घरमुंबईअजित पवारांचा व्हीप आमदारांना बंधनकारक राहील - अॅड. आशिष शेलार

अजित पवारांचा व्हीप आमदारांना बंधनकारक राहील – अॅड. आशिष शेलार

Subscribe

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना तोंडावर पडली असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा व्हीप आमदारांना बंधनकारक असेल," असे देखील ते यावेळी म्हणाले.

राज्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून हाय व्होल्टेज ड्रामा सुरु आहे. कोणालाही कल्पना नसताना शनिवारी सकाळी भाजपचे आमदार देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. सगळ्यात खळबळजनक म्हणजे राष्ट्रवादीचे आमदार अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर राज्याच्या राजकारणाला वेगळे वळण लागल्याचे आपण सर्वांनी पाहिले. यावर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांनी एकत्रितपणे हे सरकार बेकायदेशीर असल्याचे म्हणत सर्वोच्च न्यायालयाचे दार ठोठावले. आज सर्वोच्च न्यायालयाची सुनावणी पार पडली. उद्या सुद्धा या विषयावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आजच्या सुनावणीनंतर भाजपचे नेते अॅड. आशिष शेलार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, “सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावरुन असे स्पष्ट होते की, आजच्या आज फ्लोअरवर जाण्याची गरज नाही. या निकालामुळे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना तोंडावर पडली असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा व्हीप आमदारांना बंधनकारक असेल,” असे देखील ते यावेळी म्हणाले.

काय म्हणाले आशिष शेलार?

पत्रकारांशी संवाद साधताना अॅड. आशिष शेलार म्हणाले की, “आज सर्वोच्च न्यायालायच्या आदेशामुळे एक गोष्ट स्पष्ट झाली की, आजच्या आज फ्लोअरवर जाण्याची गरज नाही. त्यामुळे या निकालामुळे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना तोंडावर आपटली आहे. त्यामुळे त्यांचा कार्यक्रम आता आटोपला आहे. आजच्या आज फ्लोअर टेस्ट घ्यावी याबाबत न्यायालयाने निर्णय दिलेला नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देखील स्वतःचे म्हणणे मांडण्याची संधी न्यायालयाकडून देण्यात आली आहे. आमदार अजित पवार यांची गटनेतेपदी नियुक्ती वैध्य आहे. मात्र राष्ट्रवादीने नवीन नियुक्तीच्या आधारे दावा केला. मात्र अजित पवार हेच राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते आहेत. त्यांचाच व्हीप सर्व राष्ट्रवादीच्या आमदारांना बंधनकारक आहे. स्वतःच्या स्वार्थासाठी शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी संविधानिक पदांना बदनाम करण्याचे काम करत आहेत. राष्ट्रपती आणि राज्यपाल यांना बदनाम करणाऱ्यांचा आम्ही धिक्कार करतो. स्वतः लोकशाहीची घोषणा करायची आणि स्वतःच्या आमदारांना हॉटेलमध्ये ठेवले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली हे सरकार स्थापन होईल. आमदार अजित पवार यांचा व्हीप आमदारांना बंधनकारक राहील.”

- Advertisement -

हेही वाचा – जयंत पाटलांची नियुक्त अवैध – आशिष शेलार

अजित पवार यांची हकालपट्टी

दरम्यान, पक्षाच्या विरोधात जाऊन भाजपला पाठिंबा दिल्याने अजित पवार यांची राष्ट्रवादीच्या विधीमंडळ पक्षनेतेपदावरुन हकालपट्टी करण्यात आली आहे. या संदर्भातील सर्व अधिकार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे सोपवण्यात आले आहेत. तसेच राष्ट्रवादीच्या विधीमंडळ पक्षनेतेपदावर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील किंवा दिलीप वळसे पाटील यांची निवड होऊ शकते, अशी माहिती मिळाली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -