घरमहाराष्ट्रNilesh Rane : वेळ गेलेली नाही, अजूनही विचार करा...; निलेश राणेंचा भास्कर...

Nilesh Rane : वेळ गेलेली नाही, अजूनही विचार करा…; निलेश राणेंचा भास्कर जाधवांना सल्ला

Subscribe

सोशल मीडियावर निलेश राणे यांनी एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओच्या माध्यमातून त्यांनी भास्कर जाधव यांना काही गोष्टींबाबत विचार करण्याचा सल्ला दिला आहे.

मुंबई : ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी काल रविवारी (ता. 10 मार्च) चिपळूणमध्ये कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचे आयोजन केले होते. या मेळाव्याच्या माध्यमातून त्यांनी उद्धव ठाकरेंवर असलेली नाराजी उघडपणे बोलून दाखवली. त्याशिवाय सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. त्यांनी काल अनेक महत्त्वाचे खुलासे केले. ज्याबाबत शिवसेना नेते रामदास कदम यांनी प्रतिक्रिया देत भास्कर जाधव यांचे जे काही सुरू आहे, ते नाटक असल्याचे म्हटले. त्यानंतर आता त्यांच्या भाषणाबाबत भाजपाचे नेते आणि माजी खासदार निलेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सोशल मीडियावर निलेश राणे यांनी एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओच्या माध्यमातून त्यांनी भास्कर जाधव यांना काही गोष्टींबाबत विचार करण्याचा सल्ला दिला आहे. (Time has not passed, still think…; Nilesh Rane’s advice to Bhaskar Jadhav)

हेही वाचा… Bhaskar Jadhav : …अखेर भास्कर जाधवांनी मनातील खंत व्यक्त केलीच

- Advertisement -

निलेश राणे यांनी X या सोशल मीडियावरील त्यांच्या अधिकृत अकाउंटवरून व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हि़डीओच्या माध्यमातून त्यांनी भास्कर जाधव यांनी भाषणाच्या माध्यमातून खालच्या पातळीत टीका न केल्याने आणि भाषणाचा दर्जा न खालावल्याने समाधान व्यक्त केले आहे. तर मी सुद्धा तुम्हाला काका बोलायचो, आपल्या कुटुंबाचे जुने संबंध होते, असे सांगत निलेश राणे यांनीही जुन्या आठवणींना उजाळा दिल्याचे पाहायला मिळाले. परंतु, भास्कर जाधव यांना राणेंनी तुम्ही चिपळूणमध्ये राहूनही तुमचे सहकारी तुम्हाला का सोडून गेले? तुम्हाला साथ द्यायला कोणीही तयार नाही. असं का होतंय, याचा विचार करा, असे म्हटले आहे.

भास्कर जाधव यांच्या भाषणाबाबत बोलताना निलेश राणे म्हणाले की, भास्कर जाधव यांनी त्यांचे सहकारी त्यांना सोडून का गेले, यासाठी आत्मचिंतन केले पाहिजे. तुम्ही रडण्याचा कार्यक्रम बंद करा आणि कामाला लागा, तुमचे सहकारी तुमच्याकडे परततील की नाही बघा. मलाही तो काळ आठवतो, जेव्हा मी तुमच्या पाया पडायचो, तुम्हाला काका बोलायचो. मी देखील ते दिवस विसरलेलो नाही. तुमच्यासोबत अनेक आठवणी आहेत, त्या आम्ही आजही विसरलेलो नाही. पण तुम्ही असेच वागत राहिलात तर आमच्यासारखी तरुण मुले जी तुमच्याकडे काका म्हणून आदराने पाहत होती, ती तुमच्यापासून लांब गेली. तुम्ही डोंगरावर जाऊन एकटे बसा आणि या सगळ्याचा विचार करा. हा विचार करताना, ‘मी कोण आहे’ ही भावना बाजूला ठेवा, असा सल्ला निलेश राणे यांच्याकडून भास्कर जाधव यांना देण्यात आला आहे.

- Advertisement -

तर, आतातरी भास्कर जाधव यांनी चिपळूणच्या लोकांना खोट बोलून फसवू नये. हे त्यांचे खोटे बोलायचे वय नाही, असे सांगत निलेश राणे म्हणाले की, हे वय नातवंडांना खेळवण्याचे आहे. नेहमी तुमच्या मदतीसाठी कोणतातरी सहकारी धावून येणार, ही अपेक्षा ठेवू नका. आताचं राजकारण तसं राहिलेलं नाही. लोकांना आता खरं-खोटं समजतं. उद्धव ठाकरे हे तुम्हाला फक्त वापरुन घेणार, याची कल्पना तुम्हाला एव्हाना आली असेल. चिपळूणमधील मागच्या घटनेनंतर ही बाब तुमच्या लक्षात आली असेल. त्या घटनेनंतर महाराष्ट्रातील लोक तुम्हाला डोक्यावर घेतील, असे तुम्हाला वाटले होते. पण तसे काही झाले नाही. पण तुम्ही तुमच्याच दुनियेत मश्गूल असता, त्यामधून बाहेर पडा.

तुम्ही आजच्या भाषणात सहकाऱ्यांवर टीका केली. पण हे तुमच्याबद्दलच का होते, इतर नेत्यांबाबत का होत नाही, याचा कधीतरी विचार करा. निलेश राणे चिपळूणमध्ये राहत नाही, तरी चिपळूणमधील सहकारी माझ्यासोबत सावलीसारखे असतात. आज इतकी वर्षे होऊनही त्यांनी माझी साथ सोडलेली नाही. पण तुम्ही चिपळूणमध्ये राहूनही तुमचे सहकारी तुम्हाला का सोडून गेले? तुम्हाला साथ द्यायला कोणीही तयार नाही. असे का होत आहे?, याचा विचार करा. फक्त दुसऱ्यांवर टीका करुन चालत नाही. तुम्ही चांगले, बाकी वाईट असे नसते. तुमच्या चुका काय, तुम्ही कितीजणांना वेठीला धरलं, तुम्ही कार्यकर्त्यांसाठी कितीवेळा उभे राहिलात, सहकाऱ्यांना कितीवेळा मदत केली, काय शब्द वापरलेत, या गोष्टींचाही विचार करा. आता तुमचं वय 70 च्या आसपास आहे. आता नाही तर कधी विचार करणार, असेही निलेश राणे यांनी आपल्या व्हिडीओच्या माध्यमातून म्हटले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -