घरमुंबईनवी मुंबईच्या राजकीय स्पर्धा परीक्षेत चढाओढ

नवी मुंबईच्या राजकीय स्पर्धा परीक्षेत चढाओढ

Subscribe

एसएससी सराव परीक्षेच्या निमित्ताने राष्ट्रवादीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर

गेल्या अनेक वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेसकडून घेण्यात येणारी एसएससी सराव परीक्षा यावेळी चर्चेचा विषय ठरली आहे. निवडणुकांचा हंगाम पाहता यावेळी या परीक्षेला महत्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे या सराव परीक्षेची राष्ट्रवादीकडून तुफान पोस्टरबाजी करण्यात आली. मात्र, त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष आणि ज्येष्ठ नगरसेवक अनंत सुतार यांचा फोटोच गायब झाल्याने त्यांनी थेट यावरून आमदारांनाच लक्ष केले. याचे पडसाद राजकीय वर्तुळात उमटले असता आमदार संदीप नाईक यांनी झालेल्या चुकीचा जाहीर खुलासा करत या सराव परीक्षेचे श्रेय सुतार यांचेच असल्याचे स्पष्ट केले. यावरून अखेर शहराच्या जिल्हाध्यक्षासमोर आमदार नतमस्तक झाले अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

2019 हे निवडणुकांचे वर्ष असल्याने प्रत्येक पक्षाकडून मतदारांना आकर्षिक करण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न केले जातात. त्यामुळे एकप्रकारे पोस्टरबाजीची स्पर्धाच नवी मुंबई शहरात लागली असून त्याच स्पर्धेचा राष्ट्रवादीचा पक्षाचा एक राजकीय बळी गेला आहे. बोर्डाच्या धर्तीवर दहावी सराव परीक्षेचे आयोजन जिल्हाध्यक्ष अनंत सुतार यांच्याकडून गेल्या अनेक वर्षांपासून करत येत असताना काही वर्षांपासून राष्ट्रवादीचे आमदार संदीप नाईक यांनी हा उपक्रम सुरु ठेवला होता.यंदा १३ व्या वर्षात या सराव परीक्षेने आगमन केले असून हे वर्ष या परीक्षेला वादग्रस्त ठरले आहे. १० वीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेपूर्वी परीक्षेचा अंदाज यावा म्हणून राष्ट्रवादीकडून ही परीक्षा घेण्यात येते. या सराव परीक्षेचे बॅनर संपूर्ण शहरात लावण्यात आले असता त्यात अनंत सुतार यांचा फोटोच टाकण्यात आला नाही.सदर प्रकार सुतार यांच्या लक्षात येताच त्यांच्या मनातील खदखद वाढली. त्यामुळे सुतार राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देण्याच्या तयारीत असल्याची चर्चा सुरू झाली.तर ऐरोलीचे राष्ट्रवादी आमदार संदीप नाईक आणि अनंत सुतार यांच्यात बिनसल्याची चर्चाही सुरू झाली.अनंत सुतार राष्ट्रवादीचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष असूनही त्यांचा फोटो वगळल्याने आश्चर्य होत आहे.यावर प्रतिक्रिया देताना अनंत सुतार यांनी राष्ट्रवादी आमदार संदीप नाईक यांच्यावर नाराजी व्यक्त केली आहे.

- Advertisement -

‘1996 पासून दहावी सराव परीक्षांचा उपक्रम मी घेत आलो असून माझ्या प्रॉडक्शनवर नव्याने लेबल लावले गेले आहे. मात्र फोटो न लावण्याचा हा पहिला अनुभव नाही .या प्रकरणी मी आमदार संदीप नाईक यांना विचारणा करणार आहे.सदर उपक्रम राबवत असताना १२ वर्षांपासून आमदार संदीप नाईक यांनी हा उपक्रम हाती घेतला आणि मोठ्या प्रमाणात राबवण्यास सुरवात केली.या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत असताना मध्येच माझा फोटो गायब करण्यात आल्याने सदरील बाब गंभीर आहे.                                                                                                     अनंत सुतार – नवी मुंबई जिल्हाध्यक्ष,राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष

नवी मुंबई शिक्षण संकुलाच्या वतीने गणेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस संजीव नाईक आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अनंत सुतार यांचे श्रेय एसएससी सराव परीक्षेसाठी असून सुतार हे या उपक्रमाचे मुख्य प्रबंधक आहेत. सर्वांच्या सहकार्याने हा शैक्षणिक उपक्रम आम्ही केवळ पुढे नेत आहोत. सराव परीक्षेवरून सुतार नाराज असल्याच्या बातम्या काही वृत्तवाहिन्यांवर आल्या. सराव परीक्षेचा उपक्रम सुतार यांनीच सुरू केला असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही तो केवळ राबवत आहोत. या उपक्रमातून नवी मुंबईतील विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती व्हावी, हेच आमच्या सर्वांचे उद्दिष्ट आहे.                                                                                                संदीप नाईक – आमदार,राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -