घरमुंबईमुंबईतील झाडांच्या छाटणीची कंत्राटे सिव्हील कंत्राटदारांनाच

मुंबईतील झाडांच्या छाटणीची कंत्राटे सिव्हील कंत्राटदारांनाच

Subscribe

दोन वर्षांसाठी ९१ कोटी रुपये करणार खर्च

पावसाळ्यात वादळीवार्‍यामुळे धोकादायक झाडे उन्मळून पडणे तसेच त्यांच्या फांद्या तुटून पडण्याचे प्रकार घडत असल्यामुळे त्यांच्या छाटणीसाठी महापालिकेने विभाग स्तरावर कंत्राटदारांची नेमणूक केली आहे. मात्र शास्त्रोक्तपणे झाडांच्या फांद्यांच्या छाटणीला विरोध करत प्रस्तापित कंत्राटदारांनी ही कामे स्वत:च्या झोळीत टाकून घेतली आहे. दोन वर्षांकरता अंदाजित केलेल्या ११५ कोटी रुपयांच्या तुलनेत कंत्राटदारांनी ३३ टक्के कमीपर्यंत बोली लावून दोन वर्षांकरता सुमारे ९१ कोटी रुपयांची कामे मिळवलेली आहेत. परंतु या कामांची कंत्राटे वाहन पुरवणार्‍या कंत्राटदारांसोबतच महापालिकेच्या विविध पायाभूत सेवासुविधांची कामे करणार्‍या कंत्राटदारांनी मिळवलेली असल्याने पुन्हा एकदा शास्त्रोक्तपणे झाडांच्या छाटणीला बगल देण्यात आली आहे.

मुंबईतील मृत झाडे आणि झाडांच्या धोकादायक फांद्या तोडण्याचे काम पावसाळ्यापूर्वी केले जाते. यासाठी महापालिकेच्यावतीने विभाग स्तरावर कंत्राटदारांची नेमणूक करण्यासाठी निविदा मागवण्यात आली होती. प्रत्येक विभाग कार्यालयांसाठी ५ कोटी रुपयांचा अंदाजित खर्च गृहीत धरून सुमारे ११७ ते १२० कोटी रुपयांसाठी मागवण्यात आलेल्या निविदेमध्ये कंत्राटदारांना वृक्षसंगोपन तज्ज्ञ अर्थात आरबोरिस्टच्या मार्गदर्शनाखाली छाटणी करणे बंधनकारक केले होते. याशिवाय मॅक लिफ्टसह अत्याधुनिक उपकरणांसह आणि कामगारांच्या सुरक्षिततेची उपाययोजना करण्याच्या अटींचाही समावेश त्यात करण्यात आला होता. परंतु या अटींमुळे प्रस्थापित कंत्राटदारांना कामे मिळणे कठीण होते. त्यामुळे शिवसेना आमदार सुनील प्रभू यांना हाताशी धरून ही अट शिथिल करण्यास भाग पाडली. त्यानुसार तत्कालीन आयुक्त अजोय मेहता यांनी अट शिथिल करून फेरनिविदा मागवण्याचे आदेश दिले. त्यानुसार प्रशासनाने फेरनिविदा मागवली.

- Advertisement -

या फेरनिविदांमध्ये खांडेश्वर टोविंग, एस.पोळ एंटरप्रायझेस, पॉप्युलर टान्सपोर्ट सर्व्हिससेस या वाहनांचा पुरवठा करणार्‍या कंपन्यांनी झाडांच्या फांद्या छाटणीचे कंत्राट मिळवले आहे. तर कमला कन्स्ट्रक्शन, अ‍ॅक्यूट डिझाईन्स, सी.एन. लधानी एंटरप्रायझेस, कनक कन्स्ट्रक्शन, मानसी कन्स्ट्रक्शन, पार्श्व कॉर्पोरेशन, एस.बी. ब्रदर्स,निखिल कन्स्ट्रक्शन कंपनी आदी सिव्हील वर्क करणार्‍या अर्थात महापालिकेच्या सेवा सुविधांची कामे करणार्‍या कंत्राटदारांनी कामे मिळवली आहे. या कामांचा प्रस्ताव वृक्ष प्राधिकरणापुढे मंजुरीसाठी सादर करण्यात आला असून अद्यापही या कामांना मंजुरी नसल्याने जुन्या कंत्राटदारांना मुदतवाढ देवून सध्या त्यांच्याकडून छाटणीचे काम केले जात आहे.

मुंबईत मागील पावसाळ्यात एकूण १०७७ झाडे उन्मळून तसेच फांद्या तुटून पडण्याचे प्रकार घडले होते. त्यामध्ये ७ जण मृत्यूमुखी, तर २१ जण जखमी झाले होते. त्यामुळे वृक्ष तज्ज्ञांची नेमणूक करून अत्याधुनिक पध्दतीने शास्त्रोक्तपणे छाटणी केली जावी,अशी मागणी सर्व नगरसेवक, पर्यावरण प्रेमींकडून केली जात होत होती. त्यातच न्यायालयानेही तशाप्रकारचे निर्देश दिले होते. परंतु महापालिकेतील काही कंत्राटदारांना ही कामे मिळावी यासाठी शास्त्रोक्तपणे झाडांची छाटणी करण्याकडे दुर्लक्ष करण्यात आला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -