घरमुंबईनगरसेवकांचे सर्व अभ्यास दौरे रद्द; आदित्य ठाकरेंनी मारली काट!

नगरसेवकांचे सर्व अभ्यास दौरे रद्द; आदित्य ठाकरेंनी मारली काट!

Subscribe

मुंबई महानगर पालिकेच्या नगरसेवकांचे अभ्यास दौरे आदित्य ठाकरेंनी केले रद्द!

मुंबई महापालिकेच्या वैधानिक समितीसह विशेष समित्यांचे अभ्यास दौरे अखेर रद्द करण्यात आले आहेत. शिवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंनी या अभ्यास दौर्‍यांना चाप लावत सर्व दौरे रद्द करण्याच्या सूचना केल्या असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळेच महापालिकेच्या अधिकृत अभ्यास दौर्‍यासह आरोग्य समितीच्या माध्यमातून काढण्यात येणार्‍या खासगी चीन दौर्‍यालाही काट मारण्यात आली आहे. मुंबई महापालिकेच्या विविध वैधानिक आणि विशेष समिती अध्यक्ष आणि सदस्यांसह अधिकार्‍यांच्या दौर्‍याला गटनेत्यांच्या सभेत मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार सुधार समितीचा अभ्यास दौरा बंगळुरू, म्हैसूर, शिक्षण समितीचा अभ्यास दौरा उत्तरांखड, महिला व बाल कल्याण समितीचा दौरा केरळ तर स्थापत्य शहर समितीचा दौरा अंदमान निकोबारला आयोजित करण्यास मंजुरी प्राप्त झाली आहे. त्यानुसार येत्या काही दिवसांपासून या अभ्यास दौर्‍याला सुरुवात होणार होती. तर वृक्ष प्राधिकरणाच्या माध्यमातून सिंगापूरला अभ्यास दौरा प्रस्तावित आहे.

अभ्यास दौऱ्यांवर होत होती टीका

मात्र, मुंबई महापालिकेची आर्थिक स्थिती कमजोर असताना या अभ्यास दौर्‍याच्या माध्यमातून नगरसेवकांच्या या सहलीवर कोट्यवधी रुपयांचा खर्च अनाठायी आहे. अभ्यास दौर्‍याच्या माध्यमातून काही ठोस उपाययोजना होत नसल्याने तसेच वृत्तपत्रांतून या अभ्यास दौर्‍याबाबत टीका होत असल्याने याची दखल घेत शिवसेना नेते आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी महापालिकेच्या विविध समित्यांचे अभ्यास दौरे रद्द करण्याचे निर्देश महापालिकेतील शिवसेनेच्या नेत्यांना दिले आहेत. त्यानुसार हे सर्व अभ्यास दौरे रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सभागृहनेत्या विशाखा राऊत यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी महापालिकेच्या विविध समित्यांमार्फत जाणारे अभ्यास दौरे रद्द करण्यात येत असल्याची माहिती दिली आहे.

- Advertisement -

चीनचा दौराही झाला रद्द

विविध समित्यांच्या अभ्यास दौर्‍यांना गटनेत्यांनी मान्यता दिली होती. त्यानुसार त्याचा खर्च महापालिकेच्या तिजोरीतून केला जाणार होता. तर आरोग्य समितीच्या माध्यमातून चीनला अभ्यास दौरा आयोजित करण्यात येणार होता. गटनेत्यांच्या सभेत विशेष समितीचा दौरा भारताबाहेर काढता येत नाही आणि त्यासाठी महापालिकेचा पैसा खर्च करता येत नाही, असा युक्तीवाद करण्यात आला होता. परंतु, गटनेत्यांनी आरोग्य समितीच्या माध्यमातून काढण्यात येणार्‍या चीनच्या अभ्यास दौर्‍याला मंजुरी नाकारल्यानंतरही आरोग्य समिती सदस्यांसह इतर नगरसेवक व महापौर किशोरी पेडणेकर आणि सभागृहनेत्या विशाखा राऊत हे चीनला स्वखर्चाने जाणार होते. परंतु, आदित्य ठाकरे यांनीही या दौर्‍याला काट मारत तो रद्द करण्याची सूचना केली. परंतु योगायोगाने चीनमध्ये करोना व्हायरस पसरल्याने आपोआपच हा दौरा रद्द करण्याची वेळ आरोग्य समिती अध्यक्षांसह महापौरांवर आली आहे. विशेष म्हणजे चीनला जाण्यासाठी खुद्द आदित्य ठाकरेंनीच परवानगी दिल्याने शिवसेनेचे सर्व नगरसेवक स्वखर्चाने चीनला जाण्यासाठी तयार झाले होते.


हेही वाचा – ‘करोना’ व्हायरसचा मुंबई पालिका नगरसेवकांना ‘असा’ही फटका!
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -