घरमुंबईअलिकडच्या काळात कार्यकर्ते कामाचा हिशोबही देत नाहीत

अलिकडच्या काळात कार्यकर्ते कामाचा हिशोबही देत नाहीत

Subscribe

जगन्नाथ पाटील यांचा अमृतमहोत्सवी कार्यक्रम मुख्यमंत्र्यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी कार्यकर्त्यांना कानपिचक्या दिल्या.

”रामभाऊ म्हाळगी, रामभाऊ कापसे, वसंतराव पटवर्धन ही मंडळी व्रतस्थ जीवन जगली. खऱ्या अर्थाने त्यांनी विचारांना मोठं करण्यासाठी प्रत्येक क्षण खर्ची केला. त्यांच्याच मांदियाळीत जगन्नाथराव पाटील यांचाही समावेश होतो. पद असो वा नसो ते पक्षासाठी नेहमीच काम करीत राहिले. पक्षासोबत राहून विचारांची कास कधीच सोडली नाही. मंत्री असताना त्यांच्यावर कुठलाही डाग लागला नाही. त्यांनी पारदर्शी काम केलं,” असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज डोंबिवलीत जगन्नाथ पाटील यांच्या अमृतमहोत्सवी कार्यक्रमात काढले. ते पुढे म्हणाले की, ”जुन्या कार्यकर्त्यांमध्ये दोन महत्वाच्या गोष्टी पाहायला मिळतात. दिलेलं काम कुठल्याही परिस्थितीत पूर्ण करतात आणि आपण नेमकं काय कार्य केलं. त्याचा हिशोबही देतात. खरं तर त्यांच्याकडे कोण हिशोब मागतही नाही. पण अलिकडच्या काळात कार्यकर्ते कामाचा हिशोबही देत नाहीत,” अशा कानपिचक्याही यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी कार्यकर्त्यांना दिल्या.

पदासाठी नाही तर विचारांसाठी कार्य केले

माजी मंत्री जगन्नाथ पाटील यांच्या ७५निमित्त डोंबिवली जिमखानाच्या पटांगणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नागरी सत्कार करण्यात आला. याप्रसंगी ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, रायगड पालघरचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण, खासदार कपिल पाटील आदी मान्यवर मंडळी उपस्थित होती. मुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले की, ”जगन्नाथ पाटील यांनी सातत्याने पक्षासोबत राहून विचारांची कास कधीही सोडली नाही. यांच्यासारख्या अनेक कार्यकर्त्यांनी एवढ्या वर्षात जी मेहनत घेतली. त्यामुळेच आज आपल्यासारखा कार्यकर्ता मुख्यमंत्री बनू शकला. त्यांनी पदासाठी नव्हे तर विचारांसाठी सतत काम केले आहे. अनेक वर्षे विविध पदावर काम करणारी लोक ज्यावेळेस पद नसतात, त्यावेळेस पक्षाकडे पाहत देखील नाहीत. पण पद नसलं तरी माझी जबाबदारी आहे. मी तयार केलेला पक्ष आहे. पक्षाच्या जडणघडणीत माझा वाटा आहे. मी रक्त आटवलय अशी भूमिका असणारे जगन्नाथराव हे आजही निवडणूक असो अथवा नसो पायाला भिंगरी लावून पक्षासाठी काम करताना दिसतात,” असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. ”राज्य उत्पादन शुल्क मंत्रीपदाच्या काळात त्यांनी अतिशय पारदर्शकपणे काम केले. त्याकाळात राज्य सरकारचा महसूल वाढवणारा निर्णय घेतला. अनेक मद्य सम्राटांचा दबाव असतानाही त्यांनी एमआरपीचा निर्णय घेतला,” असेही मुख्यमंत्री म्हणाले. जगन्नाथ पाटील यांचा जीवनपट उलगडणारे ‘कळसाचा पाया’ या पुस्तकाचे प्रकाशन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडले.

- Advertisement -

मंत्र्याची दिवाळी आणि सोन्याचे कॉईन…

”साध्या पद्धतीने जीवन जगायचे आणि राहायचे असे मी मनाशी ठरवले होते. त्यामुळे आमदार, खासदार, मंत्री झालो. पण त्यावेळीही आणि आजही साध्या पद्धतीने जीवन जगल्याचे,” जगन्नाथ पाटील यांनी सांगतले. मंत्री असताना कधी हॉटेलमध्येही गेलो नाही. राज्य उत्पादन शुल्क मंत्री असतानाचा दिवाळीतील किस्सा त्यांनी यावेळी सांगितला. ”मी जूनमध्ये मंत्री झालो. माझी पहिलीच दिवाळी होती. त्यावेळी सुबोधकुमार हे आयुक्त होते. दिवाळीत प्रत्येक अधिकारी हे सुकामेवा घेऊन येतात. त्यावर एक डब्बी असते, त्यात गोल्ड कॉईन असतं. ऐपतीप्रमाणे अधिकारी १०- २० ग्रॅम सोन्याचे कॉईन देतो. त्यावेळी सुबोधकुमारांचा सल्ला ऐकला. त्यावेळी ते मी घेतले नाही. जर घेतलं असत तर पहिल्या वर्षात ४००- ५०० ग्रॅम सोनं जमवलं असत. पण एकदा ठरलं, त्या वाटेला जायचं नाही. त्या वाटेला मी कधीच गेलो नाही. सचोटीने काम केलं की सरकारी अधिकारी शब्दाला मान देतात. जीवनात अनेक प्रसंग पाहिले. पण यशाने हुरळून गेलो नाही, अपयशाने खचून गेलो नाही. जोपर्यंत मानसिक शक्ती तोपर्यंत पक्ष संघटनेचे काम करत राहणार आहे. हा माझ्या एकट्याचा सन्मान नाही. तर जनसंघाच्या स्थापनेवेळी जे-जे कार्यकर्ते माझ्यासोबत होते त्यांचा हा सन्मान आहे,” असे पाटील म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -