घरमुंबईपालिका शाळांमधील गाईड्स पथकाचा प्रजासत्ताक दिन पथसंचलनात दुसरा क्रमांक

पालिका शाळांमधील गाईड्स पथकाचा प्रजासत्ताक दिन पथसंचलनात दुसरा क्रमांक

Subscribe

छत्रपती शिवाजी महाराज मैदानात (शिवाजी पार्क) पार पडलेल्या सोहळ्यातील पथसंचालनात मुंबई महापालिकेच्या शाळांमधील स्काऊट व गाईड यांच्या पथकांपैकी मुलींच्या पथकाला अर्थात गाईडच्या पथकाला सर्वोत्कृष्ट पथसंचलनाचा द्वितीय क्रमांक प्राप्त झाला आहे.

मुंबई : २६ जानेवारी २०२३ प्रजासत्ताक दिनानिमित्त राज्यपाल व मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानात (शिवाजी पार्क) पार पडलेल्या सोहळ्यातील पथसंचालनात मुंबई महापालिकेच्या शाळांमधील स्काऊट व गाईड यांच्या पथकांपैकी मुलींच्या पथकाला अर्थात गाईडच्या पथकाला सर्वोत्कृष्ट पथसंचलनाचा द्वितीय क्रमांक प्राप्त झाला आहे. पालिका शाळेतील विद्यार्थीनींच्या या उत्कृष्ट कामगिरीची दखल घेऊन पालिका आयुक्त इकबाल चहल, अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) आश्विनी भिडे आणि सहआयुक्त अजित कुंभार यांनी अभिनंदन करीत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

२९ एप्रिल रोजी दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदान (शिवाजी पार्क) येथे होणाऱ्या कार्यक्रमात अपर पोलीस महासंचालक (प्रशासन) यांच्या हस्ते मुंबई महापालिका शाळांमधील गाईड्स (विद्यार्थीनी) पथकाला चषक देऊन सन्मानित करण्यात येणार आहे, अशी माहिती मुंबई महापालिकेचे शिक्षण अधिकारी राजेश कंकाळ यांनी दिली आहे.

- Advertisement -

मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये शालेय अभ्यासक्रमासोबतच विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासाकडे देखील आवर्जून लक्ष देण्यासह या दृष्टीने विविध कार्यक्रमांचे व उपक्रमांचे आयोजन देखील नियमितपणे करण्यात येत असते. याच उपक्रमांचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे ‘भारत स्काऊट आणि गाईड्स’ उपक्रम ! या उपक्रमात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना स्काऊट असे संबोधले जाते, तर विद्यार्थिनींना गाईड्स असे संबोधण्यात येते. जे विद्यार्थी व विद्यार्थिनी उपक्रमात सहभागी होतात, त्यांना शिस्त, सामाजिक जाणीव, सार्वजनिक सेवा याबाबत विविध स्तरीय प्रशिक्षण देण्यात येते. नियमित कवायत व पथसंचलन देखील या अंतर्गत आयोजित करण्यात येत असते.

हेही वाचा – ब्रिटनच्या उपपंतप्रधानांनी दिला राजीनामा, ऋषी सुनक यांच्या मित्राला का सोडावे लागले पद?

- Advertisement -

मुंबई महापालिकेच्या शाळांमधील स्काऊट्स व गाईडच्या पथकाचा समावेश हा २६ जानेवारी २०२३ रोजी आयोजित पथसंचलनात करण्यात आला होता. या पथसंचलन समारंभात मुंबई महापालिकेच्या शाळांमधील ‘भारत स्काऊट आणि गाईड’ यांनी सहभाग घेतला होता. या संचलन समारंभात उत्कृष्ट संचलन करणाऱ्या पथकांची सर्वोत्कृष्ट पथक म्हणून निवड केली जाते. यात भारत स्काऊट आणि गाईड (मुली) या पथकाची निवड झाली असून त्यांना द्वितीय क्रमांक प्राप्त झाला आहे.

महापालिकेच्या शाळांमधील स्काऊट व गाईड पथकाच्या क्षेत्र संघटक अलका पवार यांनी कळविले आहे की, मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये स्काऊट व गाईड मिळून एकूण २५ हजार ८५७ विद्यार्थी आहेत. यापैकी १३ हजार २४५ गाईड्स (मुली) असून १२ हजार ६१२ (स्काऊट) आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -