घरमुंबईजनता पुरात, पालकमंत्री पक्ष प्रवेश सोहळ्यात

जनता पुरात, पालकमंत्री पक्ष प्रवेश सोहळ्यात

Subscribe

भाजपवर टीकेची झोड

गेल्या दहा दिवसांत दक्षिण रायगड जिल्ह्यात वारंवार पूर येणाच्या संकटाने जनतेची झोप उडालेली असताना उत्तर रायगडात मात्र भारतीय जनता पक्षाने प्रवेश सोहळे आयोजित करून एकप्रकारे पूरग्रस्त, दरडग्रस्तांच्या जखमेवर मीठ चोळल्याची भावना निर्माण झाली असून, यावर टीकेची झोड उठली आहे. विशेष म्हणजे या पक्ष प्रवेश सोहळ्याला जिल्ह्याचे पालकमंत्रीही उपस्थित होते. खरे तर महाड, रोहे, नागोठणे येथे पूर परिस्थिती गंभीर असताना पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी जिल्ह्यात असणे गरजेचे होते. जनजीवन स्थिरस्थावर होत असताना पूरग्रस्त भागात फिरत असल्याच्या पार्श्वभूमीवर ते टीकेचे धनी झालेले असून, पक्ष प्रवेश सोहळ्याला मात्र ते कसे उपस्थित राहिले, असा सवाल विचारला जात असून, दुसरीकडे त्यांच्यासह भाजपचे प्रवेश सोहळेही टीकेच्या भोवर्‍यात सापडले आहेत.

एखादा सरकारी, निमसरकारी कार्यक्रम असला की ती संधी साधत पक्ष प्रवेश सोहळा करून घ्यायचा, असा जणू एक अलिखित नियम युतीत झाल्याचे आता उघडपणे बोलले जात आहे. उरण विधानसभा मतदारसंघात चिरनेर येथे नाल्याचे भूमिपूजन करताना दुसरीकडे शेकाप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना भाजपमध्ये घेऊन पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. त्याच दिवशी याच मतदारसंघातील खालापूर तालुक्यातील मोहोपाडा येथेही अनेक विरोधी कार्यकर्त्यांना भाजपने पक्षप्रवेश दिला

- Advertisement -

तीन वर्षांपूर्वी महाडमधील सावित्री पूल दुर्घटनेनंतर तत्कालीन पालकमंत्री व भाजपचे नेते प्रकाश मेहता यांनी दाखविलेल्या अकार्यक्षमतेच्या आठवणी ताज्या असताना यावेळच्या पूर परिस्थितीत तरी पालकमंत्री चव्हाण यांनी संवेदनशीलता दाखवायला पाहिजे होती, असे मत व्यक्त केले जात आहे. चव्हाण त्यावेळी पालघरमध्ये होते असे सांगितले जाते. मात्र रायगडात एखादा पक्ष प्रवेश सोहळा असता तर त्यानिमित्ताने नक्की आले असते, असे आता उपहासाने बोलू जाऊ लागले आहे.

दरम्यान, पावसाचे प्रमाण काही अंशी कमी झाले असले तरी त्याचा जोर कमी झाला नसल्यामुळे पूर येण्याची शक्यता असलेली शहरे, गावे, तसेच दरडी कोसळण्याची टांगती तलवार असलेली गावे एकप्रकारे भीतीच्या सावटाखाली असताना येत्या १७ ऑगस्ट रोजी कर्जतमध्ये भाजपचा भव्य पक्ष प्रवेश सोहळा आयोजित करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे जनता पुरात, भाजपसह त्यांचे पालकमंत्री, नेते पक्ष प्रवेश सोहळ्यात अशी काहीशी परिस्थिती आहे. भाजपचे निष्ठावंत मात्र यावर छुपी नाराजी व्यक्त करतात.

- Advertisement -

दक्षिण रायगडप्रमाणेच कर्जत तालुक्यातील चिल्लार, उल्हास नदीला पूर येऊन मोठी हानी झाली आहे. विशेष म्हणजे चार दिवसांपूर्वी त्याच तालुक्यातील सोलनपाडा येथील भाजपच्या पक्ष प्रवेश कार्यक्रमाला पालकमंत्री चव्हाण उपस्थित होते. त्यांनी यावेळी पूरग्रस्त भागाला भेट दिली नसल्याने नाराजीची भावना आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -