घरमुंबईनगरसेवकांना मिळणार नव्या धुम्र फवारणी मशिन

नगरसेवकांना मिळणार नव्या धुम्र फवारणी मशिन

Subscribe

मुंबईत निर्माण डासांचा उपद्रव टाळण्यासाठी महापालिकेच्यावतीने धुम्र फवारणी केली जाते. या धुम्र फवारणीसाठी प्रत्येक नगरसेवकांच्या प्रभागात एक धुम्र फवारणी मशिन उपलब्ध करून दिली असली तरी या मशिन्स आता जुन्या झाल्याने नव्याने खरेदी करण्यात येत आहे. त्यामुळे तब्बल ११ वर्षांनी या मशिन्स बदलल्या जाणार आहेत. आता नव्या कोर्‍या मशिन्सच्या माध्यमातून नगरसेवकांना प्रभागातील डासांविरोधातील कारवाई तीव्र करता येईल.

मुंबई महापालिकेचे तत्कालिन स्थायी समिती अध्यक्ष रविंद्र वायकर यांनी २२४ नगरसेवकांसाठी प्रत्येक प्रभागात धुम्र फवारणी मशिनची खरेदी करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या संकल्पनेतून हा निर्णय घेत स्थायी समितीच्या मान्यतेने २००८ मध्ये २२४ मशिन्सची खरेदी करण्यात आली होती. त्यानंतर वेळोवेळी डागडुजी आणि दुरुस्ती करत या मशिन्सचा वापर करण्यात येत असून आता या मशिन्स वापरण्यापलिकडे गेल्या आहेत. त्यामुळे महापालिकेने प्रत्येक नगरसेवकांच्या प्रभागात प्रत्येकी एक याप्रमाणे २२४ धुम्र फवारणी मशिन्स खरेदी करण्यात येणार आहे. महापालिकेच्या किटक नाशक विभागासाठी पल्स जेट टाईप थर्मल धुम्रफवारणी यंत्राचा पुरवठा, तसेच सर्वसामावेशक देखभालीच्या करारासह खरेदी करण्यासाठी ५.७० कोटी रुपये खर्च केले जाणार आहे. या २२४ मशिन्सच्या खरेदीसाठी ३.७५ कोटी रुपये तर देखभालीसाठी २ कोटी अशाप्रकारे एकूण ५.७० कोटींच्या कंत्राट कामांसाठी नेपच्युन पॅकेजिंग प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची निवड करण्यात आली आहे. या मशिन्सच्या खरेदीनंतर १ वर्षांचा हमी कालावधी तसेच पुढील ४ वर्षांची सर्वसामावेशक देखभाल आदींचा समावेश कंत्राट आहे.

- Advertisement -

मुंबईतील अनेक भागांमध्ये सकाळच्या वेळेत धुम्र फवारणी केली जाते. या धुम्र फवारणीमुळे डासांचा प्रार्दुभाव कमी होतो. डिझेलमध्ये औषध मिसळून या यंत्राद्वारे धूर फवारणी केली जाते. मागील अनेक महिन्यांपासून धूर फवारणी मशिन्स बंद पडत असल्या तक्रारी नगरसेवकांकडून प्राप्त होत होत्या. मात्र, आजवर दोन वेळा निविदा मागवल्यानंतरही याला प्रतिसाद न मिळाल्याने या मशिन्सच्या खरेदीला विलंब झाला होता. परंतु आता निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्याने लवकरच या मशिन्सचा वापर नगरसेवकांना आपल्या प्रभागात करता येणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -