घरताज्या घडामोडीबेस्टमधील बस चालकांचा सलग दुसऱ्या दिवशी संप सुरुच, वेतन न दिल्याने कर्मचारी...

बेस्टमधील बस चालकांचा सलग दुसऱ्या दिवशी संप सुरुच, वेतन न दिल्याने कर्मचारी संतप्त

Subscribe

बेस्ट उपक्रमातील वडाळा, वांद्रे व विक्रोळी या तीन बस डेपोंमधील भाडे तत्त्वावरील बस गाड्यांवरील बस चालकांना कंत्राटदाराने ३ महिन्यांपासून वेतन न दिल्याने या बस चालकांनी गुरुवारी सकाळपासून अचानक संप पुकारला आहे. बेस्ट व्यवस्थापनाने या संपात हस्तक्षेप करून कंत्राटदाराला तंबी दिली होती. त्यानंतर चर्चा होऊन संप मागे घेण्याचा निर्णय झाला. मात्र त्या बस चालकांना अद्यापही त्यांचे वेतन न दिल्याने त्यांनी हा संप सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

त्यामुळे या ३ डेपोंमधील बस गाड्यांमधून विविध ठिकाणी प्रवास करणाऱ्या हजारो बस प्रवाशांचे खुपच हाल झाले. या प्रवाशांना टॅक्सी, रिक्षा, रेल्वे यांचा आधार घेऊन प्रवास करावा लागला. त्यामुळे या प्रवाशांनी बेस्ट उपक्रमाच्या नावाने बोटे मोडीत व शिव्यांची लाखोली वाहत बेस्टचा चांगलाच ‘उद्धार’ केला. बेस्ट उपक्रमाने या संपाची गंभीर दखल घेऊन प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी इतर मार्ग तसेच इतर आगारांमधून स्वतःच्या ८६ बस गाड्या रस्त्यावर उतरवल्या आहेत. त्यामुळे सदर मार्गावरील प्रवाशांना थोडाफार दिलासा मिळाला आहे.

- Advertisement -

दरम्यान, भाडे तत्त्वावरील बस सेवा देणाऱ्या व बस चालकांचे वेतन थकविणार्या कंत्राटदारावर बेस्ट उपक्रमाकडून करारातील अटी – शर्तींचे उल्लंघन झाल्याने दंडात्मक कारवाई करण्याचे अथवा त्याचे कंत्राटं रद्द करण्याचे संकेत मिळत आहेत.

प्राप्त माहितीनुसार, बेस्ट उपक्रमाने कोट्यवधी रुपयांच्या तोट्यातून बाहेर पडण्यासाठी व बेस्ट परिवहन विभागाचा बस ताफा वाढून बेस्ट प्रवाशांना अधिक चांगली सुविधा देण्यासाठी भाडे तत्त्वावरील बस सेवा काही महिन्यांपूर्वी सुरू केली. या बस सेवेला चांगला प्रतिसादही मिळाला व आजही मिळत आहे. बेस्ट उपक्रमाने मध्यंतरी भाडे दरातही कपात केली. साध्या बसचे किमान भाडे म्हणजे तिकीट दर अवघे ५ रुपये तर एसी मिनी बसचे किमान तिकीट दर अवघे ६ रुपये केले. त्यामुळे बेस्टच्या प्रवासी संख्येत काहीशी वाढही झाली. कोविड काळात रेल्वे प्रवासावर सर्वसाधारण व्यक्तीना बंदी घातली गेल्याने त्यावेळी बेस्ट बस हाच सर्वांचा आधार बनली होती.

- Advertisement -

बेस्ट उपक्रम आजही कोट्यवधी रुपयांनी तोट्यात सुरू आहे. बेस्टला मुंबई महापालिकेकडून जमेल तशी आर्थिक मदत, अनुदान मिळत असल्याने जवळजवळ “आयसीयू” मध्ये दाखल झालेल्या परिवहन विभागाला, बस सेवेला अर्थ व्यवस्थेमुळे “ऑक्सिजन” मिळत आहे. मात्र बेस्ट उपक्रमातील नियोजनात काही अभाव असल्याने व राज्य आणि केंद्र सरकारकडून ठोस आर्थिक मदत मिळत नसल्याने बेस्ट यापुढेही “आयसीयू” कक्षातच दाखल राहणार असे आजचे चित्र आहे.ह

‘त्या’ कंत्राटदारावर कडक कारवाई होण्याची शक्यता

बेस्ट उपक्रमात, एम्. पी. ग्रूपच्या कंत्राट दाराकडून भाडेतत्त्वावर चालवण्यात येणाऱ्या १७५ बसगाड्या वेळापत्रकानुसार चालविणे आवश्यक होते. परंतु कामगारांचे वेतन न दिल्यामुळे वडाळा वांद्रे आणि विक्रोळी या आगारांमधून आज एकही बस गाडी आतापर्यंत प्रवर्तित झालेली नाही. प्रवाशांची गैरसोय होऊ नये, याकरिता बेस्ट उपक्रमाने इतर मार्ग तसेच इतर आगारांमधून स्वतःच्या ८६ बस गाड्या प्रवर्तित केलेल्या आहेत. सदर कंत्राटदार विरुद्ध कंत्राटातील अटी आणि शर्ती नुसार दंड वसुली अथवा कंत्राट रद्दबातल करणे यापैकी जे कंत्राटामध्ये परिस्थिती अनुरूप मान्यताप्राप्त असेल तशी कारवाई प्रशासन करेल, असे बेस्ट प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.


हेही वाचा : Hanuman Chalisa: मातोश्रीसमोर उद्या हनुमान चालीसा पठण करणारच, राणा दांपत्य ठाम

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -