घरमुंबईकेडीएमसीच्या कर्मचा-यांना लवकरच जॉब कार्ड !

केडीएमसीच्या कर्मचा-यांना लवकरच जॉब कार्ड !

Subscribe

प्रत्येक दिवसाच्या कामाची नोंद होणार

प्रत्येक दिवशी काय काम केले याची नोंद आता लवकरच कल्याण-डोंबिवली महापालिकेतील (केडीएमसी) कर्मचारी-अधिकार्‍यांना करावी लागणार आहे. सफाई कर्मचार्‍यांसह पालिकेच्या सर्वच कर्मचारी अधिकार्‍यांसाठी जॉब कार्ड तयार करण्याचा निर्णय पालिका आयुक्तांच्या दालनात राज्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे. राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी जॉब कार्ड लागू करण्याचे निर्देश पालिका प्रशासनाला दिले आहेत. सफाई कर्मचार्‍यांसाठी प्रायोगिक तत्वावर हा पायलट प्रोजेक्ट म्हणून पहिल्यांदा राबविला जाईल. त्यानंतर सर्व कर्मचार्‍यांसाठी राबविण्यात येईल, अशी माहिती केडीएमसी आयुक्त गोविंद बोडके यांनी ‘आपलं महानगर’शी बोलताना दिली.

केडीएमसी क्षेत्रातील विविध मागण्यासंदर्भात जागरूक नागरिक संघाने चार दिवस आमरण उपोषण केले होते. राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी मध्यस्थी करून हे उपोषण सोडायला लावले होते. यासंदर्भात गुरूवारी पालिका आयुक्त गोविंद बोडके यांच्या दालनात जागरूक नागरिक संघाच्या शिष्टमंडळाची बैठक घेऊन सर्व मागण्या मान्य करण्याचे आश्वासन त्यांनी उपोषणकर्त्यांना दिले होते. त्यानुसारच गुरुवारी पालिका आयुक्त बोडके यांच्या दालनात राज्यमंत्री चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली.

- Advertisement -

घनकचरा, पाणी आदी समस्या तसेच पदपथावरील अतिक्रमण, नादुरूस्त सिग्नल यंत्रणा रस्त्यावरील खड्डे आदी समस्यांकडे जागरूक संघाने लक्ष वेधले. त्यावेळी चव्हाण यांनी जॉब कार्ड लागू करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले. राज्य शासनाच्या रोजगार हमी योजनेची ही संकल्पना आहे. प्रत्येक दिवशी कर्मचारी काय काम करतो, हे त्याच्या रिपोर्ट कार्डवर समजणार आहे. या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी प्रत्येक विभागाची प्रथम बैठक घेऊन, हजेरीची पध्दत काय आहे या सर्वांची सांगड घातली जाईल. मात्र प्रशासनासाठी ही चांगली बाब आहे असेही बोडके यांनी सांगितले.

रेल्वे स्थानकापासून दीडशे मीटर अंतरावर फेरीवाल्यांना बसण्यास न्यायालयाच्या आदेशानुसार मनाई आहे. तसेच शाळा रूग्णालये या परिसरात योग्य अंतर राखण्यात येईल तसेच महापालिका हद्दीतील फेरीवाला धोरण निश्चित करून महिनाभरात अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. कल्याणमधील शिवाजी चौक व सहजानंद चौकातील सिग्नल यंत्रणा सुरू करण्यात येणार आहे. रस्त्यावरील खड्डे बुजविण्याच्या सूचना अधिकार्‍यांना देण्यात आल्या असून कामचुकारांवर कारवाई करण्यात येणार असल्याचेही आयुक्तांनी सांगितले. ज्या भागात विशेषत: कल्याण पूर्वेत बुस्टर लावून पाणी खेचण्याच्या प्रकारावर कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

- Advertisement -

आमदार खासदार नगरसेवक निधीतून करण्यात येणार्‍या कामांच्या ठिकाणी फलक लावण्यात यावे तसेच पुणे येथे होर्डिंग पडून झालेल्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर शहरातील अधिकृत अनधिकृत होडिंग्जची पाहणी करून त्याच्यावर कारवाई करण्याचे निर्देशही राज्यमंत्र्यांनी प्रशासनाला दिले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -