घरमुंबईजे. जे. हॉस्पिटलमध्ये हेड अँड नेक कॅन्सरची ओपीडी सुरू

जे. जे. हॉस्पिटलमध्ये हेड अँड नेक कॅन्सरची ओपीडी सुरू

Subscribe

आर्थिकदृष्ट्या कमकुवत असणाऱ्या कॅन्सर रुग्णांना मोफत किंवा सवलतीच्या दरात उपचार मिळणं आता शक्य होणार आहे.

सध्या देशात कॅन्सरच्या रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. खासगी हॉस्पिटलमध्ये अनेकदा गरीब रुग्णांना कॅन्सरचे उपचार परवडत नाहीत. त्यामुळे, आता जे.जे या सरकारी हॉस्पिटलमध्ये कॅन्सरचे उपचार केले जाणार आहेत. हेड अँड नेक कॅन्सरवर उपचार करण्यासाठी राज्य सरकार आणि टाटा हॉस्पिटलमध्ये सामंजस्य करार झाला आहे. करारानुसार, जे. जे. हॉस्पिटलमध्ये स्वतंत्र हेड अँड नेक कॅन्सर ओपीडी बुधवारपासून सुरू करण्यात आली आहे. या कराराअंतर्गत टाटा हॉस्पिटलमधील डॉक्टर जे. जे. मध्ये येऊन कॅन्सर रुग्णांवर उपचार करत आहेत.

पहिल्याच दिवशी १२ रुग्णांची तपासणी

आर्थिकदृष्ट्या कमकुवत असणाऱ्या कॅन्सर रुग्णांना मोफत किंवा सवलतीच्या दरात उपचार मिळणे आता शक्य होणार आहे. ओपीडी सुरू झाल्याच्या पहिल्याच दिवशी १२ रुग्णांची तपासणी करण्यात आली. याविषयी अधिक माहिती देताना जे. जे. हॉस्पिटलमधील कान-नाक-घसा विभागाचे प्रमुख डॉ. श्रीनिवास चव्हाण यांनी सांगितले की, ‘‘ हेड अँण्ड नेक कॅन्सरग्रस्तांची संख्या सध्या झपाट्याने वाढत आहे. जे.जे., जीटी आणि सेंट जॉर्ज रुग्णालयात बाह्यरुग्ण विभागात उपचारासाठी येणाऱ्या २०० रुग्णांपैकी जवळपास २० जणांना कॅन्सर असल्याचे आढळून येते.

- Advertisement -

५० हून अधिक रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया

या रुग्णांना कॅन्सर तज्ज्ञांकडे पाठवून चाचणी करून घेण्याचा सल्ला दिला जातो. चाचणी अहवालात कॅन्सर असल्याचं निदान झाल्यास या रुग्णांवर उपचार केले जातात. पण, आता ही ओपीडी सुरू झाल्यामुळे लोकांना एकाच ठिकाणी सर्व डॉक्टर्स उपलब्ध होतील. शिवाय, त्या रुग्णाला कोणत्या प्रकारचा कॅन्सर आहे, कोणत्या स्टेजचा आहे याचं प्रेझेंटेशन असेल. जेणेकरुन प्रत्येक डॉक्टरला कशाप्रकारे उपचार करायचे आहेत हे कळेल. आतापर्यंत ५० हून अधिक रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे’’

डॉक्टरांना कॅन्सरबाबत प्रशिक्षण

दर सोमवारी आणि बुधवारी टाटा रुग्णालयातील डॉक्टर जे. जे. हॉस्पिटलमध्ये येऊन रुग्णांवर उपचार करणार आहेत. असे ही डॉ. चव्हाण यांनी सांगितले. टाटा रुग्णालयातील हेड अँण्ड नेक विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. देवेंद्र चौकर यांनी सांगितले की, ‘‘हेड अँण्ड नेक ओपीडीद्वारे बुधवारी १२ रुग्णांवर उपचार करण्यात आले. या ओपीडीमध्ये येणाऱ्या रुग्णांना शस्त्रक्रियेची गरज पडल्यास ही शस्त्रक्रिया जे. जे. मध्येच केली जाईल. इतकेच नाहीतर या हॉस्पिटलमधील डॉक्टरांना कॅन्सरबाबत प्रशिक्षणही देण्यात येणार आहे.’’

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -