घरताज्या घडामोडीमलबार हिल येथील जलाशयाची पुनर्बांधणी करण्यात येणार, पालिका करणार ६९८ कोटींचा खर्च

मलबार हिल येथील जलाशयाची पुनर्बांधणी करण्यात येणार, पालिका करणार ६९८ कोटींचा खर्च

Subscribe

मुंबई शहर भागातील मंत्रालय, चर्चगेट, सीएसएमटी , गिरगाव, चंदनवाडी आदी परिसरात दैनंदिन पाणीपुरवठा करणाऱ्या फिरोजशहा मेहता उद्यान मलबार हिल येथील १४० वर्षे जुन्या जलाशयाचे आयुर्मान संपुष्टात आले आहे. त्यामुळे या जलाशयाची पुनर्बांधणी करण्यात येणार असून त्यासाठी कंत्राटदार मे. स्कायवे इन्फ्राप्रोजेक्टस याला तब्बल ६९८ कोटी रुपये मोजणार आहे.

आश्चर्याची व धक्कादायक बाब म्हणजे या कंत्राटदाराने यापूर्वी कल्याण येथे टर्न की आधारावर सर्व सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल व इंस्ट्रुमेन्टेशनच्या कामाचे डिझाईन, बांधकाम, उभारणी, चाचणी, कार्यान्वित करणे आणि विविध मलनि:सारण पंपिंग स्टेशन, चढती, मुख्य नलिका, सांडपाणी प्रक्रिया सुरू करण्याबाबतचे १४६ कोटींचे काम केले आहे. तर कुळगाव बदलापूर येथे भूमिगत मलनि:सारण रचना विकसित करण्याचे १३५ कोटींचे काम केल्याचा अनुभव आहे. मात्र यापूर्वी कुठेही जलाशयाचे बांधकाम केल्याचा अनुभव देण्यात आलेला नसताना या कंत्राटदाराला मुंबई महापालिकेकडून तब्बल ६९८ कोटींचे जलाशय पुनर्बांधणी करण्याचे कंत्राटकाम देण्यात येणार आहे. त्यामुळे या प्रस्तावावर विरोधक व भाजप यांच्याकडून जोरदार आक्षेप घेतला जाण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

- Advertisement -

मलबार हिल जलाशय हे फिरोजशहा मेहता उद्यान येथे असून त्याची साठवण क्षमता १४७.७८ दशलक्ष लिटर इतकी आहे. मात्र १४० वर्षे झाल्याने आता या जलशयाची पुनर्बांधणी होणे आवश्यक असल्याने पालिकेने या जलाशयाची पुनर्बांधणी करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी टेंडर मागवले असता तीन कंत्राटदारांनी त्यात सहभाग घेतला. मे. स्कायवे इन्फ्राप्रोजेक्टस या कंत्राटदाराने पालिकेच्या अंदाजित खर्चापेक्षा ४८.८८% जादा दरात काम करण्याची तयारी दर्शवली. त्या तुलनेत इतर कंत्राटदारांनी अनुक्रमे ५६.००% व ६४.७४ जास्त दर भरले होते. त्या तुलनेत कमी दरात म्हणजे मे. स्कायवे इन्फ्राप्रोजेक्टस या कंत्राटदाराचे दर कमी वाटल्याने व पालिकेने त्यात आणखीन वाटाघाटी करून कपात केल्याने याच कंत्राटदाराला हे काम देण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे.

कंत्राटदाराने वाटाघाटीनंतर ४८.८८% दरात ८.९८% आणखीन कमी दर करून ते काम ३९.९०% जादा दरात काम करण्याची तयारी दर्शवली. त्यामुळे कंत्राट रक्कम, ४% भौतिक सादिलवर, जलआकार, मलनि:सारण आकार, तांत्रिक व्यवस्थापन व सल्लागार शुल्क असे मिळून एकूण ६९८ कोटी ९५ लाख रुपयांत व पुढील ८ वर्षात सदर जलाशयाचे काम करण्यात येणार आहे. या जलाशयाचे काम करताना विभागातील पाणीपुरवठयावर परिणाम होऊ नये यासाठी बाजूलाच २३ दशलक्ष लिटर क्षमतचा नवीन जलाशय व १४ दशलक्ष लिटर क्षमतेची पाण्याची टाकी उभारण्यात येणार आहे.

- Advertisement -

हेही वाचा : स्थायी समितीचे चार हजार कोटींचे २९७ प्रस्ताव, शेवटची बैठक वादळी होण्याची शक्यता

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -