घरमहाराष्ट्रविरोधी खासदारांचे निलंबन मागे! आजपासून संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन

विरोधी खासदारांचे निलंबन मागे! आजपासून संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन

Subscribe

सर्व खासदारांना कामकाजात सहभागी होता येणार

=३१ जानेवारी-अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू
=१ फेब्रुवारी-अंतरिम अर्थसंकल्पाचे सादरीकरण
=९ फेब्रुवारी-अर्थसंकल्पीय अधिवेशन संपणार
=१ एप्रिल-नवीन आर्थिक वर्षाची सुरुवात
=मे-जून- नव्या सरकारचा पूर्ण अर्थसंकल्प

बुधवारपासून संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे. तत्पूर्वी हिवाळी अधिवेशनादरम्यान गैरवर्तनाच्या कारणाखाली निलंबित केलेल्या सर्व विरोधी पक्षातील खासदारांचे निलंबन मागे घेत असल्याची माहिती मंगळवारी संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी सर्वपक्षीय बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली. काही सदस्यांचे निलंबन हिवाळी अधिवेशनापर्यंत तर काहींचे प्रकरण विशेषाधिकार समितीकडे पाठवण्यात आले होते.

- Advertisement -

त्यानुसार लोकसभेचे अध्यक्ष, राज्यसभेचे सभापती आणि संबंधित विशेषाधिकार समित्यांशी चर्चा करून आम्ही सर्व खासदारांचे निलंबन रद्द करण्याबाबत विनंती केली आहे. त्यानुसार निलंबित खासदार बुधवारपासून अर्थसंकल्पीय अधिवेशनात भाग घेण्यासाठी सभागृहात येऊ शकतात, असे प्रल्हाद जोशी यांनी सांगितले. संसदेतील घुसखोरीच्या मुद्यावरून मागील हिवाळी अधिवेशन प्रचंड वादळी ठरले होते. संसदेच्या दोन्ही सभागृहांत प्रचंड गदारोळ झाला होता. परिणामी गैरवर्तनाच्या नावाखाली दोन्ही सभागृहांतील विरोधी पक्षांच्या १४६ (१०० लोकसभा, ४६ राज्यसभा) खासदारांचे निलंबन करण्यात आले होते.

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी पक्षाकडून मंगळवारी संसद भवन परिसरातील ग्रंथालय इमारतीत सर्वपक्षीय बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे कामकाज सुरळीत चालवण्यासाठी सर्व पक्षांनी सहकार्य करण्याचे आवाहन सरकारतर्फे करण्यात आले. संरक्षणमंत्री आणि लोकसभेतील सभागृहाचे उपनेते राजनाथ सिंह, संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी आणि संसदीय कामकाज राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी बैठकीत सरकारचे प्रतिनिधित्व केले.

- Advertisement -

या बैठकीत काँग्रेस नेते कोडिकुनिल सुरेश, तृणमूल काँग्रेसचे सुदीप बंदोपाध्याय, द्रविड मुन्नेत्र कळघम (द्रमुक) नेते टीआर बालू, शिवसेनेचे राहुल शेवाळे, समाजवादी पक्षाचे नेते एसटी हसन, जनता दल (युनायटेड) नेते एस. टी. रामनाथ ठाकूर आणि तेलुगु देसम पार्टी (टीडीपी) जयदेव गल्ला यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते.

उद्या मोदी सरकारचा अंतरिम अर्थसंकल्प
यावर्षी लोकसभेची निवडणूक असल्यामुळे नियमित अर्थसंकल्प सादर केला जाणार नाही. १ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन अंतरिम अर्थसंकल्प सादर करतील. मोदी सरकारच्या दुसर्‍या कार्यकाळातील हा शेवटचा अंतरिम अर्थसंकल्प आहे. लोकसभा निवडणुकीनंतर नवीन सरकार जुुलै महिन्यातील पावसाळी अधिवेशनात नियमित अर्थसंकल्प सादर करेल.

नवीन संसदेत राष्ट्रपती मुर्मूंचा पहिला प्रवेश
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणाने ३१ जानेवारीला अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होईल. हे अधिवेशन ९ फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. राष्ट्रपतींचे अभिभाषण यावेळी संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये न होता नवीन संसद भवनातील लोकसभेच्या सभागृहात होणार आहे. या अधिवेशनानिमित्त राष्ट्रपती मुर्मू पहिल्यांदाच नवीन संसद भवनात प्रवेश करणार आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -