घरमुंबईअंधेरीत पूल कोसळल्यावर विनोद तावडे म्हणताहेत प्लॅन तयार केला जातोय…

अंधेरीत पूल कोसळल्यावर विनोद तावडे म्हणताहेत प्लॅन तयार केला जातोय…

Subscribe

गेल्याचवर्षी याच मार्गावर २९ सप्टेंबर रोजी एल्फिन्स्टन येथे पुलावर चेंगराचेंगरीमध्ये अनेकांना आपला जीव गमवावा लागला होता. त्याला एक वर्ष पूर्ण होण्याच्या आतच पुन्हा एकदा पूल कोसळल्यामुळे सरकारवर टीका होऊ लागली आहे.

मुंबईतील पायाभूत सुविधा हा कायमच चर्चेचा आणि चिंतेचा विषय राहिला आहे. त्यातच मुंबईची जीवनवाहिनी म्हणून ओळखली जाणारी येथील उपनगरीय रेल्वेसेवा सातत्याने टीकेची धनी होत असते. मंगळवारी सकाळी पश्चिम रेल्वे मार्गावरील अंधेरी येथील गोखले पादचारी पुलाचा काही भाग कोसळल्यामुळे पश्चिम रेल्वेची चर्चगेट ते विरार उपनगरीय सेवा ठप्प झाली. या अपघातात पाच जण जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. गेल्याचवर्षी याच मार्गावर २९ सप्टेंबर रोजी एल्फिन्स्टन येथे पुलावर चेंगराचेंगरीमध्ये अनेकांना आपला जीव गमवावा लागला होता. त्याला एक वर्ष पूर्ण होण्याच्या आतच पुन्हा एकदा पूल कोसळल्यामुळे सरकारवर टीका होऊ लागली आहे. या पार्श्वभूमीवर ‘एबीपी माझा’ वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत राज्याचे शिक्षणमंत्री आणि मुंबई उपनगरचे पालकमंत्री विनोद तावडे यांनी मुंबईतील रेल्वेसेवा आणि पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी प्लॅन तयार केला जातोय, असे सांगितले. त्याचबरोबर ही सर्व कामे लगेचच होणार नाहीत. त्याला वेळ लागेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली भाजपचे सरकार २०१४ मध्ये सत्तेवर आल्यानंतर सुरेश प्रभू यांच्याकडे रेल्वेमंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली होती. मंत्रिपद स्वीकारल्यानंतर त्यांनी रेल्वेच्या पायाभूत सुविधा सुधारण्याकडे आपण जास्त लक्ष देऊ असे सांगितले होते. पहिल्या अर्थसंकल्पापासूनच त्यांनी कोणत्याही नव्या रेल्वेगाड्या सुरू करण्यापेक्षा रेल्वेसेवेचा दर्जा सुधारण्याला प्राधान्य दिले होते. त्यांच्या या निर्णयाचे सर्वांनी स्वागत केले होते. तरीही गेल्या चार वर्षात मुंबईतील उपनगरीय रेल्वेसेवेच्या दर्जात अपेक्षित सुधारणा होऊ शकलेली नाही. त्यातच पावसाळ्यात मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर पाणी साचत असल्यामुळे उपनगरीय रेल्वेगाड्या नियमित वेळेत धावू शकत नाहीत. या स्थितीत गेल्या चार वर्षात कोणताही बदल झालेला नाही, त्यामुळे सामान्य मुंबईकरांमध्ये चीड आहे. रेल्वेमार्गावर उभारण्यात आलेले वाहतुकीचे आणि पादचारी पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.

- Advertisement -

२०१६ मध्येच पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट ते विरार मार्गावरील सर्व पूल सुरक्षित असल्याचा अहवाल विभागीय अभियंते तुषार मिश्रा यांनी दिला होता. या नंतरही मंगळवारी सकाळी पादचारी पुलाचा भाग कोसळला आणि रेल्वे वाहतूक ठप्प झाली. एवढं सगळं घडल्यानंतरही विनोद तावडे प्लॅन तयार केला जात असल्याचे मुलाखतीत सांगत असल्यामुळे मग गेल्या चार वर्षात काय झाले, असा प्रश्न मुंबईकर विचारू लागले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -