घरमुंबईपानसरे हत्याकांडाची उकल होणार?

पानसरे हत्याकांडाची उकल होणार?

Subscribe

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणात सीबीआयने औरंगाबाद येथून सचिन अंदुरे याला बेड्या ठोकल्या. अंदुरे याने दाभोलकरांवर गोळ्या झाडल्या असा सीबीआयीचा दावा आहे. तब्बल पाच वर्षे उलटली तरी दाभोलकर हत्या प्रकरणाची उकल करण्यात तपास यंत्रणांना अपयश येत होते.

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणात सीबीआयने औरंगाबाद येथून सचिन अंदुरे याला बेड्या ठोकल्या. अंदुरे याने दाभोलकरांवर गोळ्या झाडल्या असा सीबीआयीचा दावा आहे. तब्बल पाच वर्षे उलटली तरी दाभोलकर हत्या प्रकरणाची उकल करण्यात तपास यंत्रणांना अपयश येत होते. या कालखंडात कॉ. गोविंद पानसरे, एम.एम.कलबुर्गी आणि पत्रकार गौरी लंकेश यांच्याही हत्या एकाच मोडस ऑपरेंडीने झाल्या. त्यामुळे या हत्यासत्राबाबत तपास यंत्रणा चांगल्याच चक्रावून गेल्या होत्या. या सर्व हत्याच एकाच सूत्राने झाल्या असल्यामुळे लवकरच कॉ. पानसरे यांच्याही हत्येची उकल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पुरोगामी विचारवंताच्या या हत्या विचारांच्या आधारावर झाल्याचे पोलिसांच्या तपासातून उघड होऊ लागले आहे.

दाभोलकर-पानसरे यांच्या कुटुंबियांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करून याचा पाठपुरावा सुरू ठेवला. मागील सुनावणीच्या वेळी कोर्टात गृहसचिव, सीबीआयचे उपसंचालक, एटीएसचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. त्यांनी सीलबंद तपास अहवाल दिला, मात्र न्या. धर्माधिकारी यांनी तो न उघडताच फेकून देत कर्नाटकप्रमाणे तपास करण्याचे निर्देश दिले. त्यामुळे काही दिवसांत नालासोपारा येथून वैभव राऊत याला शस्त्रसाठ्यासह अटक करण्यात आली, तसेच शरद कळसकर तसेच सुधन्वा गोंधळेकर यांना अटक करण्यात आली. या तिघांच्या तपासातून शनिवारी औरंगाबाद येथून सचिन अंदुरे याला अटक करण्यात आली. सीबीआयने सचिन अंदुरे यानेच दाभोलकर यांच्यावर गोळ्या झाडल्याचा दावा केला आहे. त्यामुळे पाच वर्षांपूर्वी झालेल्या हत्येचा उलगडा झाल्याचे सध्याचे चित्र दिसत आहे. अंदुरे याला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला २६ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी दिली. खरे तर सीबीयाने सचिन अंदुरेला चार दिवसांपूर्वीच अर्थात १४ ऑगस्ट रोजी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते, काल त्याला अटक करण्यात आली.

- Advertisement -

 

कोण आहे सचिन अणदुरे? सचिन अंदुरे हा मुळचा औरंगाबादचा आहे. तो पुणे येथे नोकरीनिमित्त राहत होता. त्याच्यासोबत त्याची पत्नी आणि तीन महिन्यांची मुलगी आहे. तो राहत असलेले घर भाड्याचे आहे. ११ महिन्यांच्या भाडेकरारानुसार तो राहतो. कपड्याच्या दुकानात अकाऊंटंट म्हणून तो काम करतो. त्याला आई-वडील नाहीत. एक मोठा भाऊ आहे. त्याचे लग्न झाले आहे. त्याला दोन मुले आहेत. सध्या सचिन कोणत्याही संघटनेशी संबंधित असल्याची माहिती पोलिसांना मिळाली नाही, मात्र त्याच्यावर हिंदुत्ववादी विचारांचा प्रभाव असल्याची प्राथमिक माहिती आहे.

- Advertisement -

काय झाले कोर्टात?
अंदुरे याला रविवारी दुपारी विशेष न्यायाधीश अर्चना मुजुमदार यांच्यासमोर हजर करण्यात आले. सीबीआयच्या वकिलांनी अंदुरे याला १४ दिवसांची पोलीस कोठडीची मागणी कोर्टाकडे केली. त्याला आरोपीच्या वकिलांनी विरोध केला. सीबीआयच्या वकिलांनी युक्तीवाद केला की,आरोपीने बंदूक चालवण्याचे प्रशिक्षण कुठे घेतले आहे, शस्त्र कुठे ठेवले आहे,अशा विविध गोष्टींचा तपास करण्यासाठी पोलीस कोठडीची आवश्यकता आहे. हा युक्तीवाद मान्य करून कोर्टाने अणदुरे याला पोलीस कोठडी सुनावली. आरोपी सचिन अंदुरे याचे वकील प्रकरा सालसिगीकर यांनी माहिती दिली की, ‘सीबीआयचे म्हणणे होते की आरोपीने बंदूक चालवण्याचे प्रशिक्षण कुठे घेतले आहे, शस्त्र कुठे ठेवले आहे अशा विविध गोष्टींचा तपास करण्यासाठी पोलीस कोठडीची आवश्यकता आहे. पण या प्रकरणी सीबीआयने वीरेंद्र तावडेवरील आरोपपत्र यापूर्वीच दाखल केले आहेत. त्यानुसार, गोळ्या झाडणारे सारंग अकोलकर आणि विनय पवार होते आणि ते फरार आहेत. त्यांच्या छायाचित्रांची ५-६ लोकांनी ओळखही पटवली होती. मग ही नवी थिअरी कुठून आली, असा युक्तीवाद आम्ही केला. तो कोर्टाने मान्य केला आणि केवळ ७ दिवसांची कोठडी सुनावली.’

काय घडले होते २० ऑगस्ट २०१३ रोजी
२० ऑगस्ट २०१३ रोजी नरेंद्र दाभोलकर सकाळी ७ वाजून २० मिनिटांनी मॉर्निंग वॉकला निघाले होते. त्यावेळी शनिवार पेठेत बालंगधर्व रंगमंदिराकडून ओंकारेश्वर मंदिराकडे जाणार्‍या पुलावर त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. बाईकवरून आलेल्या दोन तरूणांनी दाभोलकर यांच्यावर गोळ्या झाडून पलायन केले होते. त्यातच डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा मृत्यू झाला होता.

आजवर झालेली अटकया प्रकरणाच्या तपासात आधीपासून अनेकवेळा गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. दाभोलकर हत्या प्रकरणी विशेष तपास पथकाने सनातनचा साधक डॉ. वीरेंद्र तावडे याला अटक केली होती. त्यावेळी तपास यंत्रणांनी तावडे याने मारेकर्‍यांना पिस्तुले मिळवून दिली, विनय पवार आणि सारंग अकोलकर यांनी त्या पिस्तुलाने गोळ्या झाडल्याचे तपास यंत्रणांनी सांगितले होते. सध्या पवार आणि अकोलकर फरार असून तावडे जामिनावर बाहेर आहे. त्याआधी नागोरी टोळीच्या दोन गुंडांना पकडण्यात आले होते. त्यांनी गावठी पिस्तुलाने दाभोलकर यांचा सुपारी घेऊन हत्या केल्याचे तपास यंत्रणांनी म्हटले होते, मात्र त्यातही तथ्य निघाले नाही. दरम्यानच्या काळात तपास पथकाने समीर गायकवाड या सनातनच्या साधकाला अटक केली होती. त्याने पानसरे यांच्यावर गोळ्या झाडल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. त्यालाही तावडे याने बंदूक पुरवल्याचा आरोप करण्यात आला होता. सध्या समीर गायकवाड हादेखील जामिनावर बाहेर आहे. दाभोलकर आणि पानसरे यांच्या हत्या झाल्याच्या स्थळी जमा करण्यात आलेल्या बंदुकीच्या गोळ्यांच्या पुंगळ्या फॉरेन सिक लॅबला पाठवण्यात आल्या होत्या. आता सीबीआयने सचिन अंदुरे याला अटक केली असून या वेळी सीबीआयने अंदुरे हा मागील आठवड्यात अटक करण्यात आलेला शरद कळसकर याचा मित्र असल्याचे सांगितले आहे. कळसकर याला वैभव राऊत आणि सुधन्वा गोंधळेकर या दोघांसोबत बाँब बनवण्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. तसेच यांच्यावर तपास यंत्रणांचा पानसरे, कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांच्या हत्येचाही संशय ठेवण्यात आला आहे. त्यामुळे आता तपास यंत्रणा या अटक सत्रातून काय सिद्ध करणार हे लवकरच समोर येणार आहे.

अंदुरेला अटक का झाली?
नालासोपारा स्फोटक प्रकरणात अटकेत असलेल्या शरद कळसकर याने दिलेल्या माहितीच्या आधारे सचिनला अटक करण्यात आली आहे. ९ ऑगस्ट रोजी ( गुरूवारी ) एटीएसने नालासोपार्‍यातील वैभव राऊतच्या घरातून स्फोटके जप्त केली होती. त्याच प्रकरणात अटक करण्यात आलेल्या शरद कळसकरने दिलेल्या माहितीवरून डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येसंदर्भातील माहिती समोर आली. जवळपास १० दिवस चौकशी केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेला सचिन अंदुरे हा नालासोपारा स्फोटके प्रकरणात अटक करण्यात आलेल्या शरद कळसकरचा मित्र आहे. दरम्यान दोघेही औरंगाबादचे रहिवासी आहेत. दरम्यान, सचिन अंदुरेला अटक करण्यात आल्यानंतर आता एम. एम. कलबुर्गी आणि गोविंद पानसरे यांच्या मारेकर्‍यांनादेखील अटक होण्याची शक्यता आहे. शिवाय, सचिन अंदुरेच्या अटकेने अनेक गोष्टींचा उलगडा होण्याची दाट शक्यता आहे. विचारवंत एम.एम. कुलबर्गी आणि गोविंद पानसरे यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. शिवाय, पत्रकार गौरी लंकेश हत्या प्रकरणात अटक केलेल्या आरोपींचा काही संबंध आहे का? या दृष्टीने आता चौकशी केली जाणार आहे.

सूत्रधारापर्यंत पोहोचा – डॉ. हमीद दाभोलकर
पाच वर्षांनंतर दाभोलकरांचा मारेकरी पकडला आहे. या कारवाईला उशीर झाला आहे, पण ही कारवाई केली आहे यात समाधान आहे. मात्र या प्रकरणात जे अटक करण्यात आले आहेत, ते प्यादी आहेत, त्यांच्या मागे ज्यांचा मेंदू आहे. ज्या संस्था, संघटना आहेत, ज्यांनी या तरुणांमध्ये हिंसेचे विष पेरले आहे. त्यांच्यापर्यंत तपास यंत्रणांनी पोहोचणे गरजेचे आहे. खरे तरे दाभोलकर यांच्या हत्येनंतरच आम्ही पोलिसांना ही हत्या विचारांच्या आधारे केल्याचे सांगितले होते. त्याच वेळी तपास यंत्रणांनी या दृष्टीने तपास केला असता, तर पानसरे, कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांची हत्या झाली नसती, अशी प्रतिक्रिया डॉ. नरेंद दाभोलकर यांचा मुलगा डॉ. हमीद दाभोलकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.

हायकोर्टाच्या आदेशानंतर कारवाईला वेग – मेघा पानसरे
्रदाभोलकर, पानसरे हत्येप्रकरणी तपास यंत्रणांकडून हलगर्जीपणा केला जात होता, म्हणून आम्ही अखेरीस हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. सध्या या प्रकरणाचा तपास हायकोर्टाच्या नियंत्रणाखाली आहे. हायकोर्टाने निर्देश दिल्यामुळे तपासाला वेग आला आहे. लवकरच या हत्येमागील सूत्रधारापर्यंत तपास यंत्रणा पोहोचतील, अशी अपेक्षा कॉ. गोविंद पानसरे यांची मुलगी मेघा पानसरे यांनी व्यक्त केली.

तपास यंत्रणांची कारवाई संभ्रम निर्माण करणारी- अ‍ॅड. संजीव पुनाळेकर
दाभोलकर आणि पानसरे कुटुंबीय पुरोगामी संघटनांच्या माध्यमातून सामाजिक स्तरावरून सरकार व तपास यंत्रणांवर दबाव आणत आहेत. तसेच हायकोर्टाची दिशाभूल करणारी माहिती देत आहेत. त्यामुळे दाभोलकर आणि पानसरे प्रकरणी ज्या ज्या लोकांना अटक करण्यात आली, त्या त्या वेळी नवीन कहाण्या रचण्यात येत होत्या. या प्रकरणात ज्यांना ज्यांना अटक करण्यात आली, त्यांची जामीनावर सुटका झालेली आहे. आता सचिन अंदुरे या तरुणाला अटक करण्यात आली आहे. ही कृती दाभोलकर-पानसरे कुटुंबियांच्या दबावावरून होत आहे, असे सनातन संस्थेचे वकील अ‍ॅड. संजीव पुनाळेकर यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -