घरमुंबईविद्यार्थ्यांच्या समस्येतून मिळाली प्रेरणा

विद्यार्थ्यांच्या समस्येतून मिळाली प्रेरणा

Subscribe

विद्यार्थ्यांची समस्या ही आपली समस्या समजून शिक्षण क्षेत्रात कार्य केल्यास शैक्षणिक समस्या सहज दूर करून विद्यार्थ्यांचे शिक्षण सुलभ करता येते. हे आपल्या कृतीतून दाखवत अहमदनगरमधील शिक्षक रवी भापकर यांनी राज्यातील शिक्षकांसमोर आदर्श ठेवला आहे. विद्यार्थ्यांना ऑनलाईन स्पर्धा परीक्षा देण्यात येत असलेली समस्या सोडवण्याच्या उद्देशाने झपाटलेल्या भापकर यांनी संपूर्ण शालेय अभ्यासक्रमाचेच डिजिटलायझेशन करून तो ब्लॉगच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसमोर आणण्याची किमया साधली आहे. अभ्यासक्रमाच्या डिजिटलायझेशनमुळे विद्यार्थ्यांना अभ्यासातील रुची वाढवण्याबरोबरच त्यांच्या दप्तराचे ओझेही कमी झाले आहे. रवी भापकर यांच्या कार्याची दखल घेत केंद्र सरकारच्या वतीने देण्यात येणार्‍या आय.सी.टी. राष्ट्रीय पुरस्कारासाठी त्यांची निवड करण्यात आली आहे.

विद्यार्थ्यांना शिकण्यात येणार्‍या अडचणी दूर करणे हे शिक्षकाचे सर्वात महत्त्वाचे काम असते. या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न केल्यास विद्यार्थी घडण्यास मदत होते. अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील सरदवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना ‘मंथन’ ऑनलाईन परीक्षा द्यायची होती. परंतु ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना परीक्षेचे शुल्क भरणे परवडणारे नव्हते. पैशांअभावी मुलांना परीक्षा देता येत नसल्याची सल भापकर यांना सतावत होती. त्यातूनच भापकर यांनी पाच वर्षांपूर्वी विद्यार्थ्यांना ऑनलाईन टेस्ट कशा देता येतील यासाठी प्रयत्न सुरू केले. तुम्हाला काही करण्याची जिज्ञासा असेल तर मार्ग सापडतोच.त्यामुळेच यूट्यूब आणि गुगलवरून माहिती घेत भापकर यांनी ऑनलाईन टेस्ट बनवल्या. परंतु, या ऑनलार्ईन टेस्ट विद्यार्थ्यांपर्यंत कशा पोहचवायच्या असा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला. त्यातूनच ‘रवी भापकर ब्लॉग’ची निर्मिती झाली. ब्लॉगवरील टेस्ट सोडवल्यामुळे ‘मंथन’ परीक्षेत भापकर यांच्या शाळेतील पाच विद्यार्थ्यांची निवड झाली. विद्यार्थ्यांची इच्छा पूर्ण झाल्याचे त्यांना समाधान मिळाले. पण आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांप्रमाणे अनेक विद्यार्थ्यांची ही परीक्षा देण्याची इच्छा असेल हे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी ब्लॉगवरील टेस्टचा फायदा सर्व विद्यार्थ्यांना व्हावा यासाठी त्याच्या लिंक अन्य शाळेतील विद्यार्थ्यांना पाठवण्यास सुरुवात केली. या टेस्ट विद्यार्थी व शिक्षकांच्या पसंतीस पडल्याने भापकर यांच्या ब्लॉगला भेट देणार्‍यांची संख्या वाढली. आतापर्यंत तब्बल 27 लाखांपेक्षा अधिक लोकांनी ब्लॉगला भेटी दिल्या आहेत.

- Advertisement -

विद्यार्थी हे पालकांच्या अ‍ॅण्ड्राईड मोबाईलवर गेम खेळत असतात ही गोष्ट लक्षात घेऊन भापकर यांनी अ‍ॅण्ड्राईड अ‍ॅप बनवण्याचा निर्णय घेतला. राज्यातील अन्य शिक्षकांनीही यात सहभागी व्हावे यासाठी 100 पेक्षा अधिक कार्यशाळा घेऊन भापकर यांनी तंत्रस्नेही शिक्षक घडवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. त्यातूनच आज अनेक शिक्षकांनी आपले ब्लॉग बनवून त्यातून विद्यार्थ्यांच्या टेस्ट घेण्यास सुरुवात केली आहे. या ई शिक्षणामुळे विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाबद्दल रुची वाढीस लागून त्यांच्या दप्तराचे ओझेही कमी होण्यास मदत झाली आहे.

ऑनलाईन टेस्टने सुरू झालेल्या ब्लॉग हा विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवण्याच्यादृष्टीने अधिक सक्षम असावा यासाठी मी ब्लॉग परिपूर्ण करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू केले. मुख्य ध्येय मुलांच्या समस्या सोडवणे हेच होते. त्यामुळे कविता रिदममध्ये शिकवणे, तसेच नेटच्या माध्यमातून कविता गोळा करून त्या ब्लॉगवर उपलब्ध केल्या. याचा फायदा शिक्षकांना झाला. त्यांनी मोबाईलवरून विद्यार्थ्यांना कविता शिकवण्यास सुरूवात केली. त्यानंतर काही शैक्षणिक व्हीडीओ तयार केले. बालभारतीच्या वेबसाईटवर पुस्तके ब्लॉगवर उपलब्ध केल्याने विद्यार्थ्यांना पुस्तके मिळण्यातील अडचणी दूर झाल्या. पहिली ते 10 पर्यंतचे सर्व धडे, कविता, छायाचित्रासह ब्लॉगवर उपलब्ध केल्याने विद्यार्थ्यांना स्वयंअध्ययन करता येत आहे. तसेच आता सराव प्रश्नपत्रिकाही ब्लॉगवर उपलब्ध करून दिल्या आहेत, असे रवी भापकर यांनी सांगितले.

- Advertisement -

प्रत्येक इयत्तेतील विषयातील धड्यानुसार ऑनलाईन टेस्ट बनवण्याचा माझा विचार आहे. तसेच पुस्तकातील प्रत्येक धड्यानंतर असलेले प्रश्न ही ऑनलाईन स्वरुपात देण्याची तयारी सुरू आहे. विद्यार्थ्यांच्या सरावासाठी प्रश्नोत्तरे पाठ करा म्हटले तर ते करत नाहीत. त्यामुळे ऑनलाईन स्वाध्याय पुस्तिका तयार करण्याचे माझे उद्दिष्ट असल्याचे भापकर यांनी सांगितले. ग्रामीण भागामध्ये भापकर यांना नेटवर्कच्या समस्येचा सामना करावा लागत असे. भापकर यांनी ब्लॉग बनवण्यास सुरुवात केली तेव्हा त्यांना टूजी नेटवर्कसाठी दरमहा तीन हजार रुपये खर्च करावे लागत होते. आर्थिकदृष्ट्या ते परवडणारे नव्हते. तसेच शाळेत नेटवर्क नसल्याने घरीच काम करावे लागत असे. परंतु, पत्नीने माझ्या कामाबद्दल कधीही कटकट न करता माझ्या कामाला नेहमीच प्रोत्साहन दिले. ती सुद्धा प्राथमिक शिक्षिका असल्याने माझ्या कामाची तिला जाणीव होती, असे भापकर यांनी सांगितले.

मुख्यमंत्र्यांकडून गौरव

रवी भापकर यांनी ब्लॉगच्या माध्यमातून राबवलेल्या प्रकल्पाची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मिळाली, तेव्हा त्यांनी त्यांच्या अधिकृत फेसबुक पेजवर त्यांचा प्रकल्प अपलोड केला. त्यामुळे त्यांना प्रेरणा मिळाली. एखाद्या शिक्षकाच्या कार्याची दखल मुख्यमंत्र्यांकडून घेतली जाणे हे फारच कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले.

केंद्र व राज्याच्या पोर्टलचीही जबाबदारी

पहिली ते 10 पर्यंतच्या पुस्तकातील धडे विद्यार्थ्यांना ई पद्दतीने देण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. ब्लॉगच्या माध्यमातून केलेल्या ई-शिक्षणाच्या प्रचारामुळे भापकर यांची राज्य सरकारच्या ‘मित्रा’ आणि केंद्र सरकारच्या ‘दिक्षा’ पोर्टलसाठी निवड झाली आहे.

Vinayak Dige
Vinayak Digehttps://www.mymahanagar.com/author/dvinayak/
१२ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. आरोग्य, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -