घरमुंबईजोगेश्वरी येथे पत्नीच्या हत्येप्रकरणी पतीला अटक

जोगेश्वरी येथे पत्नीच्या हत्येप्रकरणी पतीला अटक

Subscribe

जोगेश्वरी येथे पत्नीच्या हत्येप्रकरणी आरोपी पतीला ओशिवरा पोलिसांनी अटक केली. नदीम मुकीम खान असे या 38 वर्षीय आरोपी पतीचे नाव असून अटकेनंतर त्याला वांद्रे येथील लोकल कोर्टाने गुरुवार 29 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याच्यावर त्याचीच पत्नी आयेशा हिची डोक्यात जड वस्तू मारहाण करुन हत्या केल्याचा आरोप आहे. नदीम हा त्याची पत्नी आयेशासोबत जोगेश्वरीतील आनंदनगर, साईबाबा चाळीत राहतो. या दोघांनाही दारु पिण्याचे व्यसन आहे. शुक्रवारी रात्री साडेदहा वाजता या दोघांनी मद्यप्राशन केले होते. त्यातून त्यांच्यात घरगुती कारणावरुन भांडण झाले होते. या भांडणानंतर नदीमने आयेशाला बेदम मारहाण केली होती. त्यानंतर ती रागाच्या भरात घरातून निघून गेली होती. रात्री उशिरा ती घरी आली आणि झोपून गेली होती.

शनिवारी सकाळी सात वाजता तिला नदीमने उठविण्याचा प्रयत्न केला, मात्र तिची काहीच हालचाल नव्हती. त्यामुळे नदीमने स्थानिक रहिवाशांच्या मदतीने तिला तातडीने कूपर रुग्णालयात दाखल केले होते. तिथे तिला डॉक्टरांनी मृत घोषित केले. त्यानंतर तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला होता. ही माहिती रुग्णालयातून प्राप्त होताच ओशिवरा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी नदीमची पोलिसांनी जबानी नोंदवून घेतली होती. त्यात त्याने आयेशाला दारु पिण्याचे व्यसन होते, त्यात ती जेवत नव्हती, तिला श्वास घेण्याचा त्रास होता, त्यातून तिला हृदयविकराचा झटका आला असावा आणि तिचा मृत्यू झाला असावा अशी शंका व्यक्त केली होती. तसेच तिच्या मृत्यूबाबत त्याने कोणावरही संशय व्यक्त केला नव्हता. त्याच्या जबानीनंतर पोलिसांनी अपमृत्यूची नोंद करुन तपासाला सुरुवात केली होती. शवविच्छेदन अहवालानंतर आयेशाचा मृत्यू डोक्यात जड वस्तूने मारहाण झाल्याचे नमूद करण्यात आले होते, ही मारहाण नदीमने केल्याने त्याच्याविरुद्ध पोलीस उपनिरीक्षक आप्पासाहेब शिरसाठ यांच्या तक्रारीवरुन हत्येचा गुन्हा नोंदविण्यात आला होता. याच गुन्ह्यांत नंतर त्याला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला रविवारी दुपारी वांद्रे येथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते, यावेळी कोर्टाने त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -