घरनवरात्रौत्सव 2022घटस्थापनेपासून सप्तशृंगी देवी मंदिर होणार खुले

घटस्थापनेपासून सप्तशृंगी देवी मंदिर होणार खुले

Subscribe

भगवतीच्या अतिप्राचीन, विलोभनीय स्वयंभू स्वरूपाचे होणार भाविकांना दर्शन

कळवण : महाराष्ट्रातील देवीच्या साडेतीन शक्तिपीठांपैकी आद्य स्वयंभू शक्तीपीठ श्री क्षेत्र सप्तशंगगड येथील श्री सप्तशृंगी देवीच्या मुर्ती संवर्धन व देखभालीचे काम पूर्ण झाले असून घटस्थापनेपासून (दि.२६ सप्टेंबर) भाविकांना दर्शनासाठी मंदिर खुले करण्यात येणार आहे. दरम्यान, श्री भगवतीचे अतिप्राचीन,विलोभनीय व स्वयंभू स्वरूप लवकरच सर्वसामान्य भाविकांच्या दर्शनासाठी उपलब्ध होणार असल्याने भाविकांमध्ये चैतन्य निर्माण झाले आहे.

सप्तशृंगी देवीच्या मूळ स्वरूपाच्या संवर्धनासाठी विश्वस्त संस्थेच्या वतीने वर्ष २०१४ पासून प्रयत्न सुरू केले होते.त्याअंतर्गत श्री भगवती स्वरुप, मूर्ती संवर्धन व देखभाल कामकाजाच्या अनुषंगाने विश्वस्त संस्थेच्या वतीने महत्वपूर्ण निर्णय आणि त्यासंबंधित नियोजन सुरू केले. वेळोवेळी शासनाच्या पुरातत्व विभाग, आय. आय. टी, पवई, (मुंबई) यांसह पुरातत्व विभागाच्या मार्फत अधिकृत असलेल्या मे. अजिंक्यतारा कन्सल्टंसी, नाशिक यांच्यामार्फत केलेले प्रत्यक्ष निरीक्षणे आणि अहवालानुसार जिल्हा प्रशासनाशी योग्य ती चर्चा विनिमय व समन्वय साधून अंतिम निर्णयासह दि. २१ जुलैपासून विश्वस्त संस्थेच्या वतीने श्री भगवती मूर्ती, स्वरुप संवर्धन व देखभाल प्रक्रियेचे काम प्रत्यक्षात सर्व धार्मिक पूजा विधीच्या पूर्ततेनंतर सुरु करण्यात आले. तज्ञांच्या मार्गदर्शन व प्रत्यक्ष उपस्थितीत श्री भगवती स्वरूप, मूर्ती संवर्धन प्रक्रिया सुरू केल्यानंतर श्री भगवतीच्या स्वरूपावरील मागील कित्येक वर्षांपासून साचलेला शोंदूर लेपनाचा भाग (कवच) हा धार्मिक व शास्त्रोक्त पध्दतीने काढण्यात आला. आणि त्यामागे श्री सप्तश्रृंगी भगवतीची अतिप्राचीन व स्वयंभू स्वरूपातील मूर्तीसमोर आली. वर्षानुवर्षे श्री भगवतीच्या स्वरूपावर धार्मिक विधी व पंचामृत अभिषेक दरम्यान केलेल्या शेंदूर लेपनाच्या मागे आढळून आलेले श्री भगवतीचे अतिप्राचीन, विलोभनीय व स्वयंभू स्वरूप लवकरच सर्वसामान्य भाविकांच्या दर्शनासाठी उपलब्ध होणार आहे.

- Advertisement -

मात्र, त्यापूर्वी शनिवार (दि. १०) पासून पितृपक्ष सुरू होत असल्यामुळे शास्त्रानुसार सद्यस्थितीत भाविकांना लवकरात लवकर श्री भगवतीचे दर्शन उपलब्ध करून देण्यासाठी शारदीय नवरात्र सुरू होण्यापूर्वी काही आवश्यक धार्मिक विधी पूर्ण होणे आवश्यक आहेत.म्हणून संस्थानचे वतीने पितृपक्षापूर्वी आवश्यक ते सर्व धार्मिक पूजाविधी दि. ६ ते दि. ८ दरम्यान पूर्ण करून शारदीय नवरात्रीच्या प्रथम दिनी अर्थात सोमवारी (दि. २६) श्री भगवती मंदिर हे भाविकांना श्री सप्तश्रृंगी देवीच्या प्रत्यक्ष दर्शनासाठी खुले करण्याचे नियोजन ट्रस्टचे वतीने करण्यात आले आहे.

त्यासाठी विविध धार्मिक पीठातील विद्वान तसेच श्री क्षेत्र काशी येथील धर्मशास्त्र पारंगत पं.गणेश्वरशास्त्री द्रविड, श्रीक्षेत्र नाशिक येथील स्मार्त चूडामणि पं.शांताराम शास्त्री भानोसे, श्रीक्षेत्र सप्तशृंगगड येथील पुरोहित संघाच्या मार्गदर्शना प्रमाणे हे सर्व धार्मिक विधी निर्धारित केलेले आहेत.यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत यावेळी पं. शांताराम शास्त्री भानोसे, विश्वस्त अ‍ॅड. ललित निकम, भूषण तळेकर, कळवणचे नगराध्यक्ष कौतिक पगार, मिलिंद दीक्षित, बाबा दीक्षित, भगवान नेरकर, जनसंपर्क अधिकारी भिकन वाबळे, राजेश गवळी, संदीप बेनके, सुभाष राऊत उपस्थित होते.

- Advertisement -

तीन दिवस पूजाविधी

दरम्यान मंगळवार दि.६ ते गुरुवार दि.८ दरम्यान पूर्व नियोजनाप्रमाणे श्री भगवती मंदिरात सहस्त्र कलश महास्नपन विधी, संप्रोक्षण विधी, उदक शांति, शांतिहोम, इत्यादी धार्मिक पूजा विधींचे आयोजन महाराष्ट्रातील तज्ञ पुरोहितांकडून करण्यात येणार आहे आणि संपूर्ण पितृपक्षात १६०० देवी अथर्वशीर्ष पाठांचे अनुष्ठान भगवतीचे सान्निध्यात सर्व भक्तांच्या कल्याणासाठी म्हणून नवरात्रीपूर्वी संपन्न होणार आहेत. त्यानंतर सर्व भाविकांना श्री भगवती मंदिर सोमवार दि. २६ सप्टेंबर अश्विन शु. १ घटस्थापनेपासून दर्शनासाठी खुले होणार असल्याची माहिती ट्रस्ट व्यवस्थापनाने दिली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -