घरमुंबईआचारसंहितेपूर्वीच होणार निओ मेट्रोचे भूमिपूजन

आचारसंहितेपूर्वीच होणार निओ मेट्रोचे भूमिपूजन

Subscribe

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेतला

नाशिक : शहरातील ३१ किलोमीटर मार्गावर धावणार्‍या देशातील पहिल्या टायरबेस निओ मेट्रो प्रकल्पाचा मान नाशिकला देण्यासाठी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेतला आहे. मार्चच्या दुसर्‍या आठवड्यात केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता घेवून या प्रकल्पाचे ऑनलाईन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत भूमिपूजनाची तयारी सुरू झाल्याचे वृत्त आहे.महापालिका निवडणुकीच्या तोंडावर नाशिकचे कथित दत्तकपिता फडणवीस यांनी वेगाने मोठ्या प्रकल्पांच्या भूमिपूजनाची तयारी सुरू केली आहे. त्याचाच भाग म्हणून गेल्या महिन्यात त्यांनी नाशिकमध्ये कार्यकर्ता मेळावा घेताना पाच वर्षात कशापद्धतीने नाशिकसाठी मोठे प्रकल्प दिले याची यादी वाचली. राज्यात सत्ता असती तर नाशिकचा अधिक विकास करू शकलो असतो, असे भावनिक आवाहन केले.

फडणवीसांनी दिलेल्या शब्दानुसार सीएनजी बससेवा, घरगुती गॅस पाईपलाईन, स्मार्ट लायटिंग असे मोठे प्रकल्प सुरू आहेत. तर, आयटी हब, लॉजिस्टिक पार्क, नमामी गोदा असे प्रकल्प मंजुरीच्या प्रक्रियेत आहेत. यासर्वात निओ मेट्रो प्रकल्प महत्वाचा असून दोन वर्षापासून रखडलेल्या या प्रकल्पाला गती देण्यासाठी फडणवीसांनी कंबर कसली आहे. त्याचाच भाग म्हणून नाशिक दौर्‍यात या प्रकल्पाला असलेल्या अडचणीची धावती माहिती फडणवीस यांनी घेतल्याचे समजते. तसेच, मेट्रो प्राधिकरणाच्या अधिकार्‍यांशी चर्चा केली असून, संबंधित प्रकल्पासाठी पालिकेने जागा उपलब्ध करून देण्याची तयारी दाखवली आहे.सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम सुरू असून केंद्र शासनाने या प्रकल्पासाठी केंद्रीय अर्थसंकल्पात २०९२ कोटींची तरतूद केली.

- Advertisement -

मध्यंतरी हा प्रकल्प उत्तर प्रदेश निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वाराणसी व गोरखपुर येथे करण्याच्या हालचाली होत्या. त्यामुळेच केंद्रीय मंत्रीमंडळाच्या मान्यतेसाठी असूनही नाशिकच्या निओ मेट्रोला चालना मिळत नव्हती. आता उत्तर प्रदेश निवडणुका आटोपण्याची वेळ आल्याने किमान नाशिकचा प्रकल्प तरी सुरू करता यासाठी खुद्द फडणवीसांनी लक्ष घातल्याचे समजते. त्याचाच भाग म्हणून मार्चच्या दुसर्‍या आठवड्यात केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता घेत भूमिपूजनाची तयारी भाजपने सुरू केल्याचे समजते.

असा आहे प्रकल्प :  निओ मेट्रो म्हणजे सोप्या भाषेत टायरवर चालणारी जोडबस. एका बसची लांबी २५ मीटर असून २५० प्रवाशी क्षमतेची जोडबस धावणार आहे. काही ठिकाणी ही जोडबस ओव्हरहेड वायरद्वारे इलेक्ट्रीकवर चालण्याची व्यवस्था असेल. निओ मेट्रोसाठी ३१ किलोमीटर लांबीचे दोन एलिव्हेडेट मार्ग तयार केले जाणार आहेत. या मार्गावर चार वर्षांत हा प्रकल्प पूर्ण केला जाणार आहे. या प्रकल्पासाठी २१००.६ कोटी खर्च येणार असून महाराष्ट्र सरकार, सिडको आणि पालिकेचा वाटा २५५ कोटींचा असेल. केंद्र सरकार ७०७ कोटी देणार आहे. तर, ११६१ कोटींचे कर्ज उभारले जाईल. जागा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी पालिकेची असेल

- Advertisement -

निओ मेट्रोच्या ही असतील वैशिष्ठ्ये

  • देशातील पहिली एलिव्हेटेड टायरबेस मेट्रो सेवा
  •  २५ मीटर लांबीच्या २५० प्रवासी क्षमतेच्या जोड बस
  • जोड बसेस ओव्हरहेड इलेक्ट्रिक वायरच्या आधारे धावणार
  • दोन एलिव्हेटेड कॉरिडोर व दोन फिडर कॉरिडोर उभारणार
  • एकूण ३१.४० किलोमीटर लांबीचे एलिव्हेटर गंगापूर ते नाशिक रेल्वेस्थानक २२ किलोमीटरचा पहिला कॉरिडोर पहिल्या कॉरिडोरवर १९ स्टेशन्स
  • गंगापूर ते मुंबई नाका १० किलोमीटरचा दुसरा कॉरिडोर
  • द्वारका क्रॉसिंगवरील उड्डाणपुलावर आणखी एक उड्डाणपूल
  • पालिकेला १० टक्के आर्थिक भार उचलावा लागणार
Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -