घरमहाराष्ट्रछत्रपती संभाजीनगरभाजपला नामशेष केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरे यांचा घणाघात

भाजपला नामशेष केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरे यांचा घणाघात

Subscribe

वज्रमूठ सभेत आघाडीच्या नेत्यांचा भाजपवर घणाघात

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा म्हणाले होते की, शिवसेनेला नामशेष करणार. या देशात एकही विरोधी पक्ष ठेवणार नाही, मात्र मी तुम्हाला आज सांगतो की, भाजपला राज्यातून नामशेष केल्याशिवाय मी राहणार नाही, असे आव्हान शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी दिले. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या महाविकास आघाडीची राज्यातील पहिली संयुक्त सभा रविवारी छत्रपती संभाजीनगरात झाली. रामनवमीच्या पूर्वसंध्येला झालेल्या हिंसाचारामुळे मविआतील नेते या सभेत काय बोलतात याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. या सभेत भाषण करताना उद्धव ठाकरे यांच्यासहीत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी भाजप आणि शिंदे गटावर घणाघाती शब्दांत टीका केली.

यावेळी भाषण करताना मोठी केलेली माणसे गेली, पण त्यांना मोठी करणारी माणसे आज माझ्यासोबत आहेत. आता महाविकास आघाडीची वज्रमूठ आहे. ही वज्रमूठ राज्यघटनेचे, भारतमातेचे रक्षण करण्यासाठी आहे. देशाची वाटचाल हुकूमशाहीच्या दिशेने होत आहे. त्यामुळे भाजपचा उडता वारू आपल्या सर्वांना एकत्र येऊन रोखावाच लागणार आहे, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले. भाजपवर निशाणा साधताना उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, या देशाचा पंतप्रधान हिंदू असतानाही भाजप हिंदू आक्रोश यात्रा काढते, म्हणजे नरेंद्र मोदी पंतप्रधान असताना या देशात हिंदू सुरक्षित नाहीत का, असा सवाल उद्धव ठाकरेंनी भाजपला विचारला.

- Advertisement -

मी सत्तेसाठी काँग्रेस, राष्ट्रवादीचे तळवे चाटल्याचा आरोप केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी केला. मग बिहारमध्ये लालू-नितीश यांचे सरकार पाडून तुम्ही नितीश यांचे काय चाटले. मेघालयातील सरकारवर आरोप केल्यावर आता त्यांच्यासोबत सत्तेत बसला, अमित शहा तुम्ही आता संगमांचे काय चाटताय, असा प्रश्नही उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला.

यांना डिग्रीही विचारायची नाही

- Advertisement -

तुम्ही आम्हाला विचारताय याच्या थोबाडीत माराल का? आमचे हिंदुत्व शेंडी-जाणव्याचे हिंदुत्व नाही. हिंडनबर्गच्या अहवालावरून राहुल गांधींना शिक्षा करण्यात आली. तुमची डिग्री विचारल्यावर अरविंद केजरीवाल यांना 25 हजारांचा दंड ठोठावला. तरुणांकडे पदव्या असून त्यांना नोकर्‍या मिळत नाही आणि मोदींची पदवी मागितली म्हणून २५ हजारांचा दंड केला. तुम्हाला प्रश्न विचारायचे नाही, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला.

धमक असेल तर सावरकरांना भारतरत्न द्या- अजित पवार

भाजप-शिंदे सरकारची सावरकर गौरव यात्रा ही केवळ मूलभूत प्रश्नांपासून जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी आहे, त्यांना सावरकरांबद्दल कोणताही आदर नाही. धमक असेल तर सावरकरांना तात्काळ भारतरत्न द्या, असे म्हणतानाच सावरकरांबद्दल बोलताच यात्रा काढली, मात्र छत्रपती शिवाजी महाराज आणि महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल वक्तव्य केले तेव्हा का मूग गिळून गप्प बसलात. महाराष्ट्र सरकार हे शक्तीहीन सरकार आहे, असे सर्वोच्च न्यायालय म्हणाले. राज्य सरकारला जनाची नाही तर मनाची काही लाज वाटली पाहिजे. तुमच्यात धमक असेल तर सावरकरांना तात्काळ भारतरत्न द्या, असे आव्हान राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी भाजपला दिले.

गौरव यात्रांनी फरक पडणार नाही – चव्हाण

आजची ही विराट सभा पाहिल्यानंतर कितीही गौरव यात्रा काढल्या तरी संभाजीनगर आणि मराठवाड्यात काहीही फरक पडणार नाही. ही काळ्या दगडावरची रेष आहे. ही विराट सभा महाराष्ट्राच्या जनतेमधलं प्रतिक आहे. ही मन की बात नाही, दिल की बात आहे. महाविकास आघाडीची ही वज्रमूठ आहे. तिला कुणीही तोडू शकत नाही. कारण गेले ते कावळे आणि राहिले ते मावळे, अशी टीका काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी भाजप आणि शिंदे गटावर केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -