घरमुंबईघटकपक्षांना हव्यात ५० हून अधिक जागा

घटकपक्षांना हव्यात ५० हून अधिक जागा

Subscribe

आघाडीला लवकरच यादी देणार

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना आणि भाजप यांच्यात महायुती होणार की नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलेले असतानाच काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या महाआघाडीत जागा वाटपावरुन वादावादी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. एकीकडे आघाडीच्या घटकपक्षांना ३८ जागा सोडण्याच्या तयारीत असलेल्या महाआघाडीला आता लवकरच घटक पक्षांना ५० ते ६० जागा द्यावा लागणार असल्याचे वृत्त समोर आले आहे. तशा प्रकारची मागणी देखील घटक पक्षांकडून करण्यात आली असून गुरुवारी मुंबईत झालेल्या बैठकीत ही मागणी करण्यात आली असल्याची माहिती हाती आली आहे. त्यामुळे जागा वाटपावरुन येत्या काळात चर्चेचा विषय ठरणार असल्याचे कळते.

लोकसभा निवडणुकीत दारुण पराभव स्वीकारावा लागल्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादीने निवडणुकीसाठी आपली जोरदार तयारी सुरु केली आहे. काँग्रेसकडून लवकरच ४० जणांची पहिली यादी जाहीर करण्याचे सूतोवाच देखील देण्यात आले होते. आता मात्र लवकरच जागा वाटपांची बेरीज वजाबाकी बदलण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. गुरुवारी महाआघाडीच्या सर्व घटक पक्षांची बैठक मुंबईत आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत घटक पक्षांना देण्यात आलेल्या ३८ जागांचा प्रस्ताव फेटाळून लावण्यात आला असून नवीन प्रस्ताव घटक पक्षांकडून देण्यात आला असून याची जबाबदारी घटक पक्षांनी राजू शेट्टी यांच्याकडे सोपविली होती.

- Advertisement -

याबाबत राजू शेट्टी म्हणाले की, सर्व छोट्या पक्षांची बैठक झाली. उद्या याबाबत आम्ही एकत्रित यादी तयार करणार आहोत. स्वाभिमानी, शेकाप, लोकभारती, बहुजन विकास आघाडी, डावे पक्ष, बसपा, सपा अशा विविध पक्षांकडून विधानसभा मतदारसंघाच्या नावासह एकत्रित यादी पाठविण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी जाहीर केले. तर स्वत: निवडणूक लढविणार का याबाबत शेट्टी यांच्याकडे विचारणा केली असता ते म्हणाले की मी विधानसभा लढवावी अशी घटकपक्षातील विविध नेत्यांची भूमिका आहे. मात्र, यावर मी अद्याप निर्णय घेतलेला नाही. परंतु, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूरच्या ग्रामीण भागातून इतरांच्या मतदारसंघात घुसखोरी केल्यास त्यांच्याविरोधात नक्की निवडणूक लढवेन, असे ते म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -