फरार सराईत गुन्हेगार हद्दीत आला आणि गावठी कट्टा, जिवंत काडतूसांसह फिल्मी स्टाईलमध्ये घेतल ताब्यात

नाशिक : नाशिकरोड परिसरातील गोरेवाडी भागातील घरावर हल्ला करुन फरार झालेल्या सराईत गुन्हेगारास नाशिकरोड पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी त्याच्या ताब्यातून गावठी कट्टा व जिवंत काडतूस जप्त केले आहे. गणेश उर्फ छकुल्या मधुकर वाघमारे (२२, रा. ओढा रोड, अरिंगळे मळा, नाशिक) असे अटक केलेल्याचे नाव आहे.

गोरेवाडी भागात दहशत माजवत घरावर हल्ला केलेला गुन्हेगार हा ट्रॅक्शन मशीन कारखाना परिसरात येत असल्याची गोपनीय माहिती नाशिकरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांना मिळाल्यानंतर मंगळवारी (दि.१४) गणेश उर्फ छकुल्या वाघमारे हा फरार असलेला सराईत गुन्हेगार ट्रॅक्शन मशिन कारखाना परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली, त्यानुसार गुन्हे शोध पथकाने सापळा रचला. खात्री होताच पोलिसांनी संशयिताला पकडण्याचा प्रयत्न केला.

मात्र, तो पळून जात असताना त्याचा पाठलाग करुन ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडील एक गावठी कट्टा, १ जिवंत काडतूस असा ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. त्याच्या विरोधात आयुक्तालयात 10 गुन्हे दाखल असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांनी सांगितले. मंगळवारी (दि.१४) सायंकाळी झालेल्या पत्रकार परिषदेला पोलीस निरीक्षक गणेश न्हायदे, राजू पाचोरकर, उपनिरीक्षक जयेश गांगुर्डे, विशाल सपकाळे आदी उपस्थित होते.