घरमुंबईआझाद मैदानचे व्हीआयपी, २५ जणांच्या बंदोबस्ताला २०० पोलीस!

आझाद मैदानचे व्हीआयपी, २५ जणांच्या बंदोबस्ताला २०० पोलीस!

Subscribe

सकाळी ११ वाजले...मग ११.३० वाजले..मग १२ वाजले...मग १२.३० वाजले....पण प्रतिक्षा काही संपेना! कुणाची? तर पोलिसांची! कुणासाठी? तर आंदोलकांसाठी! कारण दुपारचे २ वाजल्यानंतरही आख्ख्या आझाद मैदानावर अवघे २५ ते ३० आंदोलकच हजर होते! त्यामुळे जय्यत तयारीनिशी आझाद मैदानावर तैनात असलेल्या पोलिस पथकावर ‘याचसाठी केला होता अट्टाहास’ असं म्हणण्याची पाळी आली!

मराठा आरक्षणासाठी १ ऑगस्टपासून राज्यभरात जेलभरो आंदोलनाची घोषणा मराठा संघटनांनी केली होती. त्यासाठी मुंबईत जय्यत तयारी करण्यात आली. मुंबईतलं आंदोलन आझाद मैदानातून सुरू होणार होतं. त्यासाठी मराठा संघटनांकडून तशा प्रकारचे पत्रकही मराठा बांधवांसाठी जारी करण्यात आले होते. गेल्या आठवड्याभराचा अनुभव पाहाता पोलिसांनीही या जेलभरोसाठी जय्यत तयारी केली होती. आझाद मैदानात पोलिस सतर्क होते. सकाळी ११ वाजेची वेळ आंदोलनासाठी देण्यात आली होती. त्यामुळे सर्व यंत्रणा सज्ज झाल्या. पण आंदोलनाची वेळ आल्यानंतर घडलं काहीतरी उलटंच!

सकाळी ११ वाजले…मग ११.३० वाजले..मग १२ वाजले…मग १२.३० वाजले….पण प्रतिक्षा काही संपेना! कुणाची? तर पोलिसांची! कुणासाठी? तर आंदोलकांसाठी! कारण दुपारचे २ वाजल्यानंतरही आख्ख्या आझाद मैदानावर अवघे २५ ते ३० आंदोलकच हजर होते! त्यामुळे जय्यत तयारीनिशी आझाद मैदानावर तैनात असलेल्या पोलिस पथकावर ‘याचसाठी केला होता अट्टाहास’ असं म्हणण्याची पाळी आली!

- Advertisement -

खोदा पहाड, निकला चूहा!

सकाळी १० वाजल्यापासूनच आझाद मैदानात जवळपास २०० च्यावर पोलीस, पोलीस गाड्या तसेच रॅपिड अक्शन फोर्स अर्थात शीघ्र कृती दलदेखील तैनात करण्यात आले होते. मात्र, आंदोलनकर्त्यांची संख्या पाहता ‘खोदा पहाड आणि निकाल चूहा’ अशीच काहीशी प्रतिक्रिया पोलिसांची होती. त्यातही वरकडी म्हणजे ११ वाजेच्या या जेलभरो आंदोलनाला सकाळी ७ वाजल्यापासूनच पोलिसांची ड्युटी लावण्यात आली होती. पण दिवसअखेर पोलिसांना हात हलवतच परतावं लागलं.

मीडियाही मोठ्या संख्येने उपस्थित

विशेष म्हणजे इतर आंदोलने पाहता जेलभरो आंदोलनामध्ये देखील काहीतरी होईल म्हणून सकाळपासूनच मीडियाचे प्रतिनिधीं, ओबी व्हॅन आझाद मैदानात तळ ठोकून बसले होते. मात्र दुपारनंतर प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनीही मैदानावरून काढता पाय घेतला.

- Advertisement -

याबाबत ‘माय महानगर’ने आंदोलनामध्ये उपस्थित असणारे संजय कणसे यांना विचारले असता त्यांनी ‘कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून आम्ही कमी माणसं बोलावली’ असा अजब दावा करत बाजू सावरण्याचा प्रयत्न केला.

‘कुणीही उठून नेता होतोय’

दरम्यान, या जेलभरो आंदोलनापासून मराठा आंदोलनातील प्रमुख संघटना आणि त्यांच्या प्रतिनिधींनी लांब राहणेच पसंत केले आहे. तसेच, इतर मराठा आंदोलकांनीही आंदोलनाकडे पाठ फिरवल्यामुळे मराठा आंदोलकांमध्ये फूट पडल्याचं पुन्हा एकदा ठळकपणे समोर आलं आहे. विशेष म्हणजे, ‘ही सगळी स्टंटबाजी सुरू आहे, हल्ली कुणीही उठून नेता होतोय’, अशी खोचक टीका उत्तर मुंबईचे मराठा आंदोलन समन्वयक सदानंद चव्हाण यांनी केली आहे. त्यामुळे मुख्य समन्वयकांचा पाठिंबा नसलेलं हे आंदोलन घडवून आणण्याचा घाट कुणी घातला आणि का? असा प्रश्न आता विचारला जात आहे.

नक्की कोण कुणाचे हस्तक?

एकीकडे जेलभरो आंदोलनावरून मराठा आंदोलकांमध्ये उभी फूट पडल्याचं पाहायला मिळत असतानाच दुसरीकडे आता या गटांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप होऊ लागले आहेत. आझाद मैदानावर आलेल्या आंदोलकांना याबाबत विचारले असता, ‘जे जेलभरो आंदोलनाला आले नाहीत, ते सरकारचे हस्तक आहेत’ असा आरोप त्यांनी केला. तर दुसरीकडे मराठा आंदोलनाच्या प्रमुख समन्वयकांकडून या आरोपांचा समाचार घेण्यात आला आहे. ‘आम्ही सरकारचे हस्तक नाही, ज्यांना तसं वाटतंय, त्यांनी ते सिद्ध करून दाखवावं’ असं जाहीर आव्हानच वीरेंद्र पवार यांनी दिले आहे.

गेल्या आठवड्याभरापासून सुरू असलेला मराठा आंदोलनाचा जोर या फुटीच्या किंवा फोडाफोडीच्या राजकारणामुळे आता भलत्याच राजकारणाकडे जाऊ लागल्याचं चित्र समोर येऊ लागलं आहे. त्यामुळे मराठा समाजाच्या मूळ मागण्यांपेक्षा नव्याच वादांवर लक्ष केंद्रीत होऊ लागलंय की काय? असाच प्रश्न सामान्य मराठा समाजाला पडला असावा!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -