घरमहाराष्ट्रपुणेVasant More Big Breaking : वसंत मोरेंचा मनसेला जय महाराष्ट्र, राज ठाकरेंना...

Vasant More Big Breaking : वसंत मोरेंचा मनसेला जय महाराष्ट्र, राज ठाकरेंना पुण्यात धक्का

Subscribe

महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचे पुण्याचे माजी शहराध्यक्ष वसंत मोरे अर्थात तात्या मोरे यांनी पक्षाला जय महाराष्ट्र केला आहे.

पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचे पुण्याचे माजी शहराध्यक्ष वसंत मोरे अर्थात तात्या मोरे यांनी पक्षाला जय महाराष्ट्र केला आहे. याबाबतची फेसबूक पोस्ट त्यांच्याकडून करण्यात आली आहे. “अखेरचा जय महाराष्ट्र… साहेब मला माफ करा” असे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे. (Big Breaking: Vasant More left the MNS party)

- Advertisement -

पुण्यातील मनसेचे धडाडीचे नेते वसंत (तात्या) मोरे यांनी आज (ता. 12 मार्च) अखेरीस महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. काल (ता. 11 मार्च) रात्री वसंत मोरे यांनी आपली नाराजी व्यक्त करणारी एक पोस्ट केली होती, ज्यानंतर ते लवकरच पक्षाला रामराम करणार असल्याचे बोलले जात होते. ही चर्चा आता खरी ठरली असून मोरेंनी पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. वसंत मोरे यांच्या या निर्णयामुळे मनसेला मोठा फटका बसल्याचे बोलले जात आहे. वसंत मोरे यांनी त्यांच्या फेसबूक अकाउंटवरून याबाबतची घोषणा केली आहे. या पोस्टमध्ये त्यांच्याकडून काही फोटो पोस्ट करण्यात आले आहे.

वसंत मोरे यांनी पोस्ट केलेल्या एका फोटोत ते मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या फोटोसमोर हात जोडून उभे आहेत. याच फोटोला कॅप्शन देत त्यांनी “अखेरचा जय महाराष्ट्र… साहेब मला माफ करा” लिहिले आहे. तर. एका फोटोत ते राज ठाकरेंच्या फोटोसमोर लोटांगण घालताना दिसत आहेत. तर त्यांनी या पोस्टमध्ये आपले राजीनाम्याचे पत्रही प्रसिद्ध केले आहे. “पक्ष संघटना वाढीसाठी गेली 18 वर्ष सातल्याने काम करत असताना पुणे शहरात आणि सरचिटणीस म्हणून महाराष्ट्रात कार्यरत राहिलो परंतु अलीकडच्या काळात पुणे शहरातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडून माझ्या विरोधात होत असलेले पक्षांतर्गत गलिच्छ राजकारण व पक्षाप्रति असलेल्या माझ्या निष्ठेवर उपस्थित होत असलेले प्रश्नचिन्ह माझ्यासाठी अत्यंत वेदनादायी आहे.” अशी खंत त्यांनी पत्राच्या माध्यमातून व्यक्त केली आहे.

वसंत मोरेंनी काय लिहिले आहे पत्रात?

प्रति,

मा. श्री राजसाहेब ठाकरे, संस्थापक अध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना

विषयः माझा पक्षाच्या प्राथमिक सदस्य आणि सर्व पदांचा राजीनामा स्वीकारणे संदर्भात.

आपणांस सप्रेम जय महाराष्ट्र।

पक्षाच्या स्थापनेपासून (किंबहुना त्याही आधीपासून) पक्षाचा सदस्य आणि इतर पदावर काम करत असताना आपण दिलेल्या जबाबदाऱ्या आणि आदेश यांचे पालन करण्याचा मी माझ्या परीने प्रयत्न करत आलो आहे. पक्ष संघटना वाढीसाठी गेली 18 वर्ष सातल्याने काम करत असताना पुणे शहरात आणि सरचिटणीस म्हणून महाराष्ट्रात कार्यरत राहिलो. परंतु अलीकडच्या काळात पुणे शहरातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडून माझ्या विरोधात होत असलेले पक्षांतर्गत गलिच्छ राजकारण व पक्षाप्रति असलेल्या माझ्या निष्ठेवर उपस्थित होत असलेले प्रश्नचिन्ह माझ्यासाठी अत्यंत वेदनादायी आहे. भविष्यात पक्षाचे लोकप्रतिनिधी निवडून यावेत यासाठी मी स्थानिक पदाधिकाऱ्यांना सामावून घेऊन मदत व उपक्रम देतो, त्यांना ताकद देतो त्या सहकान्यांची शहरातील वरिष्ठ पदाधिकाऱ्याकडून ‘कोंडी’ करण्याचे ‘तंत्र’ अवलंबिले जात आहे. म्हणून मी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्राथमिक सदस्यत्वासह सर्व पदांचा राजीनामा देत आहे. कृपया आपण तो स्वीकारावा ही नम्र विनंती.

धन्यवाद ।
आपला विश्वास,
वसंत (तात्या) मोरे
कात्रज पुणे,

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -