कांदा उत्पादक शेतकऱ्याला मिळतो अवघा ३ रुपये भाव, किरकोळ बाजारात १५ रुपयाने विक्री

दिलीप सूर्यवंशी । नाशिक

एकीकडे कांदा उत्पादक शेतकरी कंगाल होत असतांना किरकोळ भाजी विक्रेते मात्र मालामाल होत आहेत. बाजार समितीत शेतकर्‍याला कांद्याला प्रतिकिलो 3 रुपये भाव मिळत असतांना किरकोळ बाजारात कांदा 15 रुपये किलोने विकला जात आहे. यामुळे कांदा उत्पादक शेतकर्‍याच्या हातात दमडीही पडत नसतांना दुसरीकडे छोटे विक्रेते मात्र मालामाल होतांना दिसत आहे. एकीकडे कांदा उत्पादकाच्या हातात दमडी पडत नसतांना महागाईच्या झटक्यामुळे नाशिककरांच्या हातात दमडीही रहात नसल्याची स्थिती निर्माण झाली आहे.

बाजार समितीत कांद्याला भाव मिळत नसल्याने राज्यात सध्याकांद्यावरुन रणकंदन सुरु आहे. कांदा उत्पादक शेतकरी विरुध्द राज्य सरकार असा संघर्ष पहायला मिळत आहे. जागोजागाी रास्तारोको, चक्का जाम, शेतात रोटर फिरविणे अशाप्रकारची आंदोलने कांद्याला भाव मिळावा म्हणून करण्यात येत आहे. मात्र दुसरीकडे बाजारसमितीत कांद्याला 3 रुपये भाव मिळत असतांना किरकोळ बाजारात मात्र 15 रुपये किलोने कांदा विक्री होत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

बाजार समितीतील कांदा व्यापारी किलोला 3 रुपये भाव देत आहेत. मात्र दुसरीकडे किरकोळ विक्रेते हाच कांदा 5 रुपये किलोने विकत घेऊन 15 रुपये किलोने विक्री करत असल्याने शहरवासियांना हा कांदा 15 रुपयांना पडत आहे.
लाल कांदा म्हणजेच रांगडा कांदयात साठवण क्षमता नसते त्यामुळे तो साधारणत: 15 दिवसांत विक्री करावाच लागतो. यामुळे व्यापारी देखील किरकोळ भाजी विक्रेत्यांना हा कांदा कमी दरात विकत आहे. मात्र हे छोटे विक्रेते बाजारात, उपनगरांमध्ये, घरोघरी जाऊन 15 रुपये दराने विकत आहेत. 1 किलो दराला 15 रुपये भाव तर 4 किलो कांदा 50 रुपयांतही काही ठिकाणी विकला जात आहे. यामुळे घाऊक बाजारपेठेत कांदयाला भाव नसला तरी किरकोळ बाजारात कांदयाने भाव खाा आहे.

कांद्याला भाव मिळत नसल्याच्या बातम्या सध्या दररोज वर्तमानपत्रात, टीव्हीवर पहायला मिळत असतांना बिल्डींगमध्ये येणारा भाजी विक्रेता 15 रुपये किलोने कांदा विकतो. भाव नसूनसुध्दा 15 रुपये किलोने भाजीविक्रेता कांदा का विकतो? शेतकर्‍याला भाव का मिळत नाही, सरकार काय करत आहे? : प्रियंका खैरे, गृहिणी, पंचवटी

सध्या टीवी, वर्तमानपत्रात केवळ कांद्याच्या बातम्या दिसत आहे. कांद्याला 3 रुपये भाव मिळत असतांना भाजीविक्रेता मात्र 15 रुपयांनी कांदा विकत आहे. महागाईने अगोदरच झटका दिला असल्याने आता त्यात कांद्याची भर पडली आहे. शेतकरी, सर्वसामान्य माणूस दिवसेंदिवस गरीब होत असतांना मधल्या साखळीतील भाजी विक्रेताच पैसे कमवत आहे. : आलिशा गुंजाळ, गृहिणी, पंचवटी