घरमहाराष्ट्रगावी जाण्यासाठी आले तीन लाख अर्ज

गावी जाण्यासाठी आले तीन लाख अर्ज

Subscribe

45 हजार परप्रांतियांची घरवापसी

मुंबई शहरात नोकरीसाठी आलेले आणि लॉकडाऊनमुळे काम मिळणे बंद झाल्याने गावी जाण्यासाठी आतापर्यंत तीन लाख परप्रांतियांनी मुंबई पोलिसांकडे अर्ज केले असून या अर्जाची शहानिशा केल्यानंतर बुधवारपर्यंत 45 हजार परप्रांतियांची घरवापसी करण्यात आली आहे.

मुंबई ही आपल्या देशाची आर्थिक राजधानी असल्याने गेल्या काही वर्षांत उत्तर प्रदेश, बिहार, कोलकाता, झारखंड, आंध्र प्रदेश, कर्नाटक राज्यासह इतर राज्यातील परप्रांतिय कामगार मुंबई शहरात नोकरीसाठी आले होते. मात्र लॉकडाऊनमुळे या कामगारांचे हाल सुरू झाले आणि त्यांनी आपल्या गावी जाण्याचा निर्णय घेतला, मुंबईत यापुढे आपला टिकाव लागणार नाही, त्यातच मुंबई शहरातील करोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. रोजगार नसल्याने हातात पैसा नाही. राहण्याचा कायमचा पत्ता नाही.

- Advertisement -

गरिबीमुळे उपासमारीची वेळ आल्याने आपला गाव बरा असा विचार करून आता संबंधित परप्रांतिय कामगार आपल्या गावाकडे जाण्यासाठी निघाले आहेत. मात्र राज्यातील प्रत्येक जिल्हा सील करण्यात आल्याने काहींचे गावी जाण्याचे प्रयत्न फसले. अनेक ठिकाणी या कामगारांना अडवून त्यांना तिथे क्वारंटाईन करण्यात आले आहे. त्यामुळे घरी जाण्यासाठी आता या परप्रांतिय कामगारांनी कायदेशीर मार्गाचा अवलंब सुरू केला आहे. आतापर्यंत तीन लाख कामगारांनी त्यांच्या गावी जाण्यासाठी मुंबई पोलिसांकडे रितसर अर्ज केला आहे.

संबंधित राज्याकडून या कामगारांसाठी एनओसी मिळाल्यानंतर 45 हजारांहून अधिक कामगारांना त्यांच्या गावी पाठविण्यात आले आहे. त्यासाठी विशेष बस, ट्रेन, ट्रक, टेम्पो आणि खाजगी वाहनांची मदत घेण्यात आली होती. पश्चिम उपनगरातील वांद्रे ते दहिसर परिसरात मोठ्या प्रमाणात कामगार वर्ग आहेत. याच परिसरातून आतापर्यंत मुंबई पोलिसांना 52 हजार अर्ज प्राप्त झाले आहे. दिवसेंदिवस अर्जांची संख्या वाढत असल्याचेही पोलीस खाजगीत सांगतात.

- Advertisement -

मंगळवारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, लोकमान्य टिळक टर्मिनस आणि बोरिवली रेल्वे स्थानकातून उत्तर प्रदेशातील जौनपूर, भागलपूर आणि गोरखपूर शहरात सुमारे साडेचार हजार कामगारांची घरवापसी करण्यात आली आहे. या सर्वांनी मुंबई पोलिसांचे विशेष आभार व्यक्त करताना ट्रेन सुटल्यानंतर मुंबई पोलीस झिंदाबाद अशा घोषणाबाजी केली होती. आगामी काळात इतर काही कामगारांना अशाच प्रकारे त्यांच्या घरी पाठविण्यात येणार आहे. आतापर्यंत 45 हजार कामगारांची घरवापसी झाल्याचेही एका अधिकार्‍याने बोलताना सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -