घरताज्या घडामोडीAnalysis : लोकसभेत पवार विरुद्ध पवार लढत रंगणार; बारामतीमध्ये सुप्रिया सुळेंविरोधात कोण...

Analysis : लोकसभेत पवार विरुद्ध पवार लढत रंगणार; बारामतीमध्ये सुप्रिया सुळेंविरोधात कोण लढणार?

Subscribe

मुंबई – अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने लोकसभेच्या चार जागा लढवणार असल्याची घोषणा, कर्जत येथील पक्षाच्या शिबिरात केली आहे. यातील तीन जागा या शरद पवार गटाकडे आहेत. बारामती, शिरुर, सातारा लोकसभा मतदारसंघातील खासदारांचा शरद पवारांना पाठिंबा आहे. तर सुनील तटकरे हे एकमेव खासदार अजित पवारांसोबत आहेत. अजित पवारांची लढाई आता थेट शरद पवारांशीच होणार हे निश्चित आहे. मात्र या चार जागाच अजित पवार गट लढवणार नसून त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या ताब्यातील जागांवरही लढण्याचे सुतोवाच केले आहे. (Who is Ajit Pawar’s candidate in Baramati?)

मार्चच्या पहिल्या आठवड्यात आचारसंहिता लागण्याची शक्यता व्यक्त करुन अजित पवारांनी मंत्री, आमदार, आणि कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत. विद्यार्थी आघाडी, महिला आघाडी, युवक आघाडी, एससी, एसटी, अल्पसंख्याक सेल, यांना देखील राज्यात सर्वत्र कार्यन्वित करण्याचे आदेश दिले आहेत.

- Advertisement -

राष्ट्रवादी काँग्रेस बारामती, सातारा, शिरुर आणि रायगड चार जागा तर लढवणारच, अशी घोषणाच अजित पवारांनी केली आहे. याशिवाय अजित पवार गट शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या जागांवर लक्ष ठेवून आहे. कारण भाजप आणि शिवसेना शिंदे गट त्यांच्या विजयी जागा अजित पवारांना सोडण्याची शक्यता नाहीत जमा आहे. त्यामुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेससाठी अनुकुल अशा शिवसेना ठाकरे गटाच्या पाच जागा आहेत. यामध्ये परभणी, उस्मानाबाद, दक्षिण मुंबई, रत्नागिरी-सिंधुदुर्ग आणि ठाणे यांचा समावेश होऊ शकतो.

शिवसेनेच्या पाच जागांवर अजित पवारांचा डोळा 

परभणीतून शिवसेनेचे संजय जाधव खासदार आहेत. उस्मानाबादच्या गडावर ओमराजे निंबाळकर यांनी शिवसेनेचा भगवा फडकवला आहे. दक्षिण मुंबईतून शिवसनेचे नेते अरविंद सावंत, रत्नागिरी-सिंधुदुर्ग येथून विनायक राऊत लोकसभेत आहेत. तर ठाण्याचा गड राजन विचारे यांनी शिवसेनेच्या ताब्यात ठेवला आहे. या पाच जागांवर अजित पवार क्लेम करण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

बारामतीमध्ये पवार विरुद्ध पवार सामना रंगणार? 

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट जर या नऊ जागा लढवणार असेल तर त्यांच्याकडे उमेदवार कोण आहेत? हे पाहणेही महत्त्वाचे आहे. बारामतीवर अजित पवारांनी दावा केला आहे. येथे त्यांची चुलत बहीण सुप्रिया सुळे खासदार आहे. सुप्रिया सुळेंविरोधात अजित पवार कोणाला मैदानात उतरवणार याची महाराष्ट्रालाही उत्सूकता आहे. अजित पवारांची पत्नी सुनेत्रा पवार या लोकसभा लढणार का? हे अजून स्पष्ट झालेले नाही. याशिवाय अजित पवार मुलगा पार्थ पवारला बारामतीच्या लोकसभेत उतरवण्याचीही शक्यता आहे. मात्र सुप्रिया सुळे यांच्याविरोधातील लढाई ही सोपी असणार नाही, याची जाणीव अजित पवारांनाही असणार. त्यामुळे आमदार दत्तात्रय भरणे यांना अजित पवार उमेदवारी देण्याची शक्यता वाढते. दत्तात्रय भरणे यांच्या नावाला भाजपकडूनही ग्रीन सिग्नल मिळण्याची शक्यता अधिक आहे. यामुळे इंदापूरचे हर्षवर्धन पाटील यांचाही विधानसभेचा मार्ग मोकळा होऊ शकतो. दत्तात्रय भरणे हे धनगर समाजाचे आहेत. बारामती मतदारसंघातील धनगर समाजाची निर्णायक मते ही भरणेंच्या पथ्यावर पडण्याची शक्यता आहे.

आमदार कोल्हेंचे तळ्यात मळ्यात 

दुसरा मतदारसंघ आहे शिरुर. येथून डॉ. अमोल कोल्हे खासदार आहेत. ते नेमके कोणत्या गटात आहेत, याविषयी कायम संभ्रम निर्माण होईल अशीच त्यांची भूमिका राहिली आहे. त्यांनी समर्थनाचं शपथपत्र शरद पवारांना दिलं असलं तरी अजित पवारांच्या शपथविधीला ते पहिल्या रांगेत हजर होते. अजित पवार गटाने शरद पवार गटाच्या खासदारांना अपात्र ठरवण्याचे पत्र दिले आहे, त्यात कोल्हेंचे नाव वगळण्यात आले आहे. त्यामुळे त्यांचा एक पाय शरद पवार गटात आहे, तर दुसरा अजित पवारांच्या कंपूत. अजित पवारांनी कोल्हेंना उमेदवारी दिली तर शरद पवार येथे कोणता उमेदवार देणार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत गेलेल्या शिवाजीराव अढळरावांचे काय होणार हा प्रश्नच आहे.

सातारची गादी कोणाला? 

सातारा मतदारसंघ हा सर्वाधिक चर्चेतील मतदारसंघ. शरद पवारांची पावसातील सभा ही येथील राष्ट्रवादीचे खासदार श्रीनिवास पाटलांसाठीच झाली होती. राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेले उदयनराजे भोसले यांना पराभूत करुन शरद पवारांचे मित्र श्रीनिवास पाटील येथून विजयी झालेले आहेत. राष्ट्रवादीतील फुटीनंतरही त्यांनी मैत्रीधर्म निभावत पवारांसोबत राहाणे पसंत केले आहे. वयाचा विचार करता श्रीनिवास पाटील यंदा लोकसभा लढवतील का, असा प्रश्न उपस्थित होतोय. पण त्यांनी निवडणुकीला नकार दिला तरी त्यांचा मुलगा सारंग पाटील शरद पवार गटाचा उमेदवार होण्याची शक्यता अधिक आहे.

शरद पवार गटाच्या उमेदवाराविरोधात अजित पवार कोणाला मैदानात उतरवणार हे अजून गुलदस्त्यात आहे. कारण येथून पवार गटाला टक्कर देईल असा सक्षम उमेदवार अजित पवार गटाकडे असल्याचे अजूनतरी दिसत नाही. उदयनराजे हा देखील महत्त्वाचा फॅक्टर या मतदारसंघात आहे. अजित पवार आणि उदयनराजे यांच्यातील संघर्ष सातारकरांना नवा नाही. त्यामुळे उदयरनारांजेंचं पारडं कुठं झुकतं यावरही बरच काही अवलंबून राहाणार आहे.

रायगडमधून तटकरेंचा मार्ग सोपा नाही 

शरद पवार गटातील या तीन मतदारसंघानंतर अजित पवार गटाकडे असलेली एकमेव जागा म्हणजे रायगड लोकसभा मतदारसंघ. कर्जतमधील दोन दिवसांच्या शिबिराचे होस्ट हे सुनील तटकरे हेच होते. अजित पवार गटाकडून तेच येथे पुन्हा उमेदवार असण्याची शक्यता आहे. त्यांच्याविरोधात शरद पवार गट कोण उमेदवार देणार हे महत्त्वाचं आहे. शरद पवार हा मतदारसंघ शिवसेना ठाकरे गटाला सोडण्याची शक्यता आहे. येथून शिवसेनेचे अनंत गीते निवडणूक लढवण्यास इच्छूक आहे. आणखी एक नाव आहे, ते म्हणजे ‘इंडिया’ आघाडीतील शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील. यामुळे रायगडची लढत ही रंगतदार होणार, असे दिसत आहे. या चार मतदारसंघाव्यतिरिक्त आणखी किती मतदार संघ अजित पवार मागतात हे नजीकच्या काळात स्पष्ट होणार आहे. मात्र लोकसभेत त्यांची लढत ही पवार विरुद्ध पवार अशीच होणार हे आजच्या भाषणातून स्पष्ट झालं आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -