घरमुंबईआमदार जिग्नेश मेवाणीला वसईत येण्यास मज्जाव करा

आमदार जिग्नेश मेवाणीला वसईत येण्यास मज्जाव करा

Subscribe

विराट हिंदुस्तान संगमची मागणी

जातीयवादी, देशद्रोही वक्तव्य करणार्‍या आमदार जिग्नेश मेवाणी यांना वसईत भाषण करण्यास बंदी घालण्याची मागणी विराट हिंदुस्तान संगम संस्थेने वसईच्या माणिकपूर पोलिसांकडे केली आहे. एमएमआरडीए आराखडा, बुलेट ट्रेन, सागरी महामार्ग, मुंबई-वडोदरा एक्स्प्रेसवे, वाढवण बंदर समुद्र किनारे व्यवस्थापन यांना विरोध करण्यासाठी वसईतून पर्यावरण संवर्धन समितीद्वारे आंदोलन करण्यात येत आहे. या समितीचे समन्वयक समीर वर्तक यांच्या पुढाकाराने या आंदोलनात भूमीसेनेचे अध्यक्ष काळुराम धोदडे, फादर दिब्रिटो, ज्येष्ठ नगररचनाकार चंद्रशेखर प्रभू सहभागी झाले आहेत. हे आंदोलन अधिक तीव्र करण्यासाठी २८ डिसेंबरला वसईत सायंकाळी ४ वाजता पर्यावरण संवर्धन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात प्रमुख वक्ते म्हणून आमदार जिग्नेश मेवाणी यांना निमंत्रित करण्यात आले आहे.

मेवाणी यांना या कार्यक्रमात भाषण करण्यास देऊ नये, अशी मागणी विराट हिंदुस्तान संगम या संस्थेने माणिकपूर पोलीस ठाण्यात केली आहे. पर्यावरण संवर्धनाचा आणि आमदार मेवाणीचा काहीही संबंध नाही. जातीयवादी वक्तव्य करणे तसेच देशद्रोही गरळ ओकण्याकडे त्यांचा कल असतो, असा आरोप त्यांनी केला आहे. त्यांच्या या कृत्यामुळे त्यांना राजस्थानात विरोध करण्यात आला होता. तसेच पुण्यात पोलीस ठाण्यात एफआयआर नोंदवण्यात आला होता. वसईतही ते जातीयवादी वक्तव्य करून जातीय तेढ निर्माण करतील. त्यामुळे त्यांना पर्यावरण मेळाव्यात बोलण्यास मज्जाव करण्यात यावा, अशी तक्रार आम्ही केली आहे. जागरुक नागरिकांनीही पोलीस ठाण्यात तशा तक्रारी नोंदवाव्यात, असे आवाहन विराट हिंदुस्तानचे उत्तर मुंबई अध्यक्ष राजीव हरसोरा यांनी केले आहे.

- Advertisement -

पर्यावरण संवर्धनासाठी आमचे आंदोलन सुरू आहे. त्यात सर्वधर्मीय, पक्षीय लोक सहभागी झाले आहेत. आमदार मेवाणीही आम्हाला या आंदोलनात मदत करत असून मेळावा हा पर्यावरण संवर्धनासंबंधीचा आहे. मेवाणी हे त्याच संदर्भात बोलणार आहेत. त्यामुळे कुणाची काही हरकत असण्याचे कारण नाही. पोलिसांकडून विचारणा झाली तेव्हाही आमची हिच भूमिका होती, असे स्पष्टीकरण समीर वर्तक यांनी दिले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -