घरमुंबईसफाळ्यात देहदान जागृतीसाठी स्मशानभूमीत कला शिबिर

सफाळ्यात देहदान जागृतीसाठी स्मशानभूमीत कला शिबिर

Subscribe

अवयवदानामुळे आपले अवयव जगतील व जगवतील…चला बदलूया… स्मशानातला अंतिम स्थान म्हणण्यापेक्षा अवयवदान करून स्मशानाला जीवनाचे जंक्शन बनवूया… या अभिनव कल्पनेद्वारे सफाळे येथील स्मशानभूमीमध्ये देहदान विषयीचा जनजागृतीपर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी चित्रकर्ती अमृता शेरगिल यांचे प्रसिद्ध नाटक ‘तुझी आम्री व आपट्याची पाने’ यांचे अभिवाचन करण्यात आले.

देहदान व अवयवदान याविषयी जनमानसात जनजागृती व्हावी. तसेच कला व कला मूल्यांचा सामान्यांपर्यंत प्रसार व्हावा, या उद्देशाने आयोजित या शिबिरात विद्यार्थी व नागरिकांच्या अवयवदानाविषयीच्या संकल्पना चित्र रूपामध्ये उतरवण्यात आल्या. या शिबिराचा सांगता समारंभ सफाळे येथील स्मशानभूमीत आयोजित करण्यात आला होता. स्मशानभूमीत या प्रसंगी देहदान अवयवदान विषयी माहिती देणार्‍या 70 हून अधिक चित्रांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. स्मशानाविषयी विद्यार्थी, लहान मुले तसेच महिलांमध्ये असलेली भीती दूर करण्याच्या उद्देशाने स्मशानाला जीवनाचे अंतिम स्थानक न मानता अवयवदान व देहदानाचे एक जंक्शन बनवूया व पुन्हा नवीन जीवनाला सुरुवात करूया याअनुषंगाने हा कार्यक्रम करण्यात आला होता.

- Advertisement -

मीमरा कलासंकुल, सफाळे व फेडरेशन ऑफ ऑरगन अँड बॉडी डोनेशन, मुंबई आयोजित अवयवदान जागृती मोहीमेअंतर्गत पालघर जिल्ह्यातील शिक्षकांसाठी ‘देहदान व अवयवदान’ या विषयावर जिल्हास्तरीय निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. शिशुवर्ग ते बारावीपर्यंतच्या शिक्षकांसाठी असलेल्या या स्पर्धेत अनेक शिक्षकांनी सहभाग घेतला होता. या निबंध लेखन स्पर्धेत पालघर येथील माध्यमिक विद्यालय भगिनी समाज शाळेच्या मुख्याध्यापिका प्रणिता योगेश वर्तक प्रथम क्रमांकाच्या मानकरी ठरल्या. प्रसिद्ध साहित्यिका, लेखिका वीणा गवाणकर यांच्या हस्ते त्यांना प्रशस्तीपत्रक, कॅम्लीन कोकियोतर्फे भेट वस्तू व रोख रक्कम देऊन प्रणिता वर्तक यांचा गौरव करण्यात आला.

देशभरात रोज लहान-मोठे सहाशेवर अपघात होतात. यात अनेक जण दगावतात. पण मृत्यूनंतर त्यांचे चांगल्या स्थितीत असलेले अवयव अन्य रुग्णांना उपयोगी पडावेत म्हणून दान करण्याबाबत फारसे गांभीर्य दाखवले जात नाही. अमेरिकेत अवयवदानाचे प्रमाण 12 टक्के आहे. आपल्याकडे अवघे एक टक्काही नाही. तेथे रोज 100 जणांचे अवयव दान होते, तर आपल्याकडे वर्षभरातही एवढे होत नाही, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

- Advertisement -

फास्टफूडच्या सेवनाने तसेच व्यायामाच्या अभावाने लठ्ठपणा वाढत चालला आहे. त्याचा परिणाम लिव्हरचे आजार वाढण्यात होतो. मद्यपानासारख्या सवयी, कावीळ यामुळेही यकृत खराब होते. उपचारांमुळे ते बरे होऊ शकते. पण निकामी झाले असेल तर प्रत्यारोपणाचा पर्याय असतो. सुदृढ व्यक्ती स्वतःते किमान 30 टक्के यकृत दान करू शकते. सहा आठवड्यांत त्याचे यकृत पुन्हा पूर्ववत होते. पण यकृतच नव्हे तर नेत्र, हृदय, त्वचा व अन्य शारीरिक अवयवांच्या दानाबाबत गैरसमज आहेत व ते दूर करण्यासाठी जनजागृती आवश्यक आहे,’ असे मतही व्यक्त करून अवयव दानाविषयी जनजागृती करण्यात आली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -