत

Subscribe

काँग्रेसच्या बिकट अवस्थेवर शिवसेनेने ‘सामना’ या मत्यांच्या मुखपत्रातून भाष्य केलं आहे. काँग्रेस बुडवाची सुपारी काँग्रेसच्याच लोकांनी घेतली आहे. काँग्रेसचे माजी अध्यक्ष खासदार राहुल गांधी वाड्याची डागडूजी करु इच्छितात. पण जुने लोक त्यांना ते करु देत नाहीत, असं शिवसेनेने म्हटलं आहे. तसंच, काँग्रेसमध्ये बोलघेवड्यांची कमी नाही आहे. सिद्धू सारख्या उपऱ्यावर विश्वास टाकायला नको होता, असं सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे.

काँग्रेस नेतृत्वास कधी उमगणार?

“काँग्रेस पक्षाने उसळी मारून उठावे, मैदानात उतरावे, नवचैतन्याची बहार राजकारणात आणावी अशी लोकभावना आहे. त्यासाठी काँग्रेसला आधी पूर्णवेळ अध्यक्ष हवाच. डोकेच नसेल तर शरीराचा काय फायदा? सिद्धू, अमरिंदर यांची मनधरणी करण्यात अर्थ नाही. पंजाबात काँग्रेस फोडून भाजपास विधानसभा गिळायची आहे, हा विनोदच म्हणावा लागेल. काँग्रेसशिवाय भाजपासही जिंकता येत नाही आणि भाजपासही काँग्रेसचे टॉनिक लागते. पण हे काँग्रेस नेतृत्वास कधी उमगणार?” असा सवाल शिवसेनेने केला आहे.

- Advertisement -

काँग्रेसची हालत ‘पतली’ झाली

“गेल्या सात-आठ वर्षांपासून काँग्रेसची अवस्था बरी नाही. नरेंद्र मोदींच्या वादळापुढे, भाजपच्या विस्तारामुळे काँग्रेसची हालत ‘पतली’ झाली व काँग्रेसच्या वाड्यातील उरलेसुरले वतनदारही सोडून चालले आहेत. पंजाबचा सुभा याक्षणी मुळापासून हादरला आहे. काँग्रेस श्रेष्ठींनी कॅ. अमरिंदर सिंग यांना मुख्यमंत्रीपदावरून दूर केले. नवे मुख्यमंत्री चरणजित सिंग चन्नी आणि त्यांचे नवे मंत्रिमंडळ सत्तेवर आले. प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांनी या बदलानंतर पेढे वाटले. आनंदाने त्यांनी भांगडा केला, पण या उठवळ, बेभरवशाच्या सिद्धू यांनीच आता प्रदेश काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन काँग्रेसपुढील संकट वाढवले आहे. सिद्धू यांच्या सततच्या कटकटीमुळे कॅ. अमरिंदर यांना दूर केले गेले. आता सिद्धूही गेले. काँग्रेसच्या हाती काय उरले? तिकडे ७९ वयाचे कॅ. अमरिंदर हे दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना भेटले. कॅ. अमरिंदर हे भाजपात जातील, असे सांगितले जात होते, पण त्या शक्यतेला खुद्द अमरिंदर यांनीच पूर्णविराम दिला आहे. मात्र आपण काँग्रेसमध्येही राहणार नाही, असेदेखील त्यांनी म्हटले आहे. तेव्हा ते स्वतःचा नवा पक्ष स्थापन करून काँग्रेसला खड्ड्यात टाकतील, असे दिसत आहे,” असं अग्रलेखात म्हटलं आहे.

सिद्धूसारख्या उपऱ्या बोलघेवड्यांवर विश्वास टाकण्याची गरज नव्हती

“पंजाबात दलित मुख्यमंत्री करून राहुल गांधी यांनी एक जोरदार पाऊल टाकले ते त्यांच्या प्रिय सिद्धूने अडकवले. काँग्रेस पक्षात मूळच्याच बोलघेवडय़ांची कमी नसताना सिद्धूसारख्या उपऱया बोलघेवडय़ांवर फाजील विश्वास टाकण्याची गरज नव्हती,” असं मत व्यक्त करण्यात आलं आहे.

- Advertisement -

राहुल गांधी वाड्याची डागडुजी करू इच्छितात पण

“जुने वतनदार नव्या लोकांना संधी मिळू देत नाहीत. वाडा पडका झाला असला तरी त्यातील खिडक्या, दरवाजे, पंखे, पलंग, झुंबरांवर मालकी हक्क सांगून त्या वाडय़ातच ते पथारी पसरून बसले आहेत. राहुल गांधी वाड्याची डागडुजी करू इच्छितात. वाड्यास रंगरंगोटी करू पाहतात, गळकी भोके बुजवू पाहतात. पण जुने लोक राहुल गांधींना ते करू देत नाहीत. राहुल गांधींना रोखण्यासाठी हे लोक आतून भाजपसारख्या पक्षाशी हातमिळवणी करतात हे आता पक्के झाले आहे,” असं रोखठोक मत शिवसेनेने मांडलं आहे.

काँग्रेसला कायमस्वरूपी अध्यक्ष द्या

“काँग्रेस बुडवायची सुपारी काँग्रेसच्याच लोकांनी घेतली हे मान्य, पण काँग्रेसला कायमस्वरूपी अध्यक्ष द्या. पक्षाला सेनापतीच नाही तर लढायचे कसे? ही जुन्याजाणत्या काँग्रेसवाल्यांची मागणीही चुकीची नाही. काँग्रेस पक्षात नेता कोण, हा प्रश्न आहेच. गांधी परिवार आहे. पण नेता कोण? अध्यक्ष कोण? याविषयी भ्रम असेल तर तो दूर करायला हवा. एखादा बडा नेता पंजाबात जाऊन बसेल व मामला खतम करेल असा कोणी आहे काय? कन्हय्या कुमार, जिग्नेश मेवानीसारखे तरुण काँग्रेस पक्षात आले. गुजरातचा हार्दिक पटेलही आलाय. पण त्यामुळे काँग्रेस उसळी मारू शकेल काय?” असं अग्रेलखात म्हटलं आहे.

काँग्रेस पक्ष आजारी

“कॅ. अमरिंदर, लुईझिन फालेरो यांना मुख्यमंत्रीपदासारखे सर्वोच्च पद पक्षाने देऊनही हे लोक काँग्रेस सोडायला धजावतात हा निगरगट्टपणाचा कळस झाला. जितीन प्रसाद यांना काँग्रेसने केंद्रात मंत्रीपद दिले होते. हे प्रसाद भाजपात गेले व त्यांना उत्तर प्रदेशात मंत्री केले. भाजपकडे मंत्रीपदे वाटण्याची क्षमता आहे म्हणून आज लोक त्यांच्याकडे जात आहेत. त्याला सूज येणे असे म्हणतात. अर्थात काँग्रेसची ही सूज जरा जास्तच उतरली आहे आणि त्यामुळे काँग्रेसचे काय होणार, असा घोर लागला आहे. काँग्रेस पक्ष आजारी आहे. त्यासाठी उपचारही सुरू आहेत, पण ते चुकीचे आहेत का, याचा विचार व्हायला हवा,” असा सल्ला देखील शिवसेनेने सामनाच्या अग्रलेखातून दिला आहे.

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -