घरमहाराष्ट्रबचतगटांची उत्पादने आता ई – कॉमर्सवर

बचतगटांची उत्पादने आता ई – कॉमर्सवर

Subscribe

बचतगटांना जागतिक बाजारपेठ मिळवून देणाऱ्या या ई - कॉमर्स व्यासपीठाचे राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या हस्ते आणि ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज ‘महालक्ष्मी ई-सरस’ या मोबाईल अॅपचे अनावरण करण्यात आले.

अॅमेझॉन, फ्लिपकार्टच्या धरतीवर बचतगटांची उत्पादने आता ‘महालक्ष्मी ई-सरस’ या मोबाईल अॅप तसेच वेबसाईटवर उपलब्ध होणार आहेत. बचतगटांना जागतिक बाजारपेठ मिळवून देणाऱ्या या ई – कॉमर्स व्यासपीठाचे राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या हस्ते आणि ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज अनावरण करण्यात आले. प्राथमिक टप्प्यात या अॅपवर बचतगटांची ५० उत्पादने उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. या माध्यमातून राज्यातील महिला बचतगट चळवळीला तसेच ग्रामीण अर्थव्यवस्थेला मोठ्या प्रमाणात चालना मिळेल, असा विश्वास राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी यावेळी व्यक्त केला.

बीकेसी येथील एमएमआरडीए मैदानावर आज बचतगट आणि ग्रामीण कारागीरांच्या उत्पादनांच्या महालक्ष्मी सरस प्रदर्शनाचे राज्यपाल राव यांच्या हस्ते आणि ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन करण्यात आले. आजपासून ४ फेब्रुवारीपर्यंत हे प्रदर्शन आणि विक्रीकरता सुरु राहणार आहे. प्रदर्शनात देशभरातील बचतगट सहभागी झाले असून ५११ स्टॉलच्या माध्यमातून ते उत्पादनांची विक्री करणार आहेत. याशिवाय खाद्यपदार्थांचे ७० स्टॉल असून त्यातून मुंबईकरांना वेगवेगळ्या खाद्यसंस्कृतींचा आस्वाद घेता येणार आहे.

- Advertisement -

बचतगटांनी इन्शुरन्स, बँकिंग, सेवा क्षेत्रातही यावे – राज्यपाल

गेल्या पाच वर्षांमध्ये महालक्ष्मी सरस अंतर्गत महिला बचतगटांनी लक्षणीय प्रगती केली आहे. महिला बचतगटांची उत्पादने आता वर्षभर मिळू लागली आहेत. आज अॅमेझॉन, फ्लिपकार्ट यांसारखे रिटेलर्स तसेच डीपार्टमेंटल स्टोर्स देखील बचतगटांची उत्पादने ठेऊ लागली आहेत. हा बचतगट चळवळीचा मोठा विजय आहे. महिला बचतगटांमुळे राज्यातील महिलांची मोठी सामाजिक आणि आर्थिक प्रगती झाली आहे, असे गौरवोद्गार राज्यपालांनी यावेळी काढले. देशाच्या आर्थिक विकासात सेवा क्षेत्र, उत्पादन क्षेत्र आणि कृषी क्षेत्र या तीन प्रमुख क्षेत्रांचे मोठे योगदान आहे. महिला बचतगटांनी आता कृषी आणि ग्रामीण उत्पादनांसोबत इन्शुरन्स, बँकिंग तसेच इतर सेवा क्षेत्रात देखील यावे. आज सेवा क्षेत्र वेगाने वाढत आहे. त्यामुळे महिलांची आर्थिक प्रगती झपाट्याने होईल, असे ते म्हणाले. शासनाने याच ठिकाणी प्रदर्शनाला जोडून ‘ज्ञान कौशल्य केंद्र’ (Knowledge & Skills Centre) सुरु करावे, अशी सूचनाही त्यांनी यावेळी केली.

बचतगट चळवळीशी जोडली गेली ४० लाख कुटुंबे – पंकजा मुंडे

५० लाख रुपयांच्या उलाढालीपासून सुरु झालेली महालक्ष्मी सरस प्रदर्शनाची चळवळ मागील वर्षी १० कोटी रुपयांच्या उलाढालीपर्यंत पोहोचली आहे. यावर्षीही या प्रदर्शनातून बचतगट मोठी आर्थिक उलाढाल करतील. या प्रदर्शनात दुष्काळी भागातील नापिकीमुळे अडचणीत आलेल्या शेतकरी कुटुंबातील महिलाही सहभागी झाल्या आहेत. आपल्या उत्पादनांची विक्री करुन त्या आपले कुटुंब सावरत आहेत. महिला बचतगटांच्या अशा लाखो यशोगाथा आहेत. महिलांनी बचतगट चळवळीच्या माध्यमातून ग्रामीण अर्थव्यवस्थेला क्रांतिकारी अशी गती दिली आहे, असे गौरवोद्गार त्यांनी काढले.

- Advertisement -

८ लाख कुटुंबांना देण्यात आले प्रशिक्षण

बचतगटांच्या उमेद अभियानात राज्यात पुर्वी फक्त ८ जिल्ह्यांचा समावेश होता. मागील चार वर्षात राज्यातील २६ जिल्ह्यांचा या अभियानात समावेश करण्यात आला आहे. या जिल्ह्यांमध्ये उमेद अभियानांतर्गत साडेतीन लाख बचतगट काम करीत आहेत. ४० लाख कुटुंबे या अभियानाशी जोडली गेली असून त्यापैकी ८ लाख कुटुंबांना प्रशिक्षण देऊन व्यवसाय सुरु करण्यात आले आहेत. या कुटुंबातील महिला आता लघुउद्योजिका बनल्या आहेत, असेही पंकजा मुंडे यांनी यावेळी सांगितले.

यलो रिव्होल्युशन’चाही झाला प्रारंभ

राज्यात ज्याप्रमाणे सहकारी दूध संस्थांमार्फत शेतकऱ्यांचे दूध संकलन करुन त्याला शहरी बाजारपेठ उपलब्ध करुन दिली जाते. त्याच धर्तीवर ग्रामीण भागात कुक्कुटपालन करणाऱ्या महिला बचतगटांकडून उत्पादीत होणाऱ्या अंड्यांचे संकलन करुन त्यांना आता शहरी बाजारपेठ उपलब्ध करुन दिली जाणार आहे. यासाठीच्या अभियानाचाही आजच्या कार्यक्रमात प्रारंभ करण्यात आला. राज्यात झालेल्या हरित क्रांती, धवल क्रांतीसारखी ही पिवळी क्रांती (यलो रिव्होल्यूशन) असेल. यातून ग्रामीण अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळणार आहे.

सॅनिटरी नॅपकीनचे वाटप

अस्मिता फंडमधून बालगृहातील किशोरवयीन मुलींना मोफत सॅनिटरी नॅपकीन दिले जाणार आहेत. राज्यातील सुमारे ४ हजार मुलींना हे नॅपकिन्स दिले जातील. या मोहीमेचा शुभारंभही आज करण्यात आला. अस्मिता फंडमध्ये आतापर्यंत २२ लाख रुपये जमा झाले आहेत.


वाचा – ‘महालक्ष्मी सरस’ बचत गटांची हक्काची बाजारपेठ- पंकजा मुंडे


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -