घरट्रेंडिंगIndian Navy Day : शं नो वरुणः भारतीय नौदलाची गौरवगाथा, 'असा' आहे...

Indian Navy Day : शं नो वरुणः भारतीय नौदलाची गौरवगाथा, ‘असा’ आहे इंडियन नेव्हीचा इतिहास

Subscribe

सिंधुदुर्ग – (तेजस्वी काळसेकर) –  2021 मध्ये “स्वर्णिम विजय वर्ष” साजरे केल्यानंतर भारतीय नौदल प्रथमच आपल्या हेडक्वार्टरपासून दूर “मालवण” मध्ये नौदल दिवस साजरा करत आहे. समस्त मराठी जनतेचे दैवत व ज्यांच्या उद्घोषानेही रक्त सळसळते अशा छत्रपतींना मानवंदना देण्यासाठी हा कार्यक्रम मालवण मध्ये घेण्याचा निर्णय नौसेनेने घेतला आहे . कोकण किनारपट्टीचे परकीय शक्तींपासून रक्षण व्हावे, ब्रिटिश व पोर्तुगीजांना राजकीय हस्तक्षेपापासून दूर ठेवावे आणि बंदर मार्गे होणाऱ्या व्यापारावर नियंत्रण रहावे या उद्देशाने छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठी आरमाराची मुहूर्तमेढ रोवली.
“जलमेव यस्य,बलमेव तस्य” हे त्यांनी त्याकाळीच जाणले होते. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांना “फादर ऑफ इंडियन नेव्ही” म्हणून ओळखले जाते.

कोणत्याही देशाच्या संघटीत समुद्री सेनेला नौदल म्हटले जाते. जगातील सर्वात शक्तिशाली बलाढ्य सेनेच्या यादीत भारतीय सेनेच नाव आवर्जून घेतले जाते. ते भारताच्या भूदल, हवाईदल आणि नौदल सेनेमुळेच. भारताच्या तिन्ही सेनांची कामगिरी नेहमीच अतुलनीय व गौरवशाली राहीली आहे. मात्र आपल्या कामगिरीने भारतीय नौदलाने वेगळी ओळख निर्माण केली आहे.

- Advertisement -

इतिहासाचा आढावा घेतला असता भारतीय नौदलाची स्थापना 1612 मध्ये झाल्याचे समजते. ईस्ट इंडिया कंपनीने आपल्या जहाजांच्या सुरक्षेसाठी ‘ईस्ट इंडिया कंपनी मरीन’ ची स्थापना केली. नंतर ब्रिटीश व्यापार पूर्णपणे बॉम्बेमध्ये स्थलांतरित झाल्यानंतर याचे नाव बदलून बॉम्बे मरीन करण्यात आले. सिंधी युद्ध व 1824 मधल्या बर्मा युद्धात या बॉम्बे मरीनचा सहभाग होता. 1892 मध्ये या दलाचे नाव रॉयल इंडियन मरीन ठेवण्यात आले. स्वातंत्र्यानंतर 1950 मध्ये नौदलाचे पुर्नगठन करून भारतीय नौदलाची स्थापना करण्यात आली. “शं नो वरुण” अर्थात जल देवता आमच्यासाठी शुभ ठरो! हे आदर्श वाक्य घेऊन नौदल कार्यरत आहे. देशाच्या समुद्री सीमांचे रक्षण करणे व सेनेच्या अन्य सशस्त्र दलांसोबत मिळून युद्ध आणि शांती या दोन्ही परिस्थितीमध्ये भारतीय जनता व समुद्री हितांना बाधा पोहचवणाऱ्यांना रोखणे व प्रतिकार करण्याचे कार्य अविरत करत आहे. भारतीय नौदल भारतीय सशस्त्र बलाची शाखा आहे. देशाचे राष्ट्रपती याचे ‘कमांडर इन चीफ’ म्हणून नौदलाचे नेतृत्व करतात. नौदलाचे मुख्यालय एकत्र रक्षा मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे, तर पश्चिमी नौदलाचे मुख्यालय मुंबई, पूर्व नौदलाचे विशाखापट्टनम आणि दक्षिण नौदलाची कमान कोच्ची येथील मुख्यालय सांभाळत आहे.

- Advertisement -

का साजरा केला जातो नौदल दिन

1971 मध्ये झालेल्या भारत-पाकिस्तान युद्धातील “ऑपरेशन ट्रायडेंट”मध्ये केलेल्या विजयी कामगिरिच्या आनंदाप्रित्यर्थ आपल्या साहसाची, शत्रूला धूळ चारलेल्या त्या पराक्रमाची आठवण आणि आपल्या नौसैनिकांच्या शौर्य आणि समर्पणाला आदरांजली वाहण्यासाठी 4 डिसेंबरला नौदल दिन मोठ्या दिमाखात साजरा केला जातो. प्रत्येक वर्षी भारतीय नौदल “नेव्ही डे” एका निर्धारित थीमवर साजरा करते. यावर्षी 2023 मध्ये Indian Navy: Combat Ready, Credible, Conesive and Future Proof (भारतीय नौदल : युद्धासाठी तयार, विश्वसनीय, एकजूट आणि भविष्यात सुरक्षित राहणारी) अशी आहे. नौदलाकडून अत्यंत शिस्तबद्ध व नियोजन पूर्वक या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. या कार्यक्रमात नौदल आपल्या बलाढ्य शक्तिचे, एकजुटीचे, साहसाचे प्रदर्शन करते. नौदलाच्या शौर्याची गाथा असलेला नेव्ही डे निमित्ताने यावर्षी मराठी आरमाराचे जनक छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देण्यासाठी भारतीय नौदलाने मालवणची निवड केली. प्रथमच आपल्या मुख्यालयापासून दूर या सोहळयाचे नियोजन नेव्ही कडून करण्यात आले आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत नौदल दिवस मालवणमध्ये साजरा होत आहे. त्यामुळे भारतासोबतच संपूर्ण जगाचे लक्ष तळकोकणाकडे वेधले गेले आहे. नेव्ही डे मालवणमध्ये साजरा करत नौदलाने छत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन भूमीला वंदन केले आहेच पण 30 नोव्हेंबर रोजी कोचीन येथे जलावतरण झालेल्या आधुनिक युद्धनौकेला “मालवण”नाव देऊन कोकणाचा उचित सन्मान केला आहे.

नेहमीच आपली नेत्रदिपक कामगिरी, दुर्दम्य इच्छाशक्ती, साहसी पराक्रमाने नौदलाने शत्रूला शांत समुद्रही खवळला तर आग ओकतो हे दाखवून दिले आहे. त्यामुळे आपली सुरक्षा अभेद्य राखण्यासाठी सदैव तत्पर नौदलाचा प्रत्येक भारतीयाला अभिमान आहे आणि कायम राहील.
अथांग समुद्राची देवता वरुण देवाला नतमस्तक होत “हरदम तैयार है, बिल्कुल तैयार है, जी जान से तैयार है, इसीलिए तो हम लहरोंके पहरेदार है… जय भारती” म्हणत इंडियन नेव्ही छातीचा कोट करुन शौर्य आणि समर्पनाला उभी आहे.

हेही वाचा : PHOTO : पंतप्रधान मोदी यांच्या दौऱ्याआधी सिंधुदुर्गात नौदलाची रंगीत तालीम; पहा चित्तथरारक कयावती

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -