घरमुंबईअतीवृष्टीमुळे वाड्यातील शेतकरी हवालदिल

अतीवृष्टीमुळे वाड्यातील शेतकरी हवालदिल

Subscribe

भातशेती पाण्याने भरलेली

जिल्ह्यात आठवडाभर पावसाच्या सुरू असलेल्या संततधारेमुळे सर्वत्र पूरपरिस्थिती निर्माण झाली असून नद्या, नाले दुथडी भरून वाहू लागले आहेत. पावसाचा जोर कायम असल्याने भातशेती पाण्याखाली गेली आहे. त्यामुळे मोठे नुकसान होण्याच्या भितीने शेतकरी चिंतेत आहेत.

गेल्या आठवडाभर पावसाने जिल्ह्याला चांगलेच झोडपून काढले आहे. मुसळधार कोसळलेल्या पावसामुळे अनेक तालुक्यातील गाव पाड्यावर पूर परिस्थिती आहे. येथील शेतकर्‍यांना पावसाचा चांगलाच फटका बसला आहे. सतत कोसळत असलेल्या संततधारेमुळे भात लावणी करण्यात आलेली शेते पूर्णपणे पाण्याने तूडूंब भरली आहेत. त्यामुळे भातशेतीला पुराचा फटका बसला आहे.

- Advertisement -

काही प्रमाणात भातलावणीची कामे झाली असून काही ठिकाणी अंतिम टप्प्यात आहेत. भात लावणी झालेली शेते पाण्याने पूर्णपणे भरली आहेत. तर काही शेतकर्‍यांच्या शेतातील पाणी कमी होत नसल्याने लावणीचा खोळंबा होत आहे. त्यामुळे लावणीच्या कामासाठी आणलेल्या शेतमजुरांना काम न करताच सकाळी नास्ता, दुपारचे जेवण व रात्रीच्या जेवणाचा खर्च शेतकर्‍यांना करावा लागत आहे. त्यामुळे शेती व्यवसाय जास्त कष्टाचा आणि खर्चिक होऊ लागला आहे.

प्रशासनाने भातशेतीच्या पूर परिस्थितीची पाहणी करून कुजलेल्या भातशेतीचे तत्काळ पंचनामे करून शेतकर्‍यांना आर्थिक मदत देण्याची गरज आहे.
-सतिश पष्टे, आदर्श शेतकरी,निचोळे (वाडा)

- Advertisement -

सद्या वाडा तालुक्यात पूर परिस्थितीमुळे भात पिकांच्या नुकसानाची पाहणी करता येत नाही. शिवाय नुकसानी संदर्भात आमच्याकडे शेतकर्‍यांच्या लेखी किंवा तोंडी तक्रारी आलेल्या नाहीत. जेव्हा पाणी ओसरेल तेव्हाच भातपिकाची परिस्थिती कळू शकेल.
– माधव हासे, वाडा तालुका कृषी अधिकारी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -