घरमहाराष्ट्रसिमेंट काँक्रीटचे रस्ते बनविण्याची निविदा प्रक्रिया पारदर्शकच, पालिकेचा खुलासा

सिमेंट काँक्रीटचे रस्ते बनविण्याची निविदा प्रक्रिया पारदर्शकच, पालिकेचा खुलासा

Subscribe

मुंबई : सिमेंट काँक्रीटचे रस्ते बनविण्याची निविदा प्रक्रिया अत्यंत पारदर्शक असून रस्ते कामाच्या साधनसामग्रीच्या दरात वाढ झाल्याने सिमेंट रस्ते बनविण्याच्या खर्चात 17 टक्क्यांची वाढ झाली आहे, अशी ठोस भूमिका मुंबई महापालिकेने मांडली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने मुंबईतील 400 किमी लांबीचे रस्ते सिमेंट काँक्रीटचे बनविण्यासाठी पालिकेने टेंडर प्रक्रिया राबवली. या रस्ते कामांच्या खर्चात अचानकपणे 17 टक्के वाढ केल्याने रस्ते कामांचा खर्च 5 हजार कोटींवरून थेट 6 हजार कोटींवर गेला आहे. यावरून, युवासेनेचे नेते व माजी मंत्री, आमदार आदित्य ठाकरे यांनी, मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर पालिका लुटण्याचे व करदात्यांच्या पैशांची उधळपट्टी करण्यात येत असल्याचे गंभीर आरोप केले. त्यानंतर काही तासांतच पालिकेने याबाबत खुलासा केला आहे.

- Advertisement -

मुंबईत छोट्या कंपन्यांद्वारे बनविण्यात येणाऱ्या रस्ते कामांच्या दर्जाबाबत नागरिकांकडून सातत्याने प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत होते. त्यामुळे मुंबई महापालिकेने, मुंबईतील 400 किमी लांबीचे रस्ते सिमेंट काँक्रिटचे करण्यासाठी पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणातील निविदा आमंत्रित केल्या. राष्ट्रीय व राज्य स्तरावरील महामार्गांचे काम केल्याचा अनुभव असणाऱ्या संस्था या निविदांना प्रतिसाद देण्यासाठी पात्र होत्या. निविदाकारांकडे पुरेशी यंत्रसामुग्री असणे, मनुष्यबळ असणे, तांत्रिक कर्मचारी असणे आणि राष्ट्रीय व राज्य महामार्गांचे काम केल्याचा अनुभव असणे अपेक्षित होते. हे साध्य करण्यासाठी लहान कंपन्या एकत्र येऊन निविदा करावयाची संयुक्त उपक्रम पद्धती प्रतिबंधित करण्यात आली. या ठिकाणी आवर्जून नोंद घ्यायला हवी की, ही बाब लक्षात घेऊन महापालिकेने नवीन निविदा प्रक्रियेत सहभाग नोंदविण्यासाठी मोठ्या कंपन्यांना आमंत्रित केले, असा खुलासा पालिकेने केला आहे.

यापूर्वी निविदा आमंत्रित करताना त्या ‘संयुक्त दरसूची सन 2018नुसार करण्यात आल्या होत्या. सन 2018 ते नोव्हेंबर 2022 या कालावधीत झालेली किंमत वाढ लक्षात घेऊन रस्ते बांधकामासाठी आवश्यक असणाऱ्या विविध बाबींचे मूल्य सुधारित करण्यात आले. ही किंमतवाढ सध्या साधारणपणे 17 टक्के इतकी आहे. प्रत्यक्ष बाजारातील किमती या खूप जास्त असल्याने मोठ्या कंपन्या जुन्या दरांवर काम करण्यास तयार नव्हत्या. त्यामुळे बाजारमूल्यांशी अनुरुपता साधण्यासाठी महापालिकेने निविदा मूल्य आणि संबंधित दर सुधारित केले. या नवीन निविदेमध्ये रस्त्यांच्या गुणवत्तेवर अधिक लक्ष केंद्रीत करण्याच्या दृष्टीने अनेक नवीन व कठोर अटींचा समावेश करण्यात आला आहे, असेही पालिकेने स्पष्ट केले आहे.

- Advertisement -

पालिकेने पाच प्रकारच्या निविदा आमंत्रित केल्या असून त्यास चांगला प्रतिसाद लाभला असून निविदा प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आहे. निविदाकारांशी अंतिम टप्प्यातील वाटाघाटी सुरू आहेत. यानंतर साधारणपणे पुढील आठवड्यात कार्यादेश देण्यात येतील, असे पालिकेने स्पष्ट केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -