घरमुंबईफेसबकच्या मैत्रीतून दोन लाखांना लुबाडले

फेसबकच्या मैत्रीतून दोन लाखांना लुबाडले

Subscribe

अशाच प्रकारची घटना घडल्याचे वृत्तपत्रात वाचल्यानंतर तरुणाने तीन महिन्यां नंतर पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

फेसबूकच्या माध्यमातून ओळख झालेल्या एका तरुणीने सुमारे दोन लाख रुपये किंमतीच्या सोन्याच्या दोन चैन लुटून नेल्याची घटना कल्याण परिसरात घडली आहे. याप्रकरणी दर्शना पाटील नामक तरुणी विरोधात महात्मा फुले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र अशाच गुन्हयात दर्शना हिला ठाणे पोलिसांनी अटक केल्याचे वर्तमानपत्रात वृत्त वाचल्यानंतर त्या तरूणाने तीन महिन्यानंतर पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

फेसबुक मैत्री महागात 

डोंबिवलीतील सोनरपाडा परिसरात राहणारा चेतन म्हात्रे या तरूणाला दर्शना पाटील नामक तरूणीने काही महिन्यांपूर्वी फेसबूक अकांऊटवरून फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली होती. त्यानंतर दोघांची ओळख झाली. दोघेही फेसबूक मेसेंजरवरुन चॅटींग करू लागले. ओळखीतून मैत्रीत रूपांतर झाले. १७ जानेवारीला संध्याकाळी सहा वाजता दर्शना हिने चेतनला फोन करुन तिचा वाढदिवस असल्याने कल्याणातील काळा तलाव येथे रात्री आठ वाजता भेटायला बोलावले. तसेच फेसबूकमध्ये सोन्याची चैन असलेला जूना फोटो आहे ती चैन घालून येण्याची गळ तिने घातली.

- Advertisement -

तीन महिन्यांनी तक्रार

यावेळी चेतनने स्वत:ची अडीच तोळयाची आणि मित्राकडील साडेसात तोळयाची एक चैन अशी सुमारे दोन लाख किंमतीच्या दोन सोन्याच्या चैन घालून कल्याणला तिला भेटण्यासाठी गेला. दोघेही गप्पा मारीत असतानाच, दर्शना हिने चेतनच्या गळयातील सोन्याची चैन घालण्यास मागितली. यावेळी चेतनने दोन्ही चैन तिच्या गळयात घालण्यास दिल्या. माझी मैत्रिण आली आहे. तिला दाखवून येते असे सांगून ती तलावाच्या गेटकडे चालत निघाली. याचवेळी चेतनही तिच्या मागे चालत गेला. इतक्यात गेटजवळ एक मोटारसायकल स्वार वाट पाहत उभा होता. दर्शना हि त्याच्या मागील सीटवर बसून पसार झाली. चेतनने त्यांच्या पाठलाग केला, मात्र ते पळून गेले होते. ठाण्यातील कासारवडवली पोलीसांनी अशाच प्रकारच्या गुन्हयात दर्शना पाटील हिला अटक केल्याचे वृत्त वाचनात आल्यानंतर चेतनने कासारवडवली पोलीस ठाण्यात धाव घेऊन खात्री केली. त्यानंतर महात्मा फुले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -