घरमुंबईBMC : महापालिका राबविणार डेंग्यू, मलेरिया 'रॅपिड' शोध मोहीम; खासगी रुग्णालयांची घेणार...

BMC : महापालिका राबविणार डेंग्यू, मलेरिया ‘रॅपिड’ शोध मोहीम; खासगी रुग्णालयांची घेणार मदत

Subscribe

 

मुंबई: पावसाळ्यात अनेकदा डेंग्यू-मलेरिया यासारख्या आजारांचे निदान लवकर न झाल्याने हे आजार बळावतात आणि प्रसंगी प्राणघातकही ठरू शकतात. त्यामुळे डेंग्यू, मलेरिया (हिवताप) या सारख्या आजारांशी मुकाबला करण्यासाठी व त्यांना प्रतिबंध करण्यासाठी मुंबई महापालिका आरोग्य यंत्रणा खासगी रुग्णालये, प्रयोगशाळा दवाखाने, डॉक्टर यांच्या सहकार्याने कोविड विरोधातील लढ्याच्या धर्तीवर सुधारित कार्यपद्धती वापरून डेंगी, मलेरिया ‘रॅपिड’ शोध मोहीम राबविणार आहे. या शोध मोहीमेमुळे रुग्ण संख्या वाढल्यास त्वरित व वेळेत उपचार देणे शक्य होणार आहे.

- Advertisement -

हेही वाचाःआनंदाची बातमी : तलावांत चांगला पाऊस; 10 सप्टेंबरपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा

सर्व खासगी प्रयोगशाळा व रुग्णालये यांनी त्यांच्याकडील सर्व डेंग्यू व मलेरिया रुग्णांची माहिती पालिकेला देणे बंधनकारक असेल, असे परिपत्रक कार्यकारी आरोग्य अधिकारी यांमार्फत काढण्यात आले आहे. अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे यांच्या मार्गदर्शनात महापालिकेचे सार्वजनिक आरोग्य व संबंधित यंत्रणांची एक विशेष बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीदरम्यान डॉ. शिंदे यांनी कोविड विरोधातील लढ्याच्या धर्तीवर डेंग्यू मलेरिया विरोधी मोहीम अधिक प्रभावीपणे राबविण्याची निर्देश दिले आहेत.

- Advertisement -

या अंतर्गत डेंग्यू, मलेरियाची लक्षणे असणाऱया रुग्णांचा मोहीम स्वरूपात शोध घेण्याचे व लक्षणे आढळून आल्यास वैद्यकीय चाचणी करण्याचे निर्देश दिले आहेत. या चाचणीमध्ये डेंग्यू, मलेरियाचे निदान झालेल्या रुग्णांनी वेळेवर औषध घ्यावे व आवश्यक ती काळजी घ्यावी, यासाठी ‘टेलिफोनिक फॉलोअप’ घेता यावा, याकरिता सर्व २४ विभागांमध्ये कार्यरत असलेल्या नियंत्रण कक्षांमार्फत कार्यवाही करण्याचे निर्देशही डॉ. शिंदे यांनी दिले आहेत, अशी माहिती मुंबई महापालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शहा यांनी दिली आहे. तसेच, आरोग्य केंद्रामार्फात केलेल्या शोध मोहिमेअंतर्गत डेंगी किंवा मलेरियाचा रुग्ण आढळून आलेल्या कुटुंबासह जवळपासच्या परिसरातील सुमारे २५० घरांमधील नागरिकांचे ‘रॅपिंड’ सर्वेक्षण करून तापसदृश्य रुग्णांचे रक्तनमुने संकलित करून त्याच दिवशी प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले जातात.

# महत्वाची माहिती

# कोविड काळात विभाग स्तरावर कार्यान्वित करण्यात आलेल्या ‘कोविड वॉर रूम’ यांचा उपयोग डेंग्यू, मलेरिया व पावसाळी आजार यांच्या प्रतिबंधासाठी करण्याचे निर्देश.

# प्रत्येक विभागीय ‘वॉर रूम मध्ये एक डॉक्टर, एक समन्वयक आणि एक डेटा एन्ट्री ऑपरेटर दोन सत्रांमध्ये काम करतील.

# १ जुलै २०२३ पासून तात्काळ लागू करण्यात आलेल्या सुधारित कार्यपद्धती अंतर्गत कोविडच्या धर्तीवर घरोघर जाऊन शोधमोहीम घेणार

# रॅपिड सर्वेक्षण करताना वैद्यकीय आरोग्य अधिकारी, सार्वजनिक आरोग्य खाते, कीटक नियंत्रण अधिकारी, कीटक नियंत्रण विभाग आणि मलेरिया संनिरीक्षण विभाग यांनी संयुक्तपणे मोहीम राबविण्याचे निर्देश

# जेणेकरून एकाच वेळी रुग्ण शोधणे, रुग्णांवर उपचार करणे आणि डासांची उत्पत्ती स्थळे शोधून ती नष्ट करणे यासारखी कार्यवाही एकत्रितपणे करणे शक्य होईल.

# नागरिकांना डासांची उत्पत्ती स्थळे कशी शोधावी व ती कशी नष्ट करावी याबाबत संयुक्त मोहिमेदरम्यान व्यापक जनजागृती व प्रचार करण्यात येणार.

# नागरिकांनी आपल्या घरामध्ये, घराच्या आजूबाजूला व सोसायटीच्या परिसरात कुठेही साचलेले पाणी असणार नाही याची दक्षता घ्यावी. साचलेल्या पाण्यातच डासांची मादी अंडी घालते व डासांची उत्पत्ती स्थळे तयार होतात ही बाब लक्षात घेऊन साचलेले पाणी आढळून आले असता तात्काळ नष्ट करणे.

# टायर, नारळाच्या करवंट्या, प्लास्टिकच्या बाटल्या व बाटल्यांची झाकणे, झाडांच्या कुंड्या व त्या कुंड्यांखालील ताटल्या, फ्रीज च्या खालील डिफ्रॉस्ट ट्रे यात साचलेले पाणी असणार नाही याची दररोज पाहणी करावी व दक्षता घ्यावी.

# फेंगशुई, मनी प्लांट यासारख्या शोभेच्या रोपट्यांचे पाणी नियमितपणे बदलणे

 

कीटकजन्य आजार (मलेरिया आणि डेंगी) प्रतिबंधासाठी सल्ला

# हे करावे

# दिवसा आणि रात्री झोपताना मच्छरदाणी किंवा डास प्रतिकारक औषधांचा वापर करावा.

# कुलर आणि लहान कंटेनरमधून नियमितपणे पाणी काढा. सर्व जलस्त्रोत पूर्णपणे झाकलेले आहेत याची खात्री करा.

# डासांची उत्पत्ती होणारी ठिकाणे काढून टाकणे.

# बाल्कनीतील प्लेट, एसी ट्रे, मातीची भांडी, फ्रीज ट्रे स्वच्छ करणे

# धुतलेली भांडी ठेवणारे स्वयंपाकघरातील रॅक स्वच्छ ठेवणे

 

# हे करू नये

# जुने टायर,पाण्याच्या टाक्या, नळ्या, प्लास्टिक कंटेनर यांसारख्या वस्तू जमा करणे टाळावे. कारण त्यातून डासांची उत्पत्ती होते.
डासांची पैदास होऊ नये म्हणून पाण्याचे डबे बंद ठेवावेत, असे आवाहन पालिकेने केले आहे.
# जलजन्य आजारांसाठी (गॅस्ट्रो, हिपॅटायटीस, टायफॉइड) खबरदारीचे उपाय
# गॅस्ट्रोपासून बचाव करण्यासाठी रस्त्यावरच्या उघड्या पदार्थाचे सेवन करणे टाळावे.
# खाण्यापूर्वी स्वच्छ हात धुवा किंवा सॅनिटायझरचा वापरा करा .
# पाणी उकळून प्यावे .

 

# एच 1 एन 1 च्या प्रतिबंधासाठी मार्गदर्शक सूचना

# गर्दीची ठिकाणे टाळा.

# शिंकताना किंवा खोकताना रुमालाचा योग्य वापर करावा

#  वारंवार साबणाने हात धुवणे

# डोळे, नाक किंवा तोंडाला स्पर्श करणे टाळा

# तीव्र ताप, श्वास घेण्यास त्रास किंवा त्वचा / ओठ निळे पडणे अशी लक्षणे दिसत असल्यास तत्काळ मनपाच्या आरोग्य सुविधा केंद्रामध्ये जाऊन डॉक्टरांचा योग्य सल्ला घेणे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -