उद्धव ठाकरेंनीच मोदींना दिला होता युतीचा प्रस्ताव !

पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या इच्छेनुसार युतीत सामील झालो,शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांचा गौप्यस्फोट

महाविकास आघाडीत असताना बरोबर वर्षभरापूर्वी म्हणजेच ८ जून २०२१ रोजी तत्कालीन मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीतील ७ लोककल्याण मार्ग या निवासस्थानी भेट घेतली होती. यावेळी त्यांच्यासोबत मविआतील तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण हे देखील उपस्थित होते. या सर्व नेत्यांनी पंतप्रधानांसोबत राज्यातील १२ मागण्यांवर सुमारे तासभर चर्चा केल्यानंतर लगेचच उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी यांच्यासोबत जवळपास अर्धा तास बंद दाराआड चर्चा केली. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले होते.

या भेटीत नेमकी काय चर्चा झाली, यावर तर्कवितर्क लढवले जात होते, मात्र मंगळवारी या भेटीचा खरा तपशील देशासमोर शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी मांडला. राज्यात महाविकास आघाडीत मुख्यमंत्री असूनदेखील भाजपसोबत पुन्हा युती करण्याची तयारी ठाकरेंनी पंतप्रधान मोदींना दाखवली होती. त्याला मोदींनीही सकारात्मक प्रतिसाद दिला होता, मात्र पुढच्याच महिन्यात जुलैच्या पावसाळी अधिवेशनात भाजपच्या १२ आमदारांचे निलंबन मविआकडून करण्यात आले. यामुळे भाजपचे राष्ट्रीय नेतृत्व नाराज झाले आणि युतीची शक्यता फिस्कटली, असा गौप्यस्फोट दक्षिण मध्य मुंबईचे सेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी मंगळवारी दिल्लीत केला.

दिल्ली दौर्‍यावर असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेत संसदेत शिवसेनेचा स्वतंत्र गट स्थापन करण्याबाबत लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र दिल्याची माहिती दिली. यावेळी एकनाथ शिंदे यांनी १२ हून अधिक खासदारांनी एकमताने राहुल शेवाळे यांची शिवसेनेचे मुख्य गटनेता आणि खासदार भावना गवळी यांची प्रतोदपदी नियुक्ती केल्याचे सांगितले. सोबतच शिवसेना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए)त सहभागी होत असल्याचीही माहिती दिली. यावेळी राहुल शेवाळे यांनी शिवसेनेची भूमिका सांगताना ही तर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचीच इच्छा असल्याचे बोलून दाखवल्याने एकच खळबळ उडाली.

यावेळी राहुल शेवाळे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबतच्या बैठकीत युतीबाबत चर्चा केल्याची माहिती उद्धव ठाकरे यांनीच आम्हाला काही महिन्यांपूर्वी दिली होती, परंतु भाजपच्या १२ आमदारांच्या निलंबनानंतर भाजपचे पक्षश्रेष्ठी नाराज झाले आणि त्यांनी आपल्या प्रयत्नांना दादच दिली नाही. मी माझ्या परीने भाजपशी युती करण्याचा प्रयत्न करतोय, पण तुम्ही तुमच्या सोर्सने प्रयत्न करा, प्रयत्न सुरू ठेवा, असे उद्धव ठाकरे आम्हाला म्हणाले होते. आमदारांच्या बंडानंतर २१ जूनला शिवसेना खासदारांना वर्षावर बैठकीसाठी बोलावण्यात आले होते. त्यावेळी एनडीएसोबत पुन्हा युती करण्याची मागणी आम्ही केली होती. तेव्हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यास मी तुमची भूमिका आनंदाने स्वीकारेन, असे उद्धव ठाकरेंनी सांगितल्याचा दावा राहुल शेवाळेंनी केला.

२०२४ च्या लोकसभा निवडणुकांसाठी भाजपसोबत युती आवश्यक आहे, असा सर्व शिवसेना खासदारांचा आग्रह होता, मात्र उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडीचा सूर कायम ठेवला. आम्ही विरोध करत त्यांना आपापल्या मतदारसंघातील वस्तुस्थिती सांगितली, मात्र त्यांनी ऐकून घेतले नाही. एनडीएच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना शिवसेनेने पाठिंबा दिला, परंतु आम्ही युतीबाबत प्रयत्न करत असताना यूपीएच्या उपराष्ट्रपतीपदाच्या उमेदवार मार्गारेट अल्वा यांना पाठिंबा दिला. ठाकरेंच्या या निर्णयाने आम्ही नाराज झालो. अल्वा काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रभारी असताना त्यांनी शिवसेनेचे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे त्यांना पाठिंबा देण्याचा प्रश्नच येत नाही,त्यामुळे अखेर आमचे सोर्स एकनाथ शिंदे असल्याने उद्धव ठाकरेंच्या सांगण्यानुसार आम्ही एनडीएत गेल्याचे राहुल शेवाळे यांनी सांगितले.

लोकसभा अध्यक्षांना पत्र, सेना कार्यालयावर देखील दावा
शिवसेनेच्या १२ खासदारांच्या पाठिंब्यानंतर आम्ही संसदेत शिवसेनेचा वेगळा गट स्थापन करण्यासंदर्भात लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र दिलेआहे. खासदार राहुल शेवाळे गटनेते असतील तर भावना गवळी मुख्य प्रतोद असतील. ज्या राज्याला केंद्राचा पाठिंबा मिळतो, त्या राज्याचा विकास लवकर होतो, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. आमच्याकडे दोन तृतीयांशपेक्षा अधिक बहुमत असल्याचे सांगत शिंदे गटाने संसदेतील सेना कार्यालयावर देखील दावा सांगितलेला आहे.

हीच ती कारवाई
ओबीसी आरक्षणाच्या ठरावावर विधानसभेत ५ जुलै २०२१ रोजी चर्चा सुरू असताना राजदंड पळविणे, माईक खेचणे, अध्यक्षांच्या दालनात तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांना धक्काबुक्की करणे, शिवीगाळ करणे, अपशब्द वापरून गैरवर्तन करणे यासाठी भाजपच्या १२ आमदारांना निलंबित करण्यात आले होते. आमदार संजय कुटे, आशिष शेलार, जयकुमार रावल, गिरीश महाजन, अभिमन्यू पवार, हरिश पिंपळे, राम सातपुते, जयकुमार रावल, पराग अळवणी, नारायणे कुचे, बंटी बागडिया आणि योगेश सागर या आमदारांचा त्यात समावेश होता. यामुळे भाजप नेतृत्व नाराज झाले होते.

मुख्यमंत्रीपदाला भाजपने नकार दिला
आम्ही युतीबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत नाही, तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी चर्चा केली. भाजपच्या आमंत्रणानंतर अरविंदजी, बोलावणेच आले आहे तर तुम्ही जाऊन या, असे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले होते. त्यावेळी मी गडकरींना भेटलो, त्यावर हवे तर आणखी एक-दोन मंत्रीपद वाढवून देऊ, पण मुख्यमंत्रीपद देऊ शकणार नाही, असे गडकरींनी सांगितल्यावरच ही चर्चा फिस्कटली होती. – -अरविंद सावंत, खासदार, शिवसेना

याच सर्वांनी मविआचे स्वागत केले .
भाजपनेच २०१४ साली युती तोडली आणि २०१९ साली देखील युती भाजपमुळेच तुटली. भाजपने हिंदुत्वाची युती तोडली तेव्हा याच लोकांनी भाजपला प्रश्न विचारले होते. उद्धव ठाकरे यांनी मविआच्या वेळीही, ही आघाडी कोणत्या परिस्थितीत करतोय हे सर्वांना विश्वासात घेऊन सांगितले होते. या प्रयोगाचे सर्वांनी स्वागत केले होते आणि भाजपला आपली ताकद दाखवून दिलीच पाहिजे अशी पोपटपंचीही केली होती. – संजय राऊत , खासदार, शिवसेना

८ जून २०२१ रोजीची भेट
महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नवी दिल्लीतील निवासस्थानी ८ जून २०२१ रोजी भेट घेतली होती. तासभर चाललेल्या या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा युतीचा प्रस्ताव दिल्याचा दावा शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी केला आहे.