धुळ्यात शिंदे गट विरुद्ध भाजपा? दादा भुसेंच्या मुलाचा उल्लेख भावी खासदार!

dada bhuse

नाशिक – नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांच्या मुलाचा भावी खासदार असा उल्लेख असलेला बॅनर नाशिकमध्ये झळकला आहे. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. दादा भुसे यांचे चिरंजीव अविष्कार भुसे यांच्याकडे युवासेनेची जबाबदारी आहे. पक्षातील बंडखोरीच्या आधीही ते युवासेना सांभाळत होते.

शिवसेनेत फूट पडल्यापासून विधानसभा आणि लोकसभेच्या उमेदवारांची चाचपणी सुरू कऱण्यात आली आहे. या दोन्ही निवडणुका युती करून होणार असल्याने कोणाला उमेदवारी मिळणार हे पाहावं लागणार आहे. दरम्यान, दादा भुसे यांच्या मुलाला धुळे लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. वाढदिवसानिमित्त लागलेल्या बॅनर्सवर अविष्कार भुसे यांच्या नावापुढे भावी खासदार असा उल्लेख झाल्याने चर्चांना बळ मिळाले आहे. नाशिक, मालेगवा, धुळ्यात हे पोस्टर्स लागले आहेत. सध्या धुळे लोकसभा मतदारंसघातून भाजपाचे डॉ. सुभाष भामरे खासदार आहे. मात्र, याच मतदारसंघातून अविष्कार भुसे यांनी दावा केल्यास याठिकाणी भाजपा-शिवसेना यांच्यात संघर्ष होण्याची शक्यता आहे.

नाशिक जिल्ह्यातील तीन, धुळे जिल्ह्यातील तीन विधानसभा आणि मालेगाव विधानसभा मतदारसंघ धुळे लोकसभा मतदारसंघात येतात. त्यामुळे धुळे लोकसभा मतदारसंघाचा विचार करताना मालेगावचाही अधिक विचार करावा लागतो. त्यामुळे येत्या लोकसभा निवडणुकीसाठी या मतदारसंघातून कोणाला उमेदवारी मिळतेय हे पाहावं लागेल.