घरसंपादकीयवाणी संतांचीवाणी ज्ञानेश्वरांची

वाणी ज्ञानेश्वरांची

Subscribe

तैसा मीं जरी तुम्हांप्रती । चावटी करीतसें बाळमती । तरी तुम्ही संतोषिजे ऐसी जाती । प्रेमाची असे ॥
त्याचप्रमाणे मी जरी तुमच्याशी बालकाप्रमाणे विनोदाने वर्तन करतो, तरी तुम्हाला त्या माझ्या वर्तनापासून आनंदच झाला पाहिजे, असा प्रेमाचा गुण आहे;
आणि तेणें आपुलेपणाचेनि मोहें । तुम्हीं संत घेतले असा बहुवे । म्हणौनि केलिये सलगीचा नोहे । आभारु तुम्हां ॥
आणि त्या आपलेपणाच्या अभिमानाने तुम्ही संतजनानी अनेक प्रकारांनी मला ‘आपला’ असे म्हटले आहे. म्हणून माझ्या या सलगीचा आपणास विषाद (ओझे) होणार नाही.
अहो तान्हयाचें लागतां झटें । तेणें अधिकचि पान्हा फुटे । रोषें प्रेम दुणवटे । पढियंतयाचेनि ॥
अहो, वासराने ढुसण्या दिल्यावर गाईला ज्याप्रमाणे अधिकच पान्हा फुटतो, त्याप्रमाणे जो मनुष्य अत्यंत प्रिय असतो, त्याच्या रागावण्याने प्रेम दुप्पट होते.
म्हणौनि मज लेंकुरवाचेनि बोलें । तुमचें कृपाळूपण निदैलें । तें चेइलें ऐसें जी जाणवलें । यालागीं बोलिलों मी ॥
म्हणून मज लेकराच्या बोबड्या बोलानी तुमचे निजलेले कृपाळूपण जागे होईल, असे जाणून मी बोललो.
एर्‍हवीं चांदिणें पिकविजत आहे चेपणीं? । कीं वारया घापत आहे वाहणी? । हां हो गगनासि गंवसणी । घालिजे केवीं?॥
एर्‍हवी चंद्राचे चांदणे कोणी आढीत घालून पिकविलेले आहे काय? किंवा वार्‍याला वाहण्याकरिता कोणी गती दिली आहे का? तसेच आकाशाला कोणी गवसणी घातली आहे का?
आइकां पाणी वोथिजावे न लगे । नवनीतीं माथुला न रिगे । तेवीं लाजिलें व्याख्यान निगे । देखोनि जयातें ॥
ऐका, पाण्याला पातळ करावे लागत नाही आणि लोणी तयार झाल्यावर ते रवीने कोणी घुसळीत नाही. त्याचप्रमाणे गीतार्थाला पाहून माझे व्याख्यान लाजल्यामुळे माघारी येते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -