घरमहाराष्ट्रतिवरे प्रकरणी कंत्राटदार शिवसेना आमदार चव्हाण मोकाट

तिवरे प्रकरणी कंत्राटदार शिवसेना आमदार चव्हाण मोकाट

Subscribe

20 मृतदेह सापडले, ४ जण अद्याप बेपत्ता

राज्य शासन आणि प्रशासनाच्या उदासीनतेची अब्रुची लक्तरे विशेवर टांगणार्‍या आणि अनेक निरापराधांना मरणाच्या मुखात लोटून देणार्‍या चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण दुर्घटनेतील मृतांचा आकडा २० वर पोहचला आहे. अद्याप ४ जणांचा थांगपत्ता लागलेला नाही. मंगळवारी रात्री १० वाजता घडलेल्या या दुर्घटनेत १३ घरे वाहून गेली, तर २४ जण बेपत्ता झाले होते. विशेष म्हणजे या धरणाचा ठेकेदार असलेल्या आमदार अद्याप कुणावरही गुन्हा दाखल झालेला नाही. या दुर्घटनेबाबत धरण बांधणारे कंत्राटदार आमदार सदानंद चव्हाण यांच्यावर अद्याप गुन्हा दाखल करण्यात आला नसल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

पुण्यात भिंत कोसळून १४ जणांच्या तर मालाड येथे पिंपरीपाडात भिंत कोसळून २१ जणांच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या अधिकार्‍यांविरोदी गुन्हा दाखल करण्यात आले असताना धरण दुर्घटनेला जबाबदार असूनही आमदाराविरोधी कोणताही गुन्हा दाखल न करण्याच्या कृतीचे जोरदार पडसाद उमटत आहेत.

- Advertisement -

त्या भागात पावसाचा जोर कायम असल्याने शोध मोहिमेत अडथळे येत आहेत. प्रशासनाकडून ज्या ज्या ठिकाणी घरे होती तेथे जमा झालेले मातीचे ढिगारे उपसण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या ढिगार्‍यांखाली काहीजण गाडले गेले असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मनाचा थरकाप उडविणार्‍या या घटनेनंतर सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. तिवरे धरणाला भगदाड पडल्याचे अधिकार्‍यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतरही दुर्लक्ष का करण्यात आले, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. याची जबाबदारी सरकार घेणार का, असा उद्विग्न सवाल उपस्थित केला जात आहे. एखादी दुर्घटना घडल्यानंतर वरातीमागून घोडे नाचविण्यापेक्षा वेळीच खबरदारी का घेतली जात नाही, असाही सवाल स्थानिक करीत आहेत. आता चौकशांचे कितीही फार्स झाले तरी त्यातून काहीच निष्पन्न होणार नसल्याचीही प्रतिक्रिया उमटत आहे.

मृतांची नावे-
सुनील रामचंद्र पवार (३३), अनंत हरिभाऊ चव्हाण (६३), रणजित अनंत चव्हाण (१५), ऋतुजा अनंत चव्हाण (२५), आत्माराम धोंडू चव्हाण (७५), लक्ष्मी आत्माराम चव्हाण (७२), नंदाराम महादेव चव्हाण (६५), पांडुरंग धोंडू चव्हाण (५०), रवींद्र तुकाराम चव्हाण (५०), दशरथ रवींद्र चव्हाण (२०), वैष्णवी रवींद्र चव्हाण (१८), अनुसया सीताराम चव्हाण (७०), चंद्रभागा कृष्णा चव्हाण (७५), शारदा बळीराम चव्हाण (४८), संदेश विश्वास धाडवे (१८), रणजित काजवे (३०), राकेश घाणेकर (३०). एका मृताची ओळख अद्याप पटली नाही. दरम्यान, 13 जणांवर बुधवारी रात्री अंत्यसंस्कार करण्यात आले. यापैकी 8 जणांवर चिपळूणच्या स्मशानभूमीत तर चौघांवर खेर्डी तर एकावर पोफळी इथे अंत्यसंस्कार करण्यात आले. अतिशय शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

- Advertisement -

जिल्हाधिकार्‍यांनी नैसर्गिक आपत्कालीन निधीमधून मृतांच्या नातेवाईकांना मदत दिली आहे. बेघर झालेल्या 26 जणांना प्रत्येकी 10 हजार रुपये, तर 6 मृतांच्या वारसांना 4 लाखांचे धनादेश देण्यात आले. दरम्यान, धरणाची भिंत कमकुवत झाल्याने ते फुटल्याचे एक कारण असू शकते, अशी शक्यता जलसंधारण विभागाच्या अधिकार्‍याने ‘आपलं महानगर’शी बोलताना व्यक्त केली. या धरणाचे काम 2004 साली पूर्ण झाले, तर धरण खचल्याचे पत्र फेब्रुवारी 2019 ला मिळाले. त्यानंतर माती खोदून बाहेरून माती आणून पडलेला खड्डा बुजण्यात आला होता.

हा खड्डा उतारावर होता. 1 तारखेला धरण 25 ते 30 टक्के भरले होते. मात्र 2 तारखेला कोयना परिसरातील नौजा येथे 190 मिलिमीटर पाऊस 7 ते 8 तासात झाला व त्यामुळे पाण्याची पातळी 9 मीटरने अचानक वाढली. सांडवा भरून वाहू लागला की अचानक पाण्याची पातळी वाढते. त्यामुळे ओली माती आणि कोरडी माती यांच्यामध्ये जो काही समतोल साधला जातो तो साधला गेला नाही. हे आणखी एक कारण धरण फुटण्यामागे असू शकते, असा दावा या अधिकार्‍याने केला.

दरम्यान या धरणाची उभारणी करणारे विद्यमान आमदार सदानंद चव्हाण यांच्याविरोधात अद्याप कोणतीच कारवाई वा गुन्हा दाखल करण्यात न आल्याने या परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. पुणे आणि मुंबईत मालाड येथे संरक्षण भिंती पडून अनुक्रमे १४ आणि २१ जण मृत्यूमुखी पडल्याप्रकरणी या ठिकाणच्या दोन्ही ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आले असताना धरणफुटीत आमदार चव्हाण यांच्याविरोधात शासनाने कोणतीच कारवाई अद्याप न केल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -