घरमुंबईऐश्वर्या रायचा महावितरणविरोधात ‘जज्बा’

ऐश्वर्या रायचा महावितरणविरोधात ‘जज्बा’

Subscribe

विलंब शुल्काचा वाद वीज नियामक आयोगापुढे

ऐश्वर्या राय बच्चनने महावितरणविरोधात राज्य वीज नियामक आयोगाकडे धाव घेत आयोगाच्या आदेशाची अवमान केल्यासाठी याचिका दाखल केली आहे. महावितरणशी कराराअंतर्गत पवन ऊर्जा प्रकल्पासाठीच्या वीज विक्रीवरील पैसे थकवल्यासाठी ही याचिका दाखल करण्यात आली आहे. लवकरच या प्रकरणात राज्य वीज नियामक आयोगासमोर सुनावणी होणार आहे. महावितरणने आतापर्यंत आर्थिक परिस्थिती नाजुक असल्याचे सांगत पवन ऊर्जा प्रकल्पाचे पैसे थकीत ठेवले होते.

महावितरणने ऐश्वर्या राय बच्चन यांच्या मालकीच्या धुळे आणि सिन्नर येथील पवन ऊर्जा प्रकल्पातून एप्रिल २०१८ पर्यंत वीज पुरवठा केला होता. जवळपास वर्षभराच्या वीज पुरवठ्यासाठीचे ३.१ कोटी रूपये इतकी मुद्दल रक्कम त्यांच्या कंपनीला महावितरणकडून देणे अपेक्षित होते. पण महावितरणची आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याने ही रक्कम अदा करण्यास महावितरणकडून उशिर झाला. आता या मुद्दल रकमेवरील ८२ लाख ४८ हजार ६७९ रूपये इतकी विलंब आकारापोटीची रक्कम महावितरणने द्यावी, अशी मागणी ऐश्वर्या राय यांच्याकडून करण्यात आली आहे.

- Advertisement -

राज्य वीज नियामक आयोगाने जानेवारीमध्ये दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी महावितरणने केली नाही, म्हणून आयोगाकडे महावितरणविरोधात अवमान याचिकाही दाखल करण्यात आली आहे. महावितरणने दोन्ही प्रकल्पांतील वीज खरेदीसाठी मार्च आणि एप्रिल महिन्यात मुद्दल रक्कम त्यांच्या कंपनीला अदा केली आहे. पण आता या रकमेवरील विलंब शुल्कही द्यावा, अशी मागणी ऐश्वर्या राय बच्चन यांनी राज्य वीज नियामक आयोगाकडे केली आहे.

वीज खरेदी करारान्वये मूळ रक्कम दिल्यानंतरही मुद्दल रकमेवरील व्याज आणि मुद्दल देण्यासाठीचा विलंब शुल्क अशी रक्कम महावितरणने द्यावी असे याचिकेत नमूद करण्यात आली आहे. विलंब शुल्कापोटी ८२ लाख रूपयांची रक्कम महावितरणविरोधात दावा करण्यात करण्यात आली आहे.

- Advertisement -

पावसाळ्यात जेव्हा राज्यातील विजेची मागणी कमी होते तेव्हा महावितरणला पवन उर्जा प्रकल्पातून वीज उपलब्ध होते. मात्र अनेकदा ही वीज शाश्वत नसल्याने विजेच्या व्यवस्थापनासाठी ही वीज उपयुक्त ठरत नाही. म्हणून पवन ऊर्जा ही महावितरणच्या बाबतीत नाकापेक्षा मोती जड अशीच स्थिती आहे. राज्य वीज नियामक आयोगाने अपारंपरिक ऊर्जा खरेदीसाठीची अट घालून दिल्यानेच महावितरणला ही वीज घेण्याशिवाय इलाज नाही.

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -