घरमहाराष्ट्रजातीय तेढ निर्माण करण्याचा भाजपाचा प्रयत्न

जातीय तेढ निर्माण करण्याचा भाजपाचा प्रयत्न

Subscribe

शरद पवारांचा मोदी सरकारवर निशाणा

देश एकसंध कसा राहील, समाजातील सगळे घटक एका विचाराने कसे राहतील ही जबाबदारी राष्ट्रीय नेतृत्वाची आणि सरकारच्या प्रमुखांची असते, मात्र आज वेगळे चित्र आहे. माणसा-माणसांमध्ये अंतर निर्माण झाले असून देश एकसंध ठेवण्याचे आव्हान आपल्या सर्वांसमोर आहे. द काश्मीर फाईल्सवरून जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न भाजपाकडून सुरू आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला. कोल्हापूर येथे शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेसची संकल्प सभा पार पडली. यावेळी शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर निशाणा साधला.

यावेळी पवार यांनी मनसेप्रमुख राज ठाकरे यांचाही समाचार घेतला. शिवाजी महाराज सर्वांच्या मनात आहेत. महात्मा फुले यांनीच शिवाजी महाराजांचा इतिहास मांडला. त्यामुळे आम्हाला त्यांचे नाव घेण्याचा अभिमान वाटतो. फुले-शाहू-आंबेडकरांचे नाव घेण्यावर आक्षेप घेणार्‍यांना महाराष्ट्र समजलाच नाही, अशा शब्दांत त्यांनी राज ठाकरे यांच्यावर टीका केली.

- Advertisement -

शरद पवार म्हणाले की, २०१४च्या अगोदर देशाची स्थिती वेगळी होती. मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील सरकार होते. यावेळी देशासमोरील प्रश्न सोडवण्यासाठी एकत्रितपणे कष्ट घेतले. अनेक क्षेत्रांमध्ये देशाची उन्नती कशी होईल याची खबरदारी घेतली, मात्र त्यानंतर भाजपाच्या हातात सत्ता आली. लोकांचा कौल आम्ही स्वीकारला, परंतु सत्तेचा उपयोग सामान्य माणसात एकवाक्यता कशी राहील, लोकांचे दु:ख कमी कसे होईल यासाठी व्हायला हवा, पण आज चित्र वेगळे आहे. मागील काही दिवस दिल्लीच्या काही भागांत हल्ले, जाळपोळ झाली.

केजरीवाल यांच्या हातात दिल्लीची सत्ता आहे, पण दिल्लीचे गृहखाते त्यांच्या हातात नाही. गृहखाते हे भाजपाच्या म्हणजे अमित शहा यांच्या हातात आहे. त्यांनी देशाची राजधानी एका विचाराने एकसंध राहील याची खबरदारी घ्यायला हवी होती, पण ते घेऊ शकले नाहीत. दिल्लीत काही घडले तर त्याचा संदेश जगात जातो. त्यामुळे या देशात अस्थिरता आहे अशी भावना जगभरात निर्माण होते. तुमच्या हातात सत्ता आहे आणि तुम्हाला दिल्ली सांभाळता येत नाही, असाही सवाल पवार यांनी केला.

- Advertisement -

दोन दिवसांपूर्वी कर्नाटकमधील हुबळीमध्ये जातीय दंगली झाल्या. या ठिकाणी अल्पसंख्याकाचे दुकान आहे. त्या दुकानात कुणीही खरेदी करू नये, असे बोर्ड येथे लावले होते. हा संदेश देणारे लोक सत्ताधारी पक्षाचे आहेत. दिल्ली तसेच शेजारच्या राज्यात जिथे भाजपाची सत्ता आहे, तिथे हीच अवस्था आहे, असेही पवार म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -