घरक्राइमएक 'मॅडम कमिशनर' आणि अनेक भांडाफोड; अजित पवारांना भिडणाऱ्या मीरा बोरवणकर आहेत...

एक ‘मॅडम कमिशनर’ आणि अनेक भांडाफोड; अजित पवारांना भिडणाऱ्या मीरा बोरवणकर आहेत तरी कोण?

Subscribe

मुंबई – 15 ऑक्टोबर रोजी मीरा बोरवणकर यांचे ‘मॅडम कमिशनर द एक्स्ट्राऑर्डनरी लाईफ ऑफ अॅन इंडियन पोलिस चिफ’ हे पुस्तक प्रकाशित झालं. त्यांच्या या पुस्तकात 38 प्रकरणं आहेत. जळगाव सेक्स स्कँडल, एकतर्फी प्रेमातून इंजिनिअर तरुणीच्या हत्येचा तपास, अशा त्यांच्या कारकिर्दीतील विविध हायप्रोफाईल प्रकरणांचा यात उल्लेख करण्यात आला आहे. मात्र सध्या चर्चा होत आहे ती त्यांनी या पुस्तकात उल्लेख केलेल्या ‘दादा’ पालकमंत्र्यांवरील आरोपांची. म्हणजेच पुन्हा एकदा पुण्याचे पालकमंत्री झालेल्या अजित पवारांवर मीरा बोरवणकरांनी या पुस्तकातून हल्लाबोल केला आहे.
2010 मध्ये पुणे पोलिस आयुक्त असताना तत्कालिन पालकमंत्री अजित पवार यांनी येरवडा पोलिसांच्या ताब्यातील तीन एकर जागा खासगी विकासकाला देण्यासाठी मीरा बोरवणकरांना तुम्ही जमीन हस्तांतरणाची प्रक्रिया पार पाडा, असे म्हटले होते. असा दावा माजी पोलिस आयुक्त मीरा बोरवणकरांनी त्यांच्या ‘मॅडम कमिशनर’ पुस्तकात केला आहे. त्यावरुन विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरण्यास सुरुवात केली आहे. अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे.

अजित पवारांना भिडणाऱ्या या मीरा बोरवणकर आहेत तरी कोण?

मीरा बोरवणकर या पंजाबी कुटुंबातून येतात. वडील ओ.पी.चढ्ढा बीएसएफमध्ये होते तर त्यांच्या आई लग्नाआधी शिक्षिका होत्या. ‘शाळेतून आल्यावर आधी होमवर्क आणि मगच बाहेर खेळायला जा’, अशी आईची शिस्त होती. वडील महत्त्वाकांक्षी आणि आधुनिक विचारांचे, त्यामुळे मीरा आणि त्यांच्या बहिणीला त्यांनी मोकळ्या वातावरणात वाढवलं. दोन्ही मुलींनी मोठ्या क्षेत्रात जावं, उत्तंग कामगिरी करावी, अशी त्यांची इच्छा होती. त्यामुळे मीरा बोरवणकरांची बहिण आयकर विभागात मोठ्या पदावर गेली तर मीरा या आयपीएस झाल्या, असं त्यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं.

- Advertisement -

मीरा बोरवणकर या 1981 च्या महाराष्ट्र केडरच्या पहिल्या महिला आयपीएस अधिकरी बनल्या. महाराष्ट्रातील अनेक मोठ्या शहरांमध्ये त्यांची पोस्टिंग राहिलेली आहे. यामध्ये मुंबई, पुणे, तत्कालिन औरंगाबाद (संभाजीनगर), नागपूर यांचा प्रामुख्याने उल्लेख होतो.

जळगाव सेक्स स्कँडल कारकिर्दीतील टर्निंग पॉईंट

1994 मधील जळगाव सेक्स स्कँडल हा त्यांच्या कारकिर्दीतील टर्निंग पॉईंट ठरलेला खटला. येथूनच त्या प्रकाशझोतात आल्या. जळगावमध्ये 100 हून अधिक मुलींवर अत्याचार झाल्याचे, त्यांना वेश्या व्यवसायात ढकलण्याचे ते प्रकरण होते. जळगाव सेक्स रॅकेट म्हणून तेव्हा ते कुप्रसिद्ध होते. मीरा बोरवणकर तेव्हा पुणे सीआयडीमध्ये कार्यरत होत्या. त्यांच्याशिवाय महाराष्ट्रात दुसऱ्या कोणीही महिला आयपीएस अधिकारी नव्हत्या. त्यामुळे शासनाने त्यांना जळगावला जायला सांगितले. तेव्हा त्यांचा मुलगा लहान होता. त्यावेळी त्यांनी एक वर्ष जळगावमध्ये मुक्काम करुन प्रकरणाचा तपास केला, आणि आरोपींना बेड्याच ठोकल्या नाही तर सेशन कोर्टात आरोप सिद्ध करुन दाखवले. यामुळे देशभर त्या चर्चेत आल्या होत्या. अभिनेत्री राणी मुखर्जी स्टारर ‘मर्दानी’ हा चित्रपट मीरा बोरवणकर यांच्याच जीवनापासून प्रेरित आहे.

- Advertisement -

अंडरवर्ल्डमध्येही लेडी सुपरकॉपची दहशत 

मुंबईतील गुंडाराज संपवण्यातही मीरा बोरवणकर यांची महत्त्वाची भूमिका राहीलेली आहे. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम, छोटा राजन यांच्या गुंडांना त्यांनी तुरुंगात टाकलेलं. मुंबईतील टोळ्यांमध्ये त्याकाळी मीरा बोरवणकर यांची दहशत होती. अबू सालेम, मोनिका बेदी, इक्बाल मिर्ची, तारिक परवीन आणि शर्मिला सीताराम नाईक उर्फ ​शर्मिला शानबाग यांच्या प्रत्यार्पणात देखील बोरवणकरांचा मोठा वाटा राहिलाय. त्यांचा दरारा पाहूनच त्यांना लेडी सुपरकॉप म्हणून ओळख मिळाली.

तुरुंग महानिरीक्षक असताना त्यांच्याच निगराणीत 1993च्या मुंबई बॉम्बस्फोटातील दोषी याकूब मेमनला नागपूरात फाशी देण्यात आली होती. तर 26/11 मुंबई हल्ल्यातील दोषी अजमल कसाबच्या येरवड्यातील फाशीवेळीही मीरा बोरवणकरांनी महत्त्वाची भूमिका निभावली होती.

हेही वाचा : “तीन कोटींची जमीन घेऊन काय झाले असते तर…”, अजित पवारांचा विरोधकांना प्रत्युत्तर

मुंबईत पोस्टिंगला असताना लाच आणि राजकीय दबाव या दोन्हींचा त्यांना अनुभव आलेला आहे. याविषयी त्यांनीच एका मुलाखतीत सांगितलंय. ‘मुंबईत झोन 4 येथे डीसीपी असताना एक अधिकारी त्यांना म्हणाला, मॅडम माटुंगा, दादर, चेंबूर येथील उद्योजक, व्यापारी आम्हाला पैसे देतात. आम्ही त्यांचे कोणतेही काम करत नाही. हा गुडवीलसारखा पैसा आहे. तुम्ही नाही घेतला तरी हा थांबणार नाही. तेव्हा मीरा बोरवणकरांनी ठामपणे त्या अधिकाऱ्याला ‘मला त्यात इंटरेस्ट नाही’ असं म्हटलं.
मुंबईत जॉईंट सीपी असतानाही त्यांना अशा प्रकारच्या ऑफर आल्या होत्या.. मात्र प्रशिक्षण काळातच दबाव झुगारण्याचं प्रशिक्षण घेतलेल्या मीरा बोरवणकर यांनी महाराष्ट्रातील पोलीस सेवेत दमदार कामगिरी करत लेडी सुपरकॉप म्हणून कारकिर्द गाजवली. 2017 साली त्या निवृत्त झाल्या. आता त्यांच्या पुस्तकातून अनेक जुन्या प्रकरणांना नव्याने उजाळा मिळत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -