घरमुंबईमाजी उपमहापौराला पोलीस कोठडी

माजी उपमहापौराला पोलीस कोठडी

Subscribe

राष्ट्रवादी जिल्हाध्यक्षाच्या हत्येच्या कट

राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष खालिद गुड्डू यांच्या हत्येच्या कटात सामील असलेल्या काँग्रेसचे माजी उपमहापौर तथा विद्यमान नगरसेवक अहमद हुसेन मंगरू हुसेन सिद्दीकी यांचा मुंबई हायकोर्टाने जामीन अर्ज फेटाळल्याने शहर पोलिसांनी त्यांना बुधवारी राहत्या घरातून अटक करून दुपारी कोर्टात हजर केले. कोर्टाने त्यांना सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यामुळे शहरातील काँग्रेस वर्तुळात एकच खळबळ माजली आहे.

शहरातील समदनगर भागात 20 जूनच्या रात्री दोन संशयीत फिरत असल्याची खबर नागरिकांनी शहर पोलीस ठाण्यात दिली. पोलिसांनी मो.साजीद निसार अंसारी व मो.दानिश मो.फारूक अंसारी या दोन शार्प शूटर्सना ताब्यात घेऊन त्यांची अंगझडती घेतली. त्यांच्याकडे मेड इन यूएसएचे उच्च प्रतीची दोन विदेशी पिस्तूले व 15 जिवंत काडतुसे सापडली होती. त्याबाबत शहर पोलिसांनी त्यांची कसून चौकशी केली असता 28 जून 2018 रोजी त्यांनी मो.अलीम निजामुद्दीन सिद्दीकी उर्फ अलीम बक्कन सरदार याने समदनगर येथील राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष खालीद गुड्डू यांना मारण्यासाठी 2 लाख रुपयांची सुपारी दिल्याचे कबूल केले. त्यावरून पोलिसांनी अलीम बक्कन सरदार यांना व माजी महापौर अहमद हुसेन यांचा भाऊ मो. अश्फाक मंगरू सिद्दकी या दोघांना अटक केली.

- Advertisement -

पुढील तपासात या कटात सहभागी असलेले काँग्रेसचे माजी उपमहापौर तथा नगरसेवक अहमद सिद्दीकी याने अटक टाळण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात जामीनासाठी अर्ज केला होता. मात्र, त्यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला. अहमद सिद्दीकी हे तेव्हापासून फरार झाले होते.

समदनगर येथे राहणारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष खालीद गुड्डू यांनी पोलीस आरोपीला अटक करण्यासाठी हयगय करीत असल्याचा आरोप करीत ठाणे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्याकडे तक्रार केली होती. त्यामुळे शहर पोलिसांनी सखोल तपास करून अखेर बुधवारी सकाळी त्यांना अटक करून न्यायालयात हजर केले. न्यायालयाने हत्येच्या कटातील गांभीर्य लक्षात घेऊन 20 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. यावेळी न्यायालयात काँग्रेसचे नगरसेवक व कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केल्याने वातावरण तणावपूर्ण झाले होते. मात्र, पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवल्याने कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही. या गुन्ह्याचा अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष कोकाटे करीत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -