घरमुंबईCorona Update : मुंबईत दीड महिन्यात ४५ लाख नागरिकांच्या लसीकरणाचे लक्ष्य! 

Corona Update : मुंबईत दीड महिन्यात ४५ लाख नागरिकांच्या लसीकरणाचे लक्ष्य! 

Subscribe

पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी कोरोनाबाबत विशेष बैठक घेतली.

मुंबईत कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येला रोखण्यासाठी यापुढे दररोज एक लाखप्रमाणे दीड महिन्यात ४५ लाख नागरिकांचे लसीकरण करण्यात यावे. तसेच, दररोज किमान ५० हजार नागरिकांच्या कोरोना चाचण्या करण्यात याव्यात, असे आदेश पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी प्रशासनाला दिले आहेत. आयुक्‍त चहल यांनी शुक्रवारी दुपारी व्हिडिओ कॉन्फरसिंगच्या माध्यमातून कोरोनाबाबत विशेष बैठक घेतली. या बैठकीला महापालिकेचे सर्व अतिरिक्‍त आयुक्‍त, संबंधित सहआयुक्‍त, उपायुक्‍त, सहाय्यक आयुक्‍त, रुग्‍णालयांचे अधिष्‍ठाता व प्रमुख उपस्थित होते. कोरोनाला रोखण्यासाठी लसीकरण व चाचण्यांची संख्या वाढवणे आणि त्यासाठी स्‍थानिक नगरसेवकांसह सामाजिक, सेवाभावी संस्‍थांची मदत घेण्याचे आदेश चहल यांनी दिले आहेत.

दररोज किमान एक हजार जणांचे लसीकरण

लसीकरण संख्या वाढवण्यासाठी खासगी रुग्णालयांची संख्या ५९ वरून ८० पर्यंत वाढवण्यात येणार आहे. त्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्यात येत आहे. खासगी रुग्णालयांत लसीकरणाची प्रक्रिया मंदावली असून त्यात वाढ होण्यासाठी प्रत्येक खासगी रुग्‍णालयाने दररोज किमान एक हजार जणांचे लसीकरण करावे, असे आवाहन आयुक्तांनी केले आहे. सध्या सर्व ५९ खासगी रुग्णालयांत मिळून दररोज फक्त ४ हजार लोकांचे लसीकरण केले जात आहे. मात्र, खासगी रुग्‍णालयांनी शासकीय दरपत्रकाप्रमाणे देयक आकारावे, निरीक्षणासाठी महापालिकेच्‍या लेखापरीक्षकांची पुन्‍हा नियुक्‍ती करण्यात येणार आहे. मुंबईत दैनंदिन चाचण्‍यांची संख्‍या २५ हजारांवरुन टप्प्याटप्प्याने ५० हजारांवर नेण्‍याचे लक्ष्‍य गाठण्यात येणार आहे.

- Advertisement -

लस घेणाऱ्या नागरिकांची काळजी घ्या

लसीकरणासाठी येणाऱ्या नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी लसीकरणाचे जास्‍तीत जास्‍त बूथ करावेत. पुरेशी जागा, कर्मचारी वर्ग, पिण्‍याचे पाणी, चहा-कॉफी, बैठक व्‍यवस्‍था आदी बाबींची पूर्तता करावी, असे चहल यांनी आदेश दिले आहेत. तसेच पहिला आणि दुसरा डोस घेणाऱ्या नागरिकांसाठी स्‍वतंत्र कक्ष करावेत, जेणेकरुन लवकर लस देता येईल आणि गर्दी होणार नाही, असेही चहल यांनी सुचवले आहे. खासगी रुग्‍णालयांनी लसीकरणाची वेळ सकाळी ९ ते रात्री ९ अशी केल्‍यास अधिकाधिक नागर‍िक लस घेवू शकतील. शक्‍य असल्‍यास २४ तास लसीकरणाची सोय करण्‍याचाही पर्याय विचारात घ्‍यावा, असे चहल म्हणाले.

पुढील चार-सहा आठवडे महत्वाचे

वाढती रुग्‍णसंख्‍या पाहता येणारे चार ते सहा आठवडे हे अत्‍यंत महत्वाचे असतील. चाचण्‍यांसोबत बाधित रुग्‍णांचे प्रमाणही अधिक आढळू शकते, असा इशारा यावेळी आयुक्तांनी दिला आहे. कोरोनाची सौम्‍य, मध्‍यम तसेच तीव्र लक्षणे असलेल्‍या रुग्‍णांसाठी पुरेशा संख्‍येने रुग्‍णशय्या उपलब्ध असणे, त्याचप्रमाणे शासकीय आणि मुंबईतील सर्व खासगी रुग्‍णालयांनी जुलै २०२० मध्‍ये असलेली रुग्‍णशय्या क्षमता पुन्‍हा एकदा उपलब्‍ध करणे आवश्‍यक असल्याचे चहल यांनी म्हटले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -