घरमुंबईविक्रीकर बुडवणाऱ्या व्यापाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल

विक्रीकर बुडवणाऱ्या व्यापाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल

Subscribe

भिवंडीतील लाकूड व्यापाऱ्यांवर विक्रीकर भरण्यास टाळाटाळ केली असल्याने त्या तीन लाकूड व्यापाऱ्यांवर महाराष्ट्र मूल्यवर्धित कर कायदा सन २००२ चे कलम ७४ (२) प्रमाणे फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भिवंडी तालुक्यातील कोनगांव येथील रिलायंन्स पेट्रोल पंपाच्या लगत असलेल्या मे. केदार टिंबर आणि बाँबे टिंबर प्रा. लि. कंपनीच्या भागीदार तथा मालकांनी केंद्र सरकारचे विक्रीकर (सेल्स टॅक्स) आणि राज्यशासनाचा महाराष्ट्र मूल्यवर्धित कर (वॅट) असा एकूण १ कोटी ७२ लाख ५८ हजार १५५ रुपयांचा कर बुडवल्याप्रकरणी कल्याण विभागीय विक्रीकर अधिकारी छगन दत्तात्रेय जायभाय (४८) यांनी तीन लाकूड व्यापाऱ्यांच्या विरोधात कोनगांव पोलीस ठाण्यात फौजदारी गुन्हा दाखल केला आहे.

गुन्हेगाऱ्यांवर फौजेदारी गुन्हा दाखल

शैलेश पटेल ठाण्यातील रहिवासी, प्रदीप नयनी कोनगांवमधील रहिवासी आणि दिपक पटेल अंधेरीतील रहिवासी, असे गुन्हा दाखल झालेल्या लाकूड व्यापाऱ्यांची नांवे आहेत. या तिन्ही लाकूड व्यापाऱ्यांचा कोनगांव येथे लाकूड व्यवसाय आहे. या तिघांनी सन २०११ ते २०१४ च्या दरम्यान शासनाच्या निर्धारण आदेशप्रमाणे केंद्रीय विक्रीकर कायदा १९५६ प्रमाणे ३ लाख ३३ हजार ३५३ रुपये शासनाला विक्रीकर आणि राज्यशासनाचा महाराष्ट्र मूल्यवर्धित कर (वॅट) १ कोटी ६९ लाख २४ हजार ८०२ रुपये असा एकूण १ कोटी ७२ लाख ५८ हजार १५५ रुपयांचा कर भरणे आवश्यक होते. मात्र, या तिन्ही लाकूड व्यापाऱ्यांनी शासनाचा कर भरण्यास टाळाटाळ करून स्वतःचा आर्थिक फायदा करून घेतला आहे. हि बाब कल्याण विभागीय विक्रीकर अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आल्याने या करबुडव्या लाकूड व्यापाऱ्यांच्या विरोधात महाराष्ट्र मूल्यवर्धित कर कायदा सन २००२ चे कलम ७४ (२) प्रमाणे फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यातील दोषी लाकूड व्यापाऱ्यांना लवकरच अटक करून न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती तपास अधिकारी एपीआय नरेंद्र पवार यांनी दिली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -